उष्णतेच्या विकारांवर घरगुती औषधे

Article also available in :

 

१. उष्णतेच्या विकारांची काही लक्षणे

‘घशात, छातीत किंवा पोटात जळजळ होणे; लघवीला आग होणे; अंगावर पुळ्या येणे; डोळे, हात किंवा पाय गरम होणे; मासिक पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव होणे; शौचावाटे रक्त पडणे.

 

२. घरगुती औषधे

अ. चहाचा १ चमचा सब्जाचे (किंवा तुळशीचे) बी पाव वाटी पाण्यात ८ घंटे भिजत ठेवावे. त्यानंतर ते कपभर दुधात (टीप १) घालून सायंकाळी प्यावे.

टीप १ – दूध पिण्यासंदर्भात सर्वसाधारण नियम : औषध घातले असलेले किंवा नसलेले दूध पिण्यापूर्वी ३ घंटे आणि दूध प्यायल्यावर न्यूनतम दीड घंटा काही खाऊ नये.

आ. पेठेत (बाजारात) साखरेच्या पाकात बनवलेले गुलाबाचे दाट सरबत (सिरप) मिळते. हे १ चमचा दाट सरबत कपभर दुधात घालून सायंकाळी प्यावे. यात वरीलप्रमाणे चमचाभर भिजवलेले सब्जाचे (किंवा तुळशीचे) बीही घालता येते.

इ. दिवसातून १ – २ वेळा आवश्यकतेनुसार गुलाबाचे सरबत प्यावे किंवा १ – १ चमचा गुलकंद खावा.’

३. उन्हाळ्यात पुढील दक्षता घेऊन विविध विकारांपासून दूर रहा !

१. दिवसभरात आवश्यक तेवढे पाणी अथवा तत्सम पेय प्यावे. पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. गडद रंगाची लघवी होत असल्यास ‘अधिक पाणी प्यायला हवे’, हे लक्षात घ्यावे.

२. एका वेळी गटगट भरपूर पाणी न पिता सावकाश प्यावे. उन्हातून आल्यावर लगेच पाणी न पिता ५ – १० मिनिटे शांत बसून मग पाणी प्यावे.

३. अधिक साखर असलेले पेय पचायला जड असते. त्यामुळे शक्यतो ते पिऊ नये.

४. सैलसर, फिकट रंगाची आणि वजनाला हलकी असणारी (शक्य असल्यास सुती) वस्त्रे वापरावीत.

५. व्यायामाचे प्रमाण अल्प ठेवावे.

६. ऊन असतांना घरात किंवा सावली असलेल्या ठिकाणी थांबावे.

७. वातावरणात थंडावा रहाण्यासाठी कूलरची सुविधा असेल, तर दिवसातील काही घंटे त्याचा वापर करावा.

८. शक्यतो सकाळी १० पूर्वी आणि दुपारी ४ वाजल्यानंतर घरातून बाहेर पडावे. ‘उन्हाची झळ लागू नये’, यासाठी बाहेर जातांना ‘गॉगल’ घालावा. छत्री अथवा सर्व बाजूंनी सावली देईल, अशा प्रकारची टोपी (‘हॅट’) वापरावी.

९. काहींना अध्यात्मप्रसाराची सेवा किंवा अन्य कारणांमुळे बाहेर जावे लागते वा प्रवास करावा लागतो. ‘उष्णतेचा त्रास होऊ नये’, यासाठी पुरुषांनी खिशात आणि स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये कांदा ठेवावा. कांदा शरिरातील उष्णता खेचून घेत असल्याने ३ – ४ दिवसांनी तो कोरडा पडतो. कोरडा पडलेला कांदा टाकून देऊन नवीन कांदा समवेत ठेवावा.

१ वर्षापेक्षा लहान वयाच्या बाळांची, तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची वरील सूत्रांच्या आधारे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.’

४. चैत्र महिन्यातील उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून घ्यावयाचे औषध

‘चैत्र महिना उन्हाळ्यात येतो. या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये; म्हणून एक औषध सांगितले आहे. पाडव्याच्या दिवशी हे औषध सर्वांनी घ्यायचे असते. ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो, त्यांनी नंतरसुद्धा हे औषध घ्यायला हरकत नाही.

पारिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः ।
सपुष्पाणि समानीय चूर्णं कुर्याद्विधानतः ॥१॥
मरीचिहिंगुलवणमजमोदा च शर्करा ।
तिंतिणीमेलनं कृत्वा भक्षयेद्दाहशांतये ॥२॥

अर्थ : कडुनिंबाची कोवळी पाने व फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर आणि चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे अन् औषध म्हणून घ्यावे. जून पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण न्यून होतो; म्हणून विशेष करून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत.

 

५. हृदय, तसेच सर्व शरीर यांच्या विकारांत आयुर्वेदीय औषध देण्याची वेळ

दुपारच्या जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड घंट्याने दिलेल्या औषधाचा परिणाम हृदयावर, तसेच सर्व शरीरभर होतो; कारण हा व्यान वायूचा काळ आहे. व्यान वायू हा हृदयाच्या आश्रयाने  राहून सर्व शरीरभर फिरणारा वायू आहे.

– वैद्य मेघराज पराडकर (१८.२.२०१८)

Leave a Comment