सनातनची गुरुपरंपरा !

सनातनची गुरुपरंपरा !

श्री आद्य शंकराचार्य यांनी स्वयं स्थापन केलेल्या ४ पिठांपैकी बद्रीनाथ मठाच्या अंतर्गत येणारा आनंदसंप्रदाय त्यांनी त्यांचे शिष्य तोटकाचार्य यांना सोपवले होते. याच परंपरेतील श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद हे महातपस्वी सिद्धपुरुष होते. प.पू. अनंतानंद साईश हे त्यांचेच शिष्य होते. प.पू. अनंतानंद साईश सनातन संस्थेचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांचे गुरु ! संत भक्तराज महाराज यांच्या देहत्यागानंतर प.पू. रामानंद महाराज त्यांच्या गादीवर बसले. संत भक्तराज महाराजांचे शिष्योत्तम म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले ! आता परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मप्रसाराचे कार्य चालवणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना भृगु महर्षींनी त्यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केले.

 

महर्षि भृगु यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले
यांनी त्यांची गुरुशक्ती सद्गुरुद्वयींमध्ये संक्रमित करावी’, असे
सांगितल्यावर परात्पर गुरूंनी ‘आता मी सत्-चित्-आनंदावस्था अनुभवणार’, असे सांगणे

‘भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यातील गुरुशक्ती संक्रमित करून त्यांना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित करावे.’ याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आता मी सत्-चित्-आनंदावस्था अनुभवणार !’’– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (२०.२.२०१९)

(‘प्रत्यक्षातही गुरुशक्ती संक्रमित केल्यावर मला उत्साह वाटत होता.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले )

 

परात्पर गुुरु डॉ. आठवले यांचे सगुणातील कार्य
संपलेले असून त्यांच्यातील निर्गुण तत्त्व आता प्रकट होत
असल्याने ‘गुरुशक्ती प्रदान’ सोहळ्यानंतर त्यांच्या प्रभावळीत वाढ होणे !

‘गुरुशक्ती प्रदान’ सोहळ्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची यू.टी.एस्. चाचणी करण्यात आली. चाचणीत त्यांची प्रभावळ ५९४.८३ मीटर इतकी आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी तर दोघींना सर्व दिले, तरीही माझी प्रभावळ कशी वाढली ?’’

परात्पर गुरु डॉक्टरांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे त्यांची गुरुशक्ती संक्रमित केली असली, तरी ते साक्षात श्रीमन्नारायण आहेत. गुरुशक्ती संक्रमणानंतर दोन्ही सद्गुरूंना त्यांचा अध्यात्मप्रसाराचा कार्यभार चालवण्यासाठी शक्ती मिळाली आणि परात्पर गुुरु डॉक्टरांचे सगुणातील कार्य संपलेले असून त्यांच्यातील अप्रकट निर्गुण तत्त्व आता प्रकट होत आहे. त्यामुळे ‘गुरुशक्ती प्रदान’ सोहळ्यानंतर केलेल्या यू.टी.एस्. चाचणीत परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रभावळीत वाढ झाली.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.२.२०१९)

 

‘गुरुशक्ती प्रदान’ सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.)
अंजली गाडगीळ यांनी अनुभवलेली भावावस्था आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

१. ‘गुरुशक्ती प्रदान’ सोहळा चालू असतांना मी निर्विचार अवस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भावावस्था अनुभवली.

२. सोहळ्याच्या वेळी ‘हे नवे नाही. अशा प्रकारचा सोहळा यापूर्वीच्या अनेक युगांमध्ये पार पडला आहे’, असे मला जाणवत होते.

३. आश्रमात सहस्र-दीपदर्शन सोहळ्याच्या वेळी लावण्यात आलेल्या दीपांच्या ज्योतींकडे पाहिल्यावर माझे ध्यान लागत होते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (२०.२.२०१९)

‘गुरुशक्ती प्रदान’ सोहळ्याच्या दिवशी करण्यात
आलेल्या यू.टी.एस्. चाचणीच्या वेळी पृथ्वीवर जणू नक्षत्रमंडल अवतरले !

‘गुरुशक्ती प्रदान’ सोहळ्यानंतर यू.टी.एस्. चाचणी करतांना ‘अनेक दिव्य जीव आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत’, असे मला जाणवले. नागाच्या, तसेच लुकलुकणार्‍या तार्‍यांच्या अन् प्रकाश गोळ्यांच्या रूपांतील अनेक दिव्यात्मे यांमुळे पृथ्वीवर जणू नक्षत्रमंडलच अवतरले आहे’, असे अनुभवायला येत होते. येथील वनस्पतीही मधेच तेजस्वी भासत होत्या. ‘याद्वारे निसर्ग प्रतिसाद देत असून त्याच्यातील तेज जागृत होत आहे’, असे मला जाणवले.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (२०.२.२०१९)

गुरुशक्ती प्रदान सोहळा आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
यांचा कुलदेव श्री मंगेशदेवाचा जत्रोत्सव दोन्ही एकाच दिवशी असणे,
यावरून कुलदेवच आपल्याला गुरूंपर्यंत घेऊन आल्याचे जाणवून
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा कुलदेव आणि गुरु यांच्याविषयी कृतज्ञताभाव दाटून येणे

‘माघ पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे १९ फेब्रुवारी २०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गुरुशक्ती प्रदान सोहळा साजरा झाला. याच दिवशी गोव्यातील मंगेशी, फोंडा येथील श्री मंगेशदेवाचा जत्रोत्सवही होता. श्री मंगेशदेव हा आमचा कुलदेव आहे. कुलदेवतेची उपासना हा गुरुकृपायोगानुसार साधनेचा पाया आहे. श्री मंगेशदेवाच्या कृपेमुळेच मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे थोर गुरु लाभले. माघ पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या गुरुशक्ती-प्रदान सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी मला आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरुशक्ती प्रदान केली. कुलदेवतेचा जत्रोत्सव आणि गुरुशक्ती प्रदान सोहळा एकाच दिवशी असणे, यावरून ‘श्री मंगेशदेवच मला माझे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापर्यंत घेऊन आला आहे’, असे मला जाणवले अन् कुलदेव आणि गुरुदेव यांच्याविषयी कृतज्ञताभाव दाटून आला.’ – (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०१९)

Leave a Comment