सक्षम अन् कणखर असलेली प्राचीन स्त्री आणि अबला आधुनिक स्त्री !

 

१. जुन्या काळातील तेजोमय गृहिणी आणि आधुनिक स्त्री

‘पडद्यातील जुन्या स्त्रिया, घरातल्या गृहिणी, या तेजोमय गृहिणींना यच्चयावत जग मानवंदना देते. या का भ्याड, दुबळ्या आहेत ? आजची स्त्री अमेरिकन जीवनाचे विलक्षण प्रलोभन असणारी आहे. अद्ययावत होऊ पहाणारी, पैसे बेगुमान उधळणारी, मनमानी करणारी, एकाकी, सिगरेट पिणारी, मद्यपान करणारी, उपहारगृहामध्ये पुरुषासमवेत एकटी रहाणारी ती शूर, स्वतंत्र नि मुक्त आहे का ?

 

२. राजस्थानी गृहिणींच्या दिव्यतेचे, असीम त्यागाचे
अन् धैर्याचे दिव्य जीवन संपूर्ण भारताला नतमस्तक बनवते !

राजपुतान्यातील पडद्यातल्या गृहिणींपुढे अरविंद, विवेकानंद, रामतीर्थ असे योगी महापुरुषही नतमस्तक झाले. भारतातील सर्वच्या सर्व क्रांतीकारक, देशभक्त, धर्मनिष्ठ आणि थोर यांनी या दिव्यतेचे, असीम त्यागाचे, धैर्याचे पाठ गिरवले, स्फूर्तीचे कण टिकवले. त्या राजस्थानी गृहिणींचे दिव्य जीवन संपूर्ण भारताला नतमस्तक बनवते. आजही राजपुताना, अजमेर, चितोड ही भारताची स्फूर्तीस्थान आहेत.

२ अ. राजवंश वाचवण्याकरिता स्वतःच्या पुत्राचे, वात्सल्याचे बलिदान देणारी पन्नादाई !

पन्नादाई राजवंश वाचवण्याकरिता आपले मूल पाळण्यात निजवते. सेवकाकरवी राजवंश दूर अरण्यात सुरक्षित पाठवून देते आणि चक्क सांगते, ‘‘ते पाळण्यात मूल आहे तोच राजकुमार आहे. तोच एकमेव मेवाडचा राजवंश !’’ स्वतःच्या मुलाचे मस्तक छाटलेले डोळ्यांनी पहाते. डोळ्यांतून पाण्याचा एक टिपूसही येऊ देत नाही ! मुखावर विषाद किंवा दुःख यांची पुसटसी लकेरही उमटू देत नाही.

२ आ. यवनाच्या नियंत्रणात जायला नको; म्हणून स्वतःला
धगधगत्या चितेत लोटून देणारी महाराणी पद्मिनी आणि सहस्रशः क्षात्राणी !

राणी पद्मावती

अल्लाउद्दिनच्या स्वारीच्या आक्रमणाची चाहूल लागते. चितोडच्या दाराशी तो असतो. किल्ला यवनाच्या नियंत्रणात जाणार तोच महाराणी सौंदर्यसम्राज्ञी पद्मिनी आणि तिच्या सहस्रशः क्षात्राणी स्वतःला धगधगत्या चितेत झोकून देतात. या क्षात्राणींचा, राजस्थानी महिलांचा ‘जोहार’ आणि ‘केसरिया’ हा तर महोत्सव ! मृत्यू हाच महोत्सव ! कराल काल, या गृहिणींचा परम सखा आहे. राजस्थानी कवींचा अग्रणी सूर्यमल, कविराजा नबाकीदास हे दोघे राजस्थानी गृहिणींचे अपूर्व शौर्य, असीम त्याग, धीरता, दिव्यता अशी उत्कृष्ट रंगवतात की, त्याला तोड नाही.

२ इ. सासरी उंबरठा ओलांडत असतांना रणभेदी निनादल्यावर तिने पतीला लष्करी पोषाख घालायला साहाय्य करणे

सूर्यमल हा कवी सांगतो, ‘‘राजस्थानी युवतीला मधुचंद्राची तमा नाही. तिला त्यासाठी अवसरही नाही, वेळच मिळत नाही. एका षोडशी वीरांगनेचा विवाह होतो. वरात येते. ती माप सांडून घराचा उंबरठा ओलांडते आणि रणभेदी निनादते. क्षणात ती नववधू पतीला लष्करी पोषाख घालायला साहाय्य करते. शिरस्त्राण चढवते. ढाल, तलवार, भाला, कवच अशा सगळ्या आयुधांनी सुसज्ज करते. तो घोड्यावर स्वार होतो.

२ ई. पतीला मधुचंद्रापेक्षा हौतात्म्याची ओढ असल्यास राजस्थानी युवतीच्या
रोमरोमातून हर्ष तरळणे; परंतु रणभूमीवरून परत येणार्‍या पतीसाठी तिच्या हृदयात स्थान नसणे

पतीला मधुचंद्र प्रिय नाही, हौतात्म्याची ओढ आहे, मृत्यूचे आकर्षण आहे, हे त्या युवतीला कळून चुकते. ती हर्षाने मोहोरते. पराक्रमी पतीकडे परम प्रेमाने पहाते. तिच्या नेत्रांतून नव्हे, रोमरोमांतून हर्ष तरळत असतो. पतीला युद्धावर जातांना एक नववधू खडसावून बजावते, ‘‘युद्धातून पळून आलास, तर हे दार तुला कायमचे बंद राहील. पत्नीच्या बाहुचा आसरा तुला कधी लाभायचा नाही!’’ पती कितीही प्रिय असू दे; पण समरांगणावरून पळून आलेल्या भ्याड नवर्‍याकरता ती वीरांगना कायमचे दार बंद ठेवते ! त्याने जिंकावे अथवा मरावे! मरून स्वर्ग जिंकावा. ती अन्य पर्याय ठेवत नाही. पती पराक्रमाची शर्थ करूनच घरी परततो. अंगावर जखमा झालेल्या आपल्या पराक्रमी पतीच्या शौर्याला त्याची पत्नी अभिवादन करते !

२ उ. रणभूमीवर जखमी योद्ध्यांना पाणी देऊन मलमपट्टी करत
असतांना स्वतःचा मुलगा दिसल्यावर त्याला मलमपट्टी न करता त्याच्यापेक्षा
अधिक जखमा झालेल्या विरांना मलमपट्टी करणारी क्षात्राणी गृहिणी राजकुंवर आणि तिची सून

रणभूमीवर योद्धे जखमी होऊन पडलेले असतात. वीर क्षात्राणी गृहिणी राजकुंवर, रात्रीच्या अंधारात पाणी, मलमपट्टी, औषधे इत्यादी घेऊन समरभूमीवर जाते. सोबत तिची सून असते. सुनेच्या डोक्यावर पाण्याचा घडा असतो. आईच्या हाती पेला असतो. दोघी समरभूमी धुंडाळतात. जखमांनी व्याकुळलेला कण्हत असलेला मुलगा दिसतो. मुलगा आईला आणि पत्नीला ओळखतो. विव्हळणारा तो मुलगा कण्हत कण्हत म्हणतो, ‘आई, इकडे ये. पाणी! पाणी!’’ आई तिकडे वळतच नाही. दुरून विचारते, ‘‘मुला, किती जखमा झाल्या आहेत ?’’ मुलगा उत्तरतो, ‘‘तीन !’’ त्या मुलाजवळ दुसरा विव्हळणारा वीर असतो. तो ओरडतो, मला दहा जखमा आहेत.’’ आई मुलाला सोडून त्याला पाणी पाजते. त्याच्या जखमांना तिची सून मलमपट्टी करते, औषधे देते. अधिक जखमा झालेल्या विरांना पाणी पाजीत फिरते. त्यांना औषध देते आणि पट्टी बांधते. मुलाची पाळी येतच नाही. त्याच्यापेक्षा अधिक जखमा झालेले अनेक वीर असतात ना ! पाणी संपायला येते. पाण्याचा घडा सुनेच्या डोक्यावर असतो. तहानेने व्याकुळलेला, जखमांनी विव्हळणारा, कण्हणारा मुलगा पत्नीकडे आशेने पहातो. पत्नी पतीला आपली असाहाय्यता प्रकट करते.

मुलगा व्याकुळतो आहे. पत्नी असाहाय्य आहे. आई ममत्वशून्य आहे, परमप्रेमाने थबथबलेली आहे. विश्‍वावर प्रेम करण्याची शक्ती तिने कमावलेली आहे; कारण ती निःपक्ष आहे. पूर्ण अनासक्त आहे. राष्ट्र हेच सर्वोच्च मूल्य मानणारी, अनुसरणारी तेजस्विनी आहे. सतीत्व हीच स्त्री जीवनाची सार्थकता आहे. हीच राजस्थानी गृहिणीची परमश्रेष्ठ धारणा !

 

३. स्त्रीमुक्ती आंदोलन चालवणार्‍या आजच्या
अत्याधुनिक महिला स्त्री-भ्रूणहत्या का रोखत नाहीत ?

आजची (सु) शिक्षित स्त्री गर्भजल चिकित्सा करवून गर्भशिशू मुलगी असेल, तर आधुनिक वैद्यांकरवी गर्भपात करवून घेते. ‘महाराष्ट्रात प्रतिवर्षी किमान ६० लक्ष गर्भशिशूंच्या हत्या होतात’, असे मित्र सांगतात. स्त्रीमुक्ती आंदोलन चालवणार्‍या आजच्या अत्याधुनिक महिला स्त्रीला भ्रूणहत्येच्या महापापापासून मुक्त करण्याकरता का बरे प्रयत्नशील होत नाहीत ?

