पुणे – धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंगाने माखलेले युवक-युवती पाण्यात उतरल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था अन् अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने २१ मार्च या दिवशी खडकवासला जलाशय रक्षण अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते मानवी साखळी करून खडकवासला जलाशयाच्या भोवती थांबले होते. कार्यकर्त्यांनी रंगपंचमी, होळी यांचे धर्मशास्त्र सांगणारे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे प्रबोधनात्मक फलक हातात धरले होते. ‘कमिन्स इंडिया’ या आस्थापनाचे कर्मचारीही या अभियानाच्या अंतर्गत सहभागी झाले होते. गेल्या १६ वर्षांप्रमाणे या वर्षीही अभियान १०० टक्के यशस्वी झाले. या अभियानाच्या अंतर्गत रंगाने माखलेल्या युवक-युवतींना पाण्यात उतरण्यास प्रतिबंध केल्याने अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला चांगले सहकार्य लाभले. सण आणि उत्सव यांमध्ये शिरलेले अपप्रकार दूर व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक स्तरावर जनजागृतीपर अभियान राबवण्यात येते. याप्रसंगी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांचे धर्मशास्त्र सांगितले.
रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे २५ मार्चलाही अभियान
अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच २५ मार्च या दिवशीही सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत अभियान राबवण्यात येणार आहे.
यंदाचे हे १७ वे वर्ष असून गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून यशस्वीपणे चालू आहे. समिती सातत्याने करत असलेल्या जनजागृतीमुळे आणि प्रबोधनात्मक मोहिमांमुळे घडणार्या अपप्रकारांत लक्षणीय घट झाली आहे.