इंद्राला लागलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे निवारण करणारा तमिळनाडू येथील ‘पापनासम्’ येथील पापनासनाथ

अनुक्रमणिका

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे १७.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यात असलेल्या ‘पापनासम्’ या तीर्थक्षेत्री जाऊन पूजा केली.

अगस्ति आणि लोपामुद्रा यांच्या मूर्ती

१. ‘पापनासम्’ या तीर्थक्षेत्राचा इतिहास

दक्षिण तमिळनाडूतील तिरुनेलवेली शहरापासून ५० कि.मी. अंतरावर ताम्रभरणी नदीच्या काठी ‘पापनासम्’ नावाचे गाव आहे. इंद्राने दैत्यगुरु शुक्राचार्य यांचा मुलगा ध्वस्थ या असुराचा संहार केला. त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पाप लागले. या पापाच्या निवारणासाठी इंद्राने ताम्रभरणी नदीच्या काठी येऊन शिवपूजा केली. त्या ठिकाणी राहून शिवपूजा केल्याने इंद्राला लागलेले पाप दूर झाले. त्यामुळे या स्थानाला ‘पापनासम्’ हे नाव पडले. या ठिकाणी शिवाचे मंदिर आहे. येथे ‘पापनासनाथ’ या नावाने शिवाची पूजा केली जाते.

वर्ष २०१८ मध्ये गुरु ग्रहाचा तुला राशीतून वृश्‍चिक राशीत प्रवेश झाला. त्यामुळे निर्माण झालेल्या विशेष योगामुळे ‘पापनासम्’ या ठिकाणी ‘पुष्करयोग’ आला. या वेळी लाखो भाविकांनी ‘पापनासम्’ या ठिकाणी असलेल्या ताम्रभरणी नदीत स्नान केले.

 

२. अगस्ति कल्याण तीर्थ

अगस्ति कल्याण तीर्थाच्या ठिकाणी नामजप करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

पापनासम् हे गाव अगस्ति पर्वताच्या पायथ्याशी आहे. अगस्ति पर्वतावर उगम पावणारी ताम्रभरणी नदी पापनासम्कडे वहात येतांना एके ठिकाणी धबधब्याच्या रूपात खाली पडते. त्या स्थानाला ‘अगस्ति कल्याण तीर्थ’ असे म्हटले जाते.

शिव-पार्वतीच्या विवाहासाठी सर्व ऋषि-मुनी कैलासावर गेल्याने पृथ्वीचा तोल गेला. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी शिवाने अगस्ति ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांना दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. त्यामुळे अगस्ति ऋषि आणि लोपामुद्रा यांना शिव-पार्वतीचा विवाह पहाता आला नाही. त्या वेळी अगस्ति ऋषि पापनासम् या ठिकाणी होते. अगस्ति ऋषि आणि लोपामुद्रा यांच्या मनातील इच्छा जाणून शिव अन् पार्वती यांनी वृषभ वाहनावर बसून विवाहाच्या वेशभूषेत त्यांना दर्शन दिले. तेे स्थान म्हणजे पापनासम् येथील ‘अगस्ति कल्याण तीर्थ.’

अगस्ति ऋषींच्या पादुका असलेल्या गुहेत डावीकडून सर्वश्री सुयोग जाखोटिया, स्नेहल राऊत आणि दिवाकर आगावणे

 

३. ताम्रभरणी नदी

ताम्रभरणी नदी अगस्ति पर्वतावर उगम पावते. ‘अगस्ति ऋषