प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्था आजच्या काळात भाविकांना सनातन धर्माचे शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. सोप्या भाषेत धर्मशिक्षण देणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. यासाठी संस्थेने कुंभक्षेत्री धर्मशिक्षण प्रदर्शन लावले आहे. संस्थेचे ग्रंथही सोप्या भाषेत धर्मशिक्षण देतात, असे उद्गार वृंदावन येथील कथावाचक तथा श्रीजीबाबा यांचे शिष्य श्री रमाकांत गोस्वामी यांनी श्रीजीबाबानगर मंडपामध्ये कथावाचनाच्या वेळी काढले. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांचा सत्कार करण्यात आला.
गंगास्नान भावपूर्ण करा ! श्री. चेतन राजहंस
या वेळी उपस्थित भाविकांना धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘कुंभमेळ्यात गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. पापांचे परिमार्जन होणे आणि पितरांना मुक्ती मिळणे, यांसाठी गंगास्नान केले जाते. जी अनंत पापे आपल्याकडून झाली आहेत, त्याविषयी मनात तीव्र खंत वाटणे आणि मग ती पापे नष्ट होण्यासाठी देवनदी गंगेला प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. पापांविषयी खंत नसेल, तर गंगानदी तरी त्यांचे परिमार्जन का करील ?’’ याशिवाय श्री. राजहंस यांनी धर्माचरणाचे महत्त्व, तिथीनुसार वाढदिवस कसा साजरा करावा ?, देवालयात दर्शन कसे घ्यावे ? यांविषयीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.