१. सहज ध्यानयोगी, तपस्वी, कर्मयोगी आणि प्रीतीस्वरूप प.पू. देवबाबा
१ अ. सहज ध्यानयोगाचे मूर्तीमंत उदाहरण प.पू. देवबाबा
‘प.पू. देवबाबा सहज ध्यानावस्थेचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. सर्वसाधारणतः ध्यानयोगी घंटोन्घंटे ध्यान करायला प्राधान्य देतात. यामुळे त्यांना ‘सहज ध्यानावस्था’ या टप्प्याला जायला दीर्घकाळ लागतो. याउलट प.पू. देवबाबा सतत सहजध्यानावस्थेतच राहून सर्व कर्मे करतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ कार्यशाळेत किंवा साधकांनी विचारलेल्या प्रश्नांचे मार्गदर्शन करतांना अधिक वेळा त्यांचे डोळे मिटलेले असतात; पण कोणीही त्यांना प्रश्न विचारल्यावर ते त्याच्याकडे तोंड करून उत्तर देतात. जणू त्यांच्या तिसर्या नेत्रातून ते त्याला बघत आहेत आणि त्याच्याशी बोलत आहेत. या संदर्भात बोलतांना एकदा ते म्हणाले, ‘डोळे बंद करून मी सतत ध्यान करत ईश्वरी अनुसंधानात रहातो.’
२. पाच दिवसांच्या ब्रह्मचैतन्य नृत्य शिबिरात २ ते ३ घंट्यांची सत्रे असायची. या सत्रांमध्ये लघवी, पाय मोकळे करणे इत्यादी अनेक कारणांसाठी सर्व शिबिरार्थी सतत उठत असत. याउलट प.पू. देवबाबा अशा कोणत्याही कारणांसाठी न उठता एकाच जागी बसून असायचे. ध्यानावस्थेत इंद्रियांवर नियंत्रण मिळवून घंटोन्घंटे बसता येते. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे प.पू. देवबाबा.
३. शिबिरार्थींनी काही प्रश्न विचारल्यावर ते ध्यानावस्थेतून त्यांची उत्तरे मिळवतात. यामुळे व्यक्तीला होणार्या त्रासाचे मूळ कारण, उदा. प्रारब्ध, कुंडलिनीतील अडथळे इत्यादी यांचे अचूक विश्लेषण आणि त्यांवरील योग्य उपाय त्यांना सांगता येतात.
४. ‘शक्तीदर्शन योगाश्रमातील अनेक सभागृहांची रचना कशी असावी ?’, या संदर्भातील उत्तर त्यांनी ध्यानात अन्य योगींकडून मिळवले आहे.
१ आ. तपस्वी प.पू. देवबाबा
प.पू. देवबाबा यांनी अनेक वने आणि विविध ठिकाणी जाऊन खडतर तपश्चर्या केली आहे. त्यांची ही तपश्चर्या अजूनही चालू आहे. हे त्यांच्या दिनक्रमावरून लक्षात येते.
१. ते पहाटे ६ वाजता आश्रमात येऊन विविध सेवांचे अवलोकन करतात.
२. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते विविध सेवा करतात, उदा. आश्रमात आलेले पाहुणे, साधक, संत यांना भेटणे, कार्यशाळेत मार्गदर्शन करणे इत्यादी.
३. आपल्या निवासस्थानी जाऊनही रात्री ९ ते पहाटे ४ – ५ वाजेपर्यंत ते ध्यान करतात. या कालावधीत कधीतरी ते २ – ३ घंट्यांची झोप घेतात.
या दिनचर्येतून त्यांच्या तपस्वी जीवनाची थोडीफार कल्पना येते.
१ इ. कर्मयोगी प.पू. देवबाबा
प.पू. देवबाबा आदर्श कर्मयोगी आहेत. सतत कृतीशील रहाणे, निष्काम कर्म करणे, कर्तव्यपालन आणि वैराग्य, अशी कर्मयोग्यांची ठळक वैशिष्ट्ये असतात. या सर्व गुणांचे दर्शन प.पू. देवबाबा यांच्यात होते. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.
१. प.पू. देवबाबा कधीच वेळ वाया घालवत नाहीत. ते सतत काही ना काही कृती करत असतात.
