कोवळ्या उन्हात २० मिनिटे बसल्यावर, सौरऊर्जेने तापलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर आणि समुद्रकिनारी जाऊन सूर्याला अर्घ्य दिल्यावर कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

कु. मधुरा भोसले

१. कोवळ्या उन्हात उपायांसाठी बसल्यावर आलेल्या अनुभूती

‘ड’ जीवनसत्त्व वाढण्यासाठी वैद्यांनी साधकांना प्रतिदिन सकाळच्या किंवा सायंकाळच्या कोवळ्या उन्हात २० मिनिटे बसण्यासाठी सांगितले होते. मी सायंकाळच्या उन्हात २० मिनिटे बसते. उन्हात बसल्यावर माझ्यावर उन्हाचे उपाय होऊन माझ्या देहाभोवतालचे काळे आवरण नष्ट होते. सूर्याची उष्णता माझ्या शरिराच्या पेशीपेशीतून माझ्या देहात प्रविष्ट होते आणि माझ्या देहात साठलेली त्रासदायक शक्ती नष्ट अन् मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने बनवलेली स्थाने नष्ट होऊन माझ्या देहात सूर्याची सकारात्मक ऊर्जा कार्यरत होते. त्यामुळे माझ्या देहातील जडत्व आणि मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन साधना करण्याचा माझा उत्साह वाढतो.

 

२. सौरऊर्जेने तापलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर आलेली अनुभूती

गिझरच्या गरम पाण्याच्या तुलनेत सौरऊर्जेने तापलेल्या पाण्यात पुष्कळ सात्त्विकता, चैतन्य आणि हलकेपणा जाणवतो. त्यामुळे सौरऊर्जेने तापलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर माझ्या देहाभोवती साठलेले काळ्या शक्तीचे आवरण झटकन दूर होते आणि पाण्यातील सात्त्विकशक्ती अन् चैतन्य माझ्या देहात प्रविष्ट होतांना जाणवते. त्यामुळे सौरऊर्जेने तापलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर मला हलकेपणा जाणवतो आणि माझ्या मनाचा उत्साहही वाढतो. या पाण्यामध्ये कपडे धुतल्याने कपड्यांमध्ये साठलेली काळी शक्ती लवकर नष्ट होते आणि कपडे अधिक सात्त्विक होतात.

 

३. समुद्रकिनारी जाऊन सूर्याला अर्घ्य दिल्यावर आलेली अनुभूती

३०.११.२०१८ या दिवशी संत करत असलेल्या कालीमातेच्या उपासनेचे सूक्ष्म परीक्षण करण्यासाठी श्री. राम होनप, श्री. निषाद देशमुख आणि मी गोव्यातील ‘कोलवा’ या समुद्रकिनारी गेलो होतो. विधी संपल्यावर आम्ही समुद्रदेवाचे दर्शन घेण्यासाठी समुद्राच्या पाण्याजवळ गेलो. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्यामुळे सूर्य समुद्राच्या जवळ आला होता. सूर्याला पाहून आम्ही अर्घ्य देत असतांना मला सूर्याच्या बिंबात सूर्यनारायणाचे दर्शन झाले आणि आम्ही अर्पित केलेले अर्घ्य त्याने स्वीकारले. सूर्यनारायणाने आम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होण्याचा आशीर्वाद दिला.

कृतज्ञता !

‘परात्पर गुरुमाऊलीच्या (प.पू.डॉक्टरांच्या) कृपेमुळेच मला सूर्यनारायणाच्या संदर्भात वरील अनुभूती आल्या आणि त्याची कृपा प्राप्त झाली, यासाठी मी गुरुमाऊलीच्या अन् सूर्यनारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment