झोप घेतांना शरिराची स्थिती कशी असावी ?

Article also available in :

अनुक्रमणिका

 

१. झोप घेण्याचा सामान्य नियम

झोप घेण्याचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय. प्रत्येकाची प्रकृती आणि तत्कालीन स्थिती यांनुसार झोप घेण्याची आरामदायी स्थिती वेगवेगळी असू शकते. आपण कोणत्या स्थितीत झोपावे, हे झोप लागेपर्यंतच आपल्या हातात असते. झोप लागल्यावरची शरिराची स्थिती आपल्या नियंत्रणात नसते.

झोप

२. झोप आणि झोपण्याच्या विविध स्थितींचे विवेचन

झोपेच्या चार स्थिती असू शकतात. त्यांचा ऊहापोह –

२ अ. पालथे (पोटावर) झोपणे

नवजात बालके आणि लहान मुले यांना या स्थितीत झोपवल्याने त्यांचा श्‍वास कोंडण्याची शक्यता असते. यामुळे त्यांना पालथे झोपवू नये. पालथे झोपल्याने पाठीच्या मणक्यांवर इतर स्थितींच्या तुलनेत जास्त ताण येतो.

२ आ. उताणे (पाठ टेकवून) झोपणे

आपण जेव्हा उभे असतो, तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्यांवर येणारा दाब १०० टक्के, असे गृहीत धरल्यास उताणे झोपल्यावर हा दाब ७५ टक्के न्यून होऊन २५ टक्के एवढाच राहतो. उताणे झोपल्यावर पाठीच्या मणक्यांवर सर्वांत न्यून दाब येत असल्याने पाठीच्या मणक्यांशी संबंधित विकार असलेल्यांना उताणे झोपल्याने लाभ होतो. उताणे झोपून गुडघ्यांखाली लहानशी उशी घेतल्यास पाठीच्या कण्याला अजून जास्त आराम मिळतो.

२ आ १. उताणे झोपणे आणि घोरणे यांचा संबंध

ज्यांना घोरण्याची सवय आहे, त्यांचे घोरणे उताणे झोपल्याने वाढते. झोपेमध्ये जेव्हा घशाची अंतस्त्वचा (आतील त्वचा) शिथिल होऊन श्‍वसनमार्गात अडथळा निर्माण होतो, तेव्हा घोरणे चालू होते. उताणे झोपल्याने श्‍वसनमार्गात अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण वाढते. कुशीवर झोपल्याने शिथिल झालेली अंतस्त्वचा श्‍वसनमार्गातून बाजूला झाल्याने घोरणे थांबते. यामुळे कुशीवर वळल्यावर घोरणे न्यून झाल्याचा अनुभव अनेकांना येतो.

२ इ. कुशीवर झोपणे

कुशीवर झोपलेल्या स्थितीत मणक्यांवर उभे राहण्याच्या तुलनेत ७५ टक्के दाब असतो. उजव्या कुशीवर झोपल्याने चंद्रनाडी, तर डाव्या कुशीवर झोपल्याने सूर्यनाडी चालू होण्यास साहाय्य होते.

प्राक्शिरा दक्षिणाननो दक्षिणशिराः प्रागाननो वा स्वपेत् ।

– आचारेन्दु, शयनविधिप्रयोग

अर्थ : पूर्वेकडे वा दक्षिणेकडे डोके करून कुशीवर झोपावे.

कुशीवर झोपावे, असे धर्मशास्त्रात सांगितले असल्याने विशिष्ट कारणासाठी अन्य स्थितींत झोपण्याची आवश्यकता नाही, अशांनी कुशीवर झोपणेच जास्त योग्य आहे.

प्राक्शिरः शयने विद्यात् धनम् आयुश्च दक्षिणे ।
पश्चिमे प्रबला चिन्ता हानिमृत्युरथोत्तरे ।।

– आचारमयूख

अर्थ : ‘पूर्वेकडे डोके करून झोपल्यास धन, तर दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य प्राप्त होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता वाढते, तर उत्तरेकडे डोके करून झोपल्यास हानी किंवा मृत्यू ओढवतो.

