एकमेवाद्वितीय महान तपस्वी परात्पर गुरु पांडे महाराज !

भाव, आनंद, चैतन्य आणि ज्ञान यांचे
मूर्तीमंत रूप असलेले अन् ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले ।’,
ही उक्ती सार्थ ठरवणारे एकमेवाद्वितीय महान तपस्वी परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘संत हेच आश्रमाचे खरे वैभव असते. संतांच्या अस्तित्वानेच आश्रमात चैतन्य निर्माण होते आणि साधकांना साधना करायला स्फुरण मिळते. सनातनच्या देवद आश्रमाला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामुळेच महत्त्व प्राप्त झाले. देवद आश्रमाला त्यांचा मोठा आधार लाभला होता. त्यांच्या अस्तित्वामुळे आश्रमातील चैतन्य वाढून साधकांमध्ये पालट झाला आणि त्यांची आध्यात्मिक उन्नतीही होऊ लागली. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारखे अनमोल संतरत्न सनातनला प्राप्त झाले, ही ईश्‍वराची सर्वांवर असलेली मोठी कृपा आहे.’

 

१. आपल्या अस्तित्वाने देवद आश्रमात चैतन्य निर्माण करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

‘वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु पांडे महाराज त्यांच्या पत्नीसह देवद आश्रमात रहायला आले. ते आश्रमात नुसतेच राहिले नाहीत, तर त्यांनी सनातनच्या सर्व कार्याला, सर्व साधकांना आणि सर्व संकटांना आपले मानले अन् ते सर्वस्वाने सनातनचेच झाले. त्यांच्या अस्तित्वाने देवद आश्रमात चैतन्य निर्माण झालेे आणि साधकांना साधना करायला स्फुरण मिळाले. आश्रमात त्यांचे चौफेर लक्ष असायचे. काही अयोग्य घडल्यास ते त्वरित दुरुस्त करण्यासाठी तळमळीने प्रयत्नरत असायचे. आश्रमात एखादी चूक झाल्यास त्यांना त्याची तीव्र खंत वाटायची. ते अखेरच्या क्षणापर्यंत देवद आश्रमात राहिले आणि आश्रमाचा आधारस्तंभ बनले. ज्याप्रमाणे रामनाथी आश्रम परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी अस्तित्वामुळे पावन झाला आहे, त्याप्रमाणे देवद आश्रम परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चैतन्याने उजळून गेला आहे.

(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

 

२. सनातनच्या कार्याशी पूर्णपणे एकरूप होणे

परात्पर गुरु पांडे महाराज सनातनच्या कार्याशी काया-वाचा-मनाने पूर्णपणे एकरूप झाले होते. ‘गुरुकार्य गतीने व्हावे’, यासाठी ‘संस्था स्तरावर आणखी काय करता येईल ?’ याविषयी त्यांचे सतत चिंतन चालू असायचे. नवीन काही सुचल्यास ते त्वरित कळवायचे. त्यांचे सर्वत्रच्या साधकांकडेही पूर्ण लक्ष असायचे. मला ते वेळोेवेळी साधकांच्या संदर्भात कळवून सतर्क करायचे.

 

३. सर्व साधकांवर निरपेक्ष प्रीती करणे

त्यांना सनातनच्या सर्वच साधकांविषयी पुष्कळ आत्मीयता वाटायची. विजयादशमीचे औचित्य साधून ते अनेक साधक, तसेच संत यांना आठवणीने प्रसादरूपी सोने (आपट्याची पाने) पाठवायचे. साधकांची आध्यात्मिक प्रगती झाली की, त्यांना विशेष आनंद व्हायचा आणि ते त्यांचे भरभरून कौतुक करायचे. दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला माझा एखादा लेख आवडल्यास ते मला आवर्जून कळवायचे. एखाद्या साधकाचा/साधिकेचा विवाह झाला, तर ते त्याला भ्रमणभाष करून आशीर्वाद द्यायचे. त्यांची साधकांवर निरपेक्ष प्रीती होती. त्याप्रमाणे ते साधकांना पितृवत् शिस्तही लावत.

 

४. सर्व साधक आणि संत यांच्यासाठी आदर्शवत् जीवन !

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असणारे उत्साहमूर्ती परात्पर गुरु पांडे महाराज वयाच्या ९१ व्या वर्षीही स्वरक्षण प्रशिक्षणात सहभागी होऊन व्यायामप्रकार करतांना

त्यांचे जीवन सर्व साधक आणि संत यांच्यासाठी आदर्शवत् होते. दैनिक सनातन प्रभातमधील सूचना म्हणजे ‘जणू परात्पर गुरुदेवांनी दिलेली आज्ञा आहे’, असा त्यांचा भाव होता. त्यांच्यात आज्ञापालनाची तीव्र तळमळ असल्यामुळे ते सर्व सूचनांचे त्वरित अन् निष्ठेने पालन करत असत. ते वयाच्या ८९ व्या वर्षीही स्वरक्षण प्रशिक्षण वर्गाला नियमितपणे जात. एकवेळ तरुण साधक प्रशिक्षण वर्गाला जाण्यास टाळाटाळ करतात; पण महाराज एवढ्या उत्साहाने या वयातही वर्गाला जात, हेे एक महदाश्‍चर्यच होते !

 

५. नियतकालिक सनातन प्रभातचे मार्गदर्शक !

५ अ. अभ्यासपूर्ण लिखाणाद्वारे वाचकांच्या विचारांना नवीन दिशा देणारा सनातनचा ज्ञानसूर्य !

परात्पर गुरु पांडे महाराज यांना सर्वांसाठी उपयुक्त असे लिखाण सुचले, तर सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी ते आवर्जून पाठवत असत. अनेक विषयांचे सखोल ज्ञान आणि या वयातही शिकण्याची तीव्र तळमळ या गुणांमुळे ते सतत नवनवीन गोष्टी आत्मसात करत. एवढेच नव्हे, तर अवतीभोवती घडणार्‍या घटनांचाही ते डोळसपणेे अभ्यास करत आणि त्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा सांगून सनातन प्रभातच्या वाचकांना नवीन दिशा देत. असा कोणताच विषय नव्हता की, ज्यावर प.पू. महाराज भाष्य करू शकले नसते. त्यांच्याजवळ जणू ब्रह्मांडातील सर्व विषयांच्या ज्ञानाचे भांडार होते आणि ओजस्वी वाणी अन् अभ्यासू लेखणी यांद्वारे ते सर्वांना ज्ञानामृताची गोडी चाखायला देत होतेे. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि आध्यात्मिक स्तरावरील लिखाणामुळे सनातन प्रभातला ज्ञानाचा एक वेगळा स्तर प्राप्त झाला होता. त्यांच्या सर्वव्यापी ज्ञानाचे एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास ‘ज्ञानसूर्य’ असेच करता येईल.

५ आ. सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणारा शब्द न् शब्द अचूक असायला हवा, ही धडपड !

ते सनातन प्रभातचे वाचन बारकाईने, आवडीने आणि अभ्यासपूर्ण रितीने करायचे. दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या लिखाणात काही चुका लक्षात आल्या, तर ते दैनिकाची सेवा करणार्‍या साधकांना त्याविषयी तत्परतेने सांगत. संबंधित साधकांना पुनःपुन्हा सांगूनही त्या चुका दुरुस्त होत नसतील, तर ते मलाही कळवत. ‘दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणारे परात्पर गुरु डॉक्टरांचे संदेशरूपी लिखाण अचूक आणि परिपूर्णच असायला हवे’, अशी त्यांची सदैव धडपड असे.

 

६. मंत्रोपचारांद्वारे साधकांना नवसंजीवनी देणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

६ अ. विविध समस्यांवर तात्काळ रामबाण उपाय सांगून
परात्पर गुरु डॉक्टरांनी ठेवलेला विश्‍वास सार्थ करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

देश-विदेशांतील साधकांना शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचे कोणतेही त्रास झाले, तसेच सनातनवर कोणतीही संकटे आली, उदा. राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी पाऊस येणे, तरी परात्पर गुरु डॉक्टरांच्या तोंडी प्रथम परात्पर गुरु पांडे महाराज यांचेच नाव यायचे आणि ‘त्यांना कळवले आहे ना ?’, अशी गुरुदेव डॉक्टर विचारणा करायचे. परात्पर गुरु पांडे महाराज विविध समस्यांवर तात्काळ रामबाण उपाय सांगत, तसेच मंत्रोपायही सांगत. त्यांच्या चैतन्यमय वाणीतील मंत्रजप लावून ठेवल्यास साधकांना त्याचा तात्काळ लाभ होत असे.

६ आ. अत्यवस्थ असलेल्या साधकांसाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी
सांगितलेले मंत्रजप आणि त्यांची निरपेक्ष प्रीती यांमुळे साधकांना प्राण वाचल्याची अनुभूती येणे

स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता रात्री-अपरात्री कधीही ते साधकांच्या साहाय्याला धावून जात. एखादा साधक अत्यवस्थ असल्यास ते रात्रभर जागून त्याच्यासाठी स्वतः मंत्रजप करत. त्यांच्या प्रीतीमुळे आणि मंत्रजपामुळे शेकडो कोस दूर असलेल्या साधकालाही तात्काळ बरे वाटायचे. अशा प्रकारे कित्येक साधकांनी स्वत:चे प्राण वाचल्याची अनुभूती घेतली आहे. यातून त्यांच्या मंत्रसामर्थ्याची प्रचीती येते. आज त्यांच्या चैतन्यमय वाणीतील सहस्रो मंत्र देश-विदेशांतील साधकांकडे आहेत. त्या माध्यमातून त्यांची कृपा सर्वांवर अखंड रहाणार आहे.

