रामनाथी (गोवा) – कल्याण (जिल्हा ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांनी १ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले. सनातनचे साधक डॉ. दुर्गेश सामंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या कार्याची माहिती दिली.
सनातनचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी श्री अरुण मोडक महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. दैनिक सनातन प्रभातच्या भांडुप येथे नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमालाही महाराज त्यांच्या शिष्यांना घेऊन आले होते.
श्री. अरुण मोडक महाराज यांनी दिलेला अभिप्राय
साधकांची साधना उत्तम चालली आहे ! – श्री. अरुण महाराज मोडक
‘सनातन आश्रमात सर्वत्र शिस्त, शांतता आणि स्वच्छता आहे. स्वेच्छेने आणि कोणताही मोबदला न घेता येथील सेवेकरी (साधक) सेवा करत आहेत. येथील सेवेकर्यांच्या (साधकांच्या) मुखावर समाधान आहे; दुःख नाही. त्यावरूनच ‘साधकांची साधना उत्तम चालली आहे’, हे कळून येते. अशाच ठिकाणी भगवंत नांदतो’, असेही श्री. अरुण मोडक महाराज यांनी सांगितले.
सनातनच्या आश्रमातील सात्त्विक लहरींचा जगाला लाभ व्हावा ! – श्री. अरुण महाराज मोडक
या वेळी श्री. अरुण मोडक महाराज म्हणाले, ‘‘आश्रमात आल्यावर प्रसन्न वाटले. येथे बर्याच प्रमाणात सात्त्विक लहरी आहेत. या लहरींचा जगाला उपयोग व्हावा. आज हिंदु धर्मातील लोक दुःखी आहेत. हिंदूंकडून संस्कृती, संस्कार आणि धर्म जपला जात नाही. मानव आज मनाने विकलांग झाला आहे. मनाला काय हवे ?, ते मिळवण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केले नाहीत. मनाला शांती आणि समाधान हवे असते. सनातन संस्था मनाला हवे असणारे धर्मसंस्कार देते. सनातन संस्थेच्या कार्याला आमचे आशीर्वाद आहेत !’’