२. त्यांचे वय ७७ वर्षे आहे. या वयातही स्वतः चारचाकी गाडी चालवून ते आश्रमात येतात आणि जातांना त्यांच्या काही भक्तांना सोडत घरी जातात.
३. ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ कार्यशाळेत व्यासपिठावरील ध्वनीयंत्रणेची जोडणी सांभाळणे, फलकाची रचना करणे इत्यादी कृती ते स्वतः करतात. वसंतपंचमीला त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या नागवनात झालेल्या कार्यक्रमांतील अनेक सिद्धता त्यांनी स्वतः केल्या होत्या. यातून सतत कर्म करणार्या त्यांच्यातील कर्मयोग्याचे दर्शन होते.
४. केवळ अध्यात्मच नाही, तर मायेशी निगडित पती, वडील अशा नात्यांशी निगडित सर्व कर्तव्येही त्यांनी पार पाडली आहेत.
५. ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’ची उभारणी प.पू. देवबाबा यांनी एकट्यानेच केली आहे. असे असतांनाही त्या संदर्भात ते वैराग्याच्या स्थितीत असतात. ‘अन्य साधकांप्रमाणे मीही आश्रमात प्रतिदिन येऊन साधना करणारा एक साधक आहे’, असा त्यांचा भाव असतो.
१ ई. प्रीतीस्वरूप प.पू. देवबाबा
सर्वसाधारणतः ध्यानयोगी आणि योगमार्गी रागीट असतात. याउलट प.पू. देवबाबा प्रीतीस्वरूप आहेत. त्यांची प्रीती केवळ भक्तांवर किंवा मनुष्यावर नसून सर्वांवर आहे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. गायीचे वासरू सहजासहजी कोणाच्याही जवळ जात नाही. याउलट प.पू. देवबाबा त्यांच्या गोठ्यात गेल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे सर्व वासरे ‘जणू आपल्या आईकडेच धाव घेत आहेत’, याप्रमाणे प.पू. देवबाबांकडे धावून येतात.
२. कोणत्याही कार्यक्रमात ‘प.पू. देवबाबा कोणाशी बोलले नाहीत’, असे होत नाही. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळा चालू असतांना ते प्रत्येकाला आलेले अनुभव त्याच्या जवळ जाऊन ऐकत होते. वसंतपंचमीनिमित्त त्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात आलेल्या अनुमान १ सहस्र लोकांपैकी जवळ-जवळ सर्वांशीच ते बोललेे.
३. प.पू. देवबाबा त्यांच्या सर्व भक्तांना खाऊ म्हणून चॉकलेट देतात. त्यांच्यातील प्रीतीमुळे सर्वच भक्त त्यांच्याकडे लहान मुलांप्रमाणे गोळा होऊन चॉकलेट घेत असतात.
४. ब्रह्मचैतन्य नृत्य शिबिराच्या शेवटच्या दिवशी प.पू. देवबाबांनी सर्व शिबिरार्थींशी सहज अनौपचारिक चर्चा करत जेवण ग्रहण केले.
५. पायाचा अस्थिभंग झालेल्या गायीचा पाय कापू न देता तिच्यावर उपचार करून तिला नवजीवन देऊन पुनःश्च तिला चालायला लावणे
५ अ. जखमी गायीच्या उपचारांचे दायित्व एका स्त्री कामगाराकडे देणे
प.पू. देवबाबांच्या आश्रमात ७ मासांपूर्वी एक गाय पडल्याने तिच्या पायाचा अस्थिभंग झाला होता. त्याला प्लॅस्टरही घातले होते; पण काही कारणाने तिचा पाय बरा न झाल्याने तो सडला. त्यामुळे वैद्यांनी ‘तो पाय कापावा लागेल’, असे सांगितले होते; पण प.पू. देवबाबांनी पाय कापू न देता ‘मी तिला पुन्हा चालवीन’, असे म्हटले. तेव्हापासून प.पू. बाबा तिची प्रत्येक प्रकारे काळजी घेत होते. त्यांनी एका स्त्री कामगाराकडे तिचे दायित्व देऊन गायीच्या पायाला प्रतिदिन मलमपट्टी करायला सांगितली.