आज प.पू. महाराज स्थुलातून जरी आपल्यात नसले, तरी त्यांच्या चैतन्यमय वाणीतून सिद्ध झालेल्या सहस्रो मंत्रांचा अनमोल ठेवा आपल्याकडे आहे. ही त्यांची आणि परात्पर गुरु डॉक्टरांची मोठी कृपाच आहे !

 

७. कर्तेपणा ईश्‍वरचरणी अर्पण करतांना साधकांनाही तशी शिकवण देणे

मंत्रोपायामुळे साधकांना बरे वाटू लागले की, प.पू. महाराज म्हणायचे, ‘‘इदं न मम ।’, म्हणजे ‘हे मी केले नाही.’ सर्वकाही भगवंतच करतो आणि तोच कर्ता आहे.’’ ते स्वतःही सतत या स्थितीत असायचे आणि साधकांनाही जाणीव करून द्यायचे. एखाद्या साधकाने चांगली कृती केली, तर ते त्याला सांगायचे, ‘‘जे काही चांगले झाले, ते तुझ्यामुळे नव्हे, तर ईश्‍वरामुळे झाले आहे. श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांनी ते करून घेतले आहे.’’ साधकांचा अहं वाढून त्यांची साधनेत घसरण होऊ नये, याची ते काळजी घ्यायचे आणि साधकांच्या मनावर परात्पर गुरुदेवांचे महत्त्वही बिंबवायचे.

 

८. देवद आश्रमात अनुभवलेला परात्पर गुरु पांडे महाराज यांचा दिव्य सत्संग !

८ अ. भरभरून प्रेम देणे

वर्ष २०१५ मध्ये मी देवद आश्रमात गेले होते. त्या वेळी मला प.पू. महाराजांचा अनमोल सहवास आणि सत्संग लाभला. त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेमवर्षाव केला. मी रामनाथी आश्रमात आल्यावरही ते मला भ्रमणभाष करून ‘तुम्ही देवदला कधी येणार ?’, असे विचारायचे.

८ आ. कोणतीही सेवा परिपूर्ण व्हावी, ही तळमळ असल्याने कार्यक्रमाचे नियोजन बारकाईने जाणून घेणे

देवद आश्रमाच्या मागील परिसरात एक शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीच्या काळात मी देवद आश्रमात होते. शिवरात्रीपूर्वी ‘त्या मंदिराची स्वच्छता व्हावी’, अशी प.पू. महाराजांना पुष्कळ तळमळ होती. त्यामुळे ‘शिवरात्रीपूर्वी मंदिरातील रंगकाम, स्वच्छता आदींचे नियोजन कसे करणार ?’, याविषयी त्यांंनी विचारून घेतले. नंतर ‘सर्वकाही परिपूर्ण झाले आहे ना ?’, हे स्वतः येऊन पाहिले. या वयातही असलेला त्यांचा उत्साह आणि परिपूर्ण सेवेची तळमळ मी त्या वेळी जवळून अनुभवली. याचप्रमाणे देवद आश्रमात कोणताही कार्यक्रम, सोहळा असल्यास ते त्याचे नियोजन बारकाईने जाणून घ्यायचे आणि त्या संदर्भात त्यांना सुचलेली सूत्रेही सांगायचे.

 

९. प.पू. गुरुदेवांचे गुणवर्णन करतांना साधकांना त्यांचे अनोखे पैलू
उलगडून सांगणे आणि स्वतः भावानंद अनुभवत साधकांनाही तो अनुभवण्यास देणे

त्यांना प.पू. गुरुदेवांचे गुणवर्णन करण्यात पुष्कळ आनंद वाटायचा. त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी पुष्कळ उच्च प्रतीचा भाव असल्याने त्यांच्या ध्यानीमनी सतत प.पू. गुरुदेवच असत. ते त्यांच्या रसाळ वाणीत वेगवेगळ्या दृष्टांताद्वारे ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष भगवंतच कसे आहेत’, याविषयी सांगत. त्यांनी प.पू. गुरुदेवांना यथार्थपणे जाणले होते. ते साधकांच्या मनात त्यांच्याप्रती श्रद्धा निर्माण करत. त्यांच्या बोलण्यामुळे साधकांना प.पू. गुरुदेवांचे अनोखे पैलू ज्ञात होऊन साधक भावानंद अनुभवत.

स्वतः ज्ञानी असूनही परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामध्ये कृतज्ञता आणि शरणागत भावाचा अपूर्व संगम होता. अशा तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध महान विभूतीची उणीव आम्हा सर्वांना नित्य जाणवणार आहे. ‘आम्हा सर्वांवर आणि सनातन संस्थेवर त्यांची अखंड कृपा राहो’, अशी ईश्‍वरचरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०१९)

Leave a Comment