अयोध्या – कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या संपर्कात आलेल्या अयोध्येतील धर्मप्रेमी व्यक्तींशी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर संवाद साधण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने या भागात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले. यामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि अयोध्येतील डॉ. नंदकिशोर यांनी धर्मप्रेमींशी प्रत्यक्ष भेटी अन् बैठका यांद्वारे संवाद साधला.
१. शरयू नदीच्या बचावासाठी अशासकीय संस्थेद्वारे कार्य करणारे पर्यावरणतज्ञ श्री. अभिषेक सिंह यांनी शासकीय वनरोपण आणि प्रदूषण निर्मूलन या प्रक्रियांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली. सनातन संस्थेच्या धर्मजागृतीच्या कार्याची माहिती ऐकून घेतल्यावर त्यांनी त्यांच्या संपर्कातील युवकांसाठी एक बैठक आयोजित करण्याचे निश्चित केले.
२. अयोध्या येथील पुजारी श्री. विधिभूषण पांडे यांनी त्यांच्या संपर्कातील धर्मप्रेमी नागरिकांसाठी हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन केले. या वेळी शिक्षक, विद्यार्थी, राजकीय चळवळीत सहभागी असणारे कार्येकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सनातन संस्थेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याची इच्छा धर्मप्रेमींनी व्यक्त केली. बैठकीत उपस्थित श्री. तुषार श्रीवास्तव यांनी दुसर्या दिवशी देवकाली मंदिरात धर्मप्रेमी युवकांची बैठक आयोजित करण्याचे निश्चित केले.
३. श्री. तुषार श्रीवास्तव यांनी आयोजित केलेल्या बैठकीला १२ युवक उपस्थित होते. या बैठकीत हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या संदर्भात अधिकाधिक जागृती करण्याचे सर्वांनी ठरवले. या बैठकीनंतर धर्मप्रेमी युवकांच्या उपस्थितीत ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार’ या विषयावर ‘फेसबूक लाईव्ह’ करण्यात आले.
४. अयोध्येतील नाडीवैद्य तथा अधिवक्ता रामप्रसाद पांडे यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘अयोध्येत वर्ष १९०२ मध्ये दैवी जल असलेली १०८ कुंड होती. आज या सर्वांवर अवैधरित्या अतिक्रमण करून लोकांनी घरे बांधली आहेत. शासन यांच्या संदर्भात काहीच करत नाही, हे लक्षात घेऊन आम्ही येथे न्यायालयीन संघर्ष चालू केला आहे.’’ अधिवक्ता पांडे यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या धर्मप्रेमी नागरिकांसाठी हिंदु राष्ट्र-जागृती बैठक आयोजित करण्याचे या भेटीत निश्चित केले.
शास्त्र जाणून धार्मिक कृती केल्यास त्याचा अधिक लाभ मिळतो ! – चेतन राजहंस
झुंसी, प्रयागराज येथील धर्मप्रेमी व्यक्तींशी संवाद
झुंसी, प्रयागराज – गंगास्नान, कुंकुमधारण, श्राद्धविधी इत्यादी धार्मिक कृतींमधील शास्त्र माहिती असल्यास या कृती श्रद्धेेने केल्या जातात. श्रद्धेने केलेल्या कृतींमुळे अधिक आध्यात्मिक लाभ होतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. कुंभमेळ्यातील सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहिलेल्या धर्मप्रेमींसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.