५ आ. प.पू. देवबाबांनी गायीसाठी स्वतः परिश्रम घेऊन तिला उभे रहायला लावणे
अनेक मास बसून राहिल्याने या १५ दिवसांत गाय आळशी झाली होती. आता ती थोडी बरी होऊनही उभी रहायला सिद्ध नसायची. मग प.पू. बाबांनी तिच्यासाठी काही अंतरावर दोन लोखंडी खांब बांधून घेतले आणि गायीला कापडांचा आधार देत त्या खांबांना बांधून तिला उभे रहायला लावले. एकदा तर प.पू. बाबांनी रात्री उशीरपर्यंत जागून त्या गायीसाठी वापरण्यात येणार्या गादीच्या खोळी स्वतः शिवल्या. त्यामुळे ती हळूहळू उभी रहायला शिकली.
५ इ. गाय चालत स्वतःहून गोठ्याच्या बाहेर आल्यावर प.पू. देवबाबांना आनंद होणे
एक दिवस ती गाय स्वतःहून हळूहळू चालत गोठ्याच्या बाहेर आली. सायंकाळी प.पू. बाबांनी घरी जातांना ते पाहिले. तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी प्रेमाने तिला हाका मारून तिच्याशी बोलले आणि घरी जातांना तिला ‘टा टा’ केला. तेव्हा प.पू. बाबांचे ते गायीप्रती प्रेम पाहून मूल बरे झाल्यावर आईला जसा आनंद होतो, तसा त्यांना आनंद झाल्याचे जाणवले. केवळ प.पू. बाबांमुळे ती पुन्हा चालू शकली.
२. प.पू. देवबाबा यांची गुरुरूपातील वैशिष्ट्ये
२ अ. अनुभूतीतून शिकवणारे प.पू. देवबाबा
प.पू. देवबाबा यांची शिकवण्याची पद्धत अनुभूतीप्रधान आहे. ते तात्त्विक माहितीसह त्यांच्या भक्तांकडून प्रयोगही करून घेतात. या प्रयोगांतून भक्तांना अनेक अनुभूती येऊन त्यांची साधनेवर श्रद्धा बसते. यामुळे त्यांच्या सर्वच भक्तांना विविध दिव्य अनुभूती आल्या आहेत.
२ आ. भक्तांमध्ये शिष्यभाव निर्माण करणारे प.पू. देवबाबा
प.पू. देवबाबा यांच्या शिकवणीमुळे त्यांच्या शिष्यांमध्ये सेवाभाव निर्माण झाला आहे. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळेत आलेले त्यांचे अनेक भक्त धनाढ्य, उच्च पदावर विभूषित, समाजात प्रतिष्ठित असे होते, तरी आश्रम स्वच्छता, गोसेवा, आश्रमाच्या कार्यपद्धतीनुसार खाली बसून जेवणे इत्यादी ते सहजतेने करत होते. यांतून प.पू. देवबाबा यांची शिष्य घडवण्याची पद्धत लक्षात येते.
२ इ. भक्तांना सूक्ष्मातील ज्ञान शिकवणारे प.पू. देवबाबा
प.पू. देवबाबा त्यांच्या भक्तांना आलेल्या विविध अनुभूतींचे विश्लेषण करतात. यांसह त्यांच्या विविध भक्तांमध्ये त्यांनी सूक्ष्मातील ओळखण्याची क्षमताही निर्माण केली आहे.
२ ई. भक्तांच्या प्रकृतीनुसार त्यांना मार्गदर्शन करणारे प.पू. देवबाबा
प.पू. देवबाबा यांच्याकडे येणार्या विविध भक्तांना त्यांच्या प्रकृतीनुसार साधना सांगतात. ध्यानयोग्याला ध्यान, कलायोगातून जाणार्याला संगीत, चित्र इत्यादी कला, यांप्रकारे ते मार्गदर्शन करतात.
२ उ. चराचरातून ईश्वराची अनुभूती घेण्यास शिकवणारे प.पू. देवबाबा
प.पू. देवबाबा त्यांच्या भक्तांना आणि शिष्यांना निसर्गातील विविध घटकांतून ईश्वराची अनुभूती घेण्यास शिकवतात. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.
१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत विभागातील साधिकांना गोशाळा दाखवतांना प.पू. देवबाबा यांनी एका प्राकृतिक कुंडाजवळ त्यांना निसर्गातील ‘ॐ’कार नाद अनुभवण्यास सांगितले. त्या वेळी साधिकांना त्या नादांची अनुभूती घेता आली.
२. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळेत सहभागी अधिकांश जीव ध्यान शिकणारे असल्याने ‘सूर्यास्ताच्या वेळी सूर्यावर त्राटक करून काय अनुभवायला येते ?’, असा प्रयोग त्यांनी करून घेतला.
३. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळेसाठी ‘शक्तीदर्शन योगाश्रमात पहिल्यांदा दीपावलीला करतात’, तशी कृत्रिम विद्युत् दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईत विविध रंगांचे, ठराविक कालावधीत बंद होऊन परत चालू होणारे असे दिवे लावले होते. मागील दोन वर्षे आश्रमात कधीही अशी रोषणाई करण्यात आली नव्हती. ‘ब्रह्मांडात होत असणार्या चैतन्यशक्तीच्या नृत्याची अनुभूती स्थुलातून शिबिरार्थींना व्हावी’, या उद्देशाने रोषणाई करण्यात आली आहे’, असे प.पू. देवबाबा यांनी सांगितले.
३. प.पू. देवबाबा यांची सूक्ष्म स्तरावरील वैशिष्ट्ये
अ. ‘प.पू. देवबाबा स्थुलातील काहीतरी कर्मे करत असतांना त्यांच्याकडून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होतात. भक्तांशी अनौपचारिक बोलतांना त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांच्याकडून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होतात, तर ते ध्यान लावून बसल्यावर त्यांच्याकडून चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे लक्षात आले. यांतून विशिष्ट परिस्थितीनुसार त्यांच्याकडून ‘शक्ती, चैतन्य आणि आनंद प्रक्षेपित होतात’, असे जाणवले.
आ. ‘प.पू. देवबाबा यांचे कार्य प्राधान्याने वायूतत्त्वाशी संबंधित आहे’, असे जाणवले. यामुळे त्यांच्या उपस्थितीत मन निर्विचार होण्याची आणि सहजतेने ध्यान लागण्याची अनुभूती येते.
इ. प.पू. देवबाबा यांच्या जवळ गेल्यावर सहजतेने भाव जागृत होण्याची आणि सूक्ष्म गंध येण्याची अनुभूती येते.
ई. प.पू. देवबाबा वायूतत्त्वाच्या स्तरावर कार्य करत असल्याने त्यांना एकाच वेळी स्थुलातून आणि सूक्ष्मातून कार्य करणे शक्य होते. (‘त्यांच्या अनेक भक्तांना आणि सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांनाही असेच लक्षात आले आहे.’ – संकलक)
उ. प.पू. देवबाबा यांच्याभोवती सतत पिवळ्या रंगाची चैतन्याची प्रभावळ दिसत असते. त्यांच्यातील शक्ती प्रगटीकरणानुसार प्रभावळीत वाढ होत असते.
ऊ. प.पू. देवबाबा यांच्यातील प्रीतीमुळे वायूमंडलातील यक्ष, योगिनी, कनिष्ठ देवता, हिमालयातील संत इत्यादी सूक्ष्मातून त्यांच्या आश्रमात येऊन जातात. काही सूक्ष्म शक्ती त्यांच्या आश्रमाचे रक्षण करण्याचेही कार्य करतात.
ए. प.पू. देवबाबा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना नामजपादी उपाय सांगत असतांना सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती ज्या स्तरावर युद्ध करतात, त्या स्तरावर येऊन प.पू. बाबा सूक्ष्मातून युद्ध करतात. यामुळे साधकाचा त्रास त्वरित अल्प होण्यास साहाय्य होते.
ऐ. प.पू. देवबाबा यांच्यातील प्रीतीचा परिणाम ते नामजपादी उपाय सांगत असलेल्या जिवावर झाल्याने त्याला सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींशी संघर्ष करणे शक्य होते. यामुळे त्याला असलेला अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प कालावधीत दूर होण्यास साहाय्य होते.
४. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प.पू. देवबाबा यांच्यासारख्या संतांचे दर्शन आणि त्यांच्याकडून शिकता आले. यासाठी दोन्ही संतद्वयींच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार आणि कोटी कोटी कृतज्ञता.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०१९, दुपारी १२.४१)