 

४. अमेरिकन स्त्रियांना ‘आपण स्त्रीत्वाला मुकत आहोत’,
हे लक्षात आल्याने त्यांची पुनश्‍च स्त्रीत्वाकडे वाटचाल चालू होणे

अमेरिकन स्त्रियांचे पुरुषीकरण झालेले आहे. सत्ताकारण, अर्थकारण अशा सगळ्या क्षेत्रांतून स्त्रिया पुरुषांच्या साहाय्याने काम करीत आहेत, बरोबरीने आहेत, कुठेही रतिमात्र मागे नाहीत. स्त्रीमुक्ती आंदोलन तर शिगेला पोहोचले आहेच आणि आता घड्याळाचा लोलक झुकला आहे. ‘पुनश्‍च स्त्रीत्वाकडे’ हे आंदोलन सामर्थ्यशाली आहे; कारण सगळे मिळूनही स्त्री अतृप्त, असंतुष्ट आहे. आता ती अंतर्मुख होत आहे. ‘ती स्त्रीत्वाला मुकत आहे’, हे तिच्या ध्यानी येत आहे. तिनेच समान हक्क घटनेत सुधारणा करवून घेतली आहे.

पेनिलोफ लोमोव्ह ही श्रेष्ठतम अमेरिकन संपादिका ‘स्त्रीत्व कसे मोहोरेल’, याकरता तळमळून कळवळून आक्रोश करते, ‘‘हे पुरुषीकरण आता पुरे ! आता विराम हवा !’’ असे अमेरिकन स्त्री-हृदयाचे दुःख ती मांडते. समान हक्क मागायचे, स्त्रियांचे पुरुषीकरण अन् लिंगभेदाचे निर्मूलन करायचे आणि स्त्रीत्व नष्ट करून टाकायचे कन्या, पत्नी आणि माता असे जे परंपरेने संरक्षण होते, ते सगळेच नष्ट करायचे ? स्त्रीस्वभावाला, गृहिणीला, मातृत्वाला, तिलांजली देऊनच अर्थार्जनाच्या बाजारात तिला उभे रहावे लागते. आता अमेरिकन स्त्रीला उच्च जागा नकोत. धंद्यातल्या मालमत्ता हक्काची तिला फारशी कदर नाही. मातृत्व आणि गृहिणी यांकरिता आवश्यक त्या परंपरागत तरतुदी तिला हव्या आहेत ! गृहिणी आणि माता! ‘मातृत्व आधी. मग जर वेळच उरला, तर इतर कामे’, अशी अमेरिकन स्त्रीची धारणा आहे.

 

५. अमेरिकन स्त्रियांची स्त्रीत्वाकडे वाटचाल होत असूनही
आधुनिक भारतीय स्त्रियांचे पाऊल अमेरिकन स्त्रीच्या पुढे पाऊल पडत आहे !

आज भारतीय स्त्री अमेरिकन स्त्रीच्या वळणावर पाऊल टाकत आहे. तिला अमेरिकन स्त्रीचे विलक्षण आकर्षण आहे आणि त्यामुळेच आजच्या अमेरिकन स्त्रीच्या पुढे तिचे पाऊल पडत आहे. ती अत्याधुनिक होत आहे. अमेरिकन स्त्रीची अंतर्मुखता, ही धारणा भारतीय स्त्रीला कधी सावध करील ?

 

६. आजच्या अत्याधुनिक स्त्रीच्या तुलनेत मनूची जुनी स्त्री
विलक्षण शक्तीशाली असून प्रसंगी ही कोमलांगी स्त्री रणचंडी बनते !

आजच्या अत्याधुनिक स्त्रीच्या तुलनेत मनूची जुनी स्त्री स्वतःला विलक्षण शक्तीशाली मानते. ती स्वतःला दुबळी, अबला कधीच मानीत नाही. अत्याधुनिक स्त्रीपेक्षा जुन्या गृहिणीचे तेज, तिचा पराक्रम, तिचे सामर्थ्य अद्भुत आहे. पुरुषापेक्षाही फार सरस आहे, त्याची साक्ष इतिहासात पानोपानी आढळते. संयोगिता, पद्मिनी, करुणावती, जवाहरबाई, कृष्णाकुमारी, राणी दुर्गावती, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराराणी, अशा प्रसंगी क्षात्रतेज प्रगट करणार्‍या असंख्य क्षात्राणी वीरांगनांच्या कथांनी इतिहासाची पानेच्या पाने रंगली आहेत. स्त्रीच्या प्रचंड शक्तीची, असीम धैर्याची, शौर्याची मनू आणि अन्य शास्त्रकार उपेक्षा कशी करतील ?

‘हम भारत की नारी है, फूल नही चिंगारी है’, या चिंगारीतच धर्माचा वणवा भडकवून द्यावयाचा आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २०१०)

Leave a Comment