२ इ १. कुशीवर झोपल्याने होणारी प्रक्रिया

आपण कुशीवर झोपतो तेव्हा खालच्या बाजूला असलेली नाकपुडी हळूहळू चोंदू लागते. ती ठराविक क्षमतेपर्यंत चोंदली की, आपण कूस पालटतो. त्यामुळे हळूहळू ती नाकपुडी उघडून दुसरी, म्हणजे कूस पालटल्याने खाली आलेली नाकपुडी चोंदू लागते. नाकपुड्यांच्या एक-आड-एक चोंदण्याने आपण झोपेत ठराविक काळाने कूस पालटत असतो.

२ ई. झोपेत स्थिती पालटत असल्याने होणारा लाभ

आपण प्रतिदिन दिवसाचा एक चतुर्थांश वेळ झोपेत घालवतो. प्रतिदिन एवढा वेळ एकाच स्थितीत राहिल्यास त्वचेवर दाबजन्य व्रण (बेडसोअर्स) निर्माण होतात. झोपेमध्ये आपली स्थिती मध्ये मध्ये पालटत असल्याने शरिराच्या एकाच भागावर जास्त काळ दाब येत नाही. यामुळे त्वचेवर दाबजन्य व्रण (बेडसोअर्स) होत नाहीत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०१८)

३. व्यक्तीची प्रकृती आणि शारीरिक स्थिती यांनुसार योग्य कुशीवर झोपल्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होऊन लवकर अन् शांत झोप लागणे !

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘व्यक्तीच्या डाव्या बाजूला चंद्रनाडी, उजव्या बाजूला सूर्यनाडी आणि मध्यभागी सुषुम्नानाडी असते. सूर्यनाडी चालू असल्यावर उजवा हात आणि उजवा पाय यांची हालचाल अधिक प्रमाणात होते. याच्या बरोबर विरुद्ध परिणाम झोपल्यावर होतो. जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो, तेव्हा आपली चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते. जेव्हा आपण उजव्या कुशीवर झोपतो, तेव्हा आपली सूर्यनाडी बंद होऊन चंद्रनाडी चालू होते.

‘स्वरोदय शास्त्रा’नुसार चंद्रनाडीमध्ये अवरोध निर्माण केल्यास सूर्यनाडी जागृत होते आणि सूर्यनाडीमध्ये अवरोध निर्माण केल्यास चंद्रनाडी जागृत होते. याचाच प्रत्यय उजव्या कुशीवर झोपल्यावर डावीकडील चंद्रनाडी कार्यरत होणे आणि डाव्या कुशीवर झोपल्यावर उजवीकडील सूर्यनाडी कार्यरत होणे, यांमध्ये दिसून येतो. एखाद्या कुशीवर झोपल्यावर जसा परिणाम साध्य होतो, तसा परिणाम एखाद्या कानात कापसाचा बोळा घातल्यावरही होतो. उजव्या कानात कापसाचा बोळा ठेवल्यास चंद्रनाडी कार्यरत होते आणि डाव्या कानात कापसाचा बोळा ठेवल्यास सूर्यनाडी कार्यरत होते. व्यवहारात आपण बघतो की, स्त्रिया डाव्या नाकपुडीत नथ घालतात, तसेच कमरेला डाव्या बाजूला छल्ला लावतात. याचे कारण सूर्यनाडी कार्यरत करणे, हाच आहे. तसेच धार्मिक विधीमध्ये धोतर-उपरणे घातल्यास उपरणे डाव्या खांद्यावर घेतात. यामुळेही कार्यासाठी सूर्यनाडी कार्यरत रहाते. समर्थ रामदासस्वामी कुबडी वापरायचे आणि बसल्यावर कुबडी भूमीवर उभी करून तिच्यावर आपला डावा हात टेकवायचे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी, गोवा.

४. वात, पित्त आणि कफ प्रकृती असल्यास कसे झोपावे ?

४ अ. वात प्रकृती असल्यास पाठीवर झोपणे

‘वात प्रकृतीच्या व्यक्तीने अधिक काळ पाठीवर झोपावे. त्यामुळे त्याची सुषुम्नानाडी चालू होऊन देहात चैतन्य पसरून वायुरूपी वात न्यून होईल. जर पाठीवर झोपून लाभ होत नसेल, तर डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपून पहावे. सूर्यनाडीमुळे उष्ण स्पंदने, चंद्रनाडीमुळे शीतल स्पंदने आणि सुषुम्नानाडीमुळे आल्हाददायक स्पंदने देहात पसरून देहात झालेला वातप्रकोप शांत होतो. त्यामुळे लवकर आणि शांत झोप लागते. ज्या बाजूला झोपल्यावर वात न्यून होतो, त्याचा अभ्यास करून त्या कुशीवर अधिकाधिक वेळ झोपावे किंवा आलटून पालटून प्रयोग करावा.

४ आ. पित्त प्रकृती असल्यास उजव्या कुशीवर झोपणे

पित्त प्रकृती असल्यास उजव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे सूर्यनाडी बंद होऊन चंद्रनाडी चालू होते आणि संपूर्ण देहात शीतलता पसरते. त्यामुळे पित्त वाढल्यामुळे देहात निर्माण झालेली उष्णता न्यून होते आणि लवकर अन् शांत झोप लागते.

४ इ. कफ प्रकृती असल्यास डाव्या कुशीवर झोपणे

कफ प्रकृती असल्यास डाव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि देहात सर्वत्र उष्णता पसरते. त्यामुळे कफ वाढल्यामुळे देहात निर्माण झालेला थंडावा न्यून होतो आणि लवकर अन् शांत झोप लागते.

 

५. विविध प्रकारचे शारीरिक त्रास होत असतांना झोप घेण्याच्या पद्धती

५ अ. अपचनाचा त्रास होणे

अन्न पचत नसेल, तर जेवल्यावर डाव्या कुशीवर थोडा वेळ झोपावे. डाव्या बाजूला जठराचा भाग अधिक असल्यामुळे, डाव्या कुशीवर झोपल्यामुळे जठराला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊन अन्नपचन होण्यास साहाय्य मिळते. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला झोपल्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि जठराग्नी चांगला प्रज्वलित होतो. त्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते आणि लवकर अन् शांत झोप लागते.

५ आ. दम्याचा त्रास होणे

दम्याचा त्रास होत असेल, तर डाव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि देहातील उष्णता वाढून श्वसनमार्गातील कफाचे कण वितळून दम्याचा त्रास न्यून होतो. त्यामुळे शांत झोप लागते.

 

६. विविध प्रकारचे त्रास होत असतांना विशिष्ट कुशीवर
झोप घेणे आणि विशिष्ट प्रकारची मुद्रा करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे

विविध प्रकारचे त्रास कोणत्या कुशीवर झोपावे ? कोणती मुद्रा करावी ?
१. प्रकृतीनुसार
१ अ. वात वाढणे पाठीवर तर्जनीचे टोक अंगठ्याच्या टोकाला लावणे (वायुतत्त्वाची मुद्रा)
१ आ. पित्त वाढणे उजव्या कुशीवर अंगठ्याचे टोक अनामिकेच्या मुळाशी लावणे (आपतत्त्वाची मुद्रा)
१ इ. कफ वाढणे डाव्या कुशीवर अंगठ्याचे टोक मध्यमेच्या मुळाशी लावणे (तेजतत्त्वाची मुद्रा)
२. अन्य व्याधी
२ अ. अन्नपचन व्यवस्थित न होणे डाव्या कुशीवर अंगठ्याचे टोक मध्यमेच्या टोकाला लावणे (तेजतत्त्वाची मुद्रा)
२ आ. उच्च रक्तदाब असणे उजव्या कुशीवर अंगठ्याचे टोक अनामिकेच्या मुळाशी लावणे (आपतत्त्वाची मुद्रा)
२ इ. रक्तदाब न्यून असणे डाव्या कुशीवर अंगठ्याचे टोक मध्यमेच्या टोकाला लावणे (तेजतत्त्वाची मुद्रा)
२ ई. दम्याचा त्रास होणे डाव्या कुशीवर अंगठ्याचे टोक मध्यमेच्या टोकाला लावणे (तेजतत्त्वाची मुद्रा)
३. आध्यात्मिक त्रास होणे डाव्या किंवा उजव्या कुशीवर किंवा पाठीवर ज्या तत्त्वाची मुद्रा केल्याने त्रास न्यून होतो, ती मुद्रा शोधून काढून करणे
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Leave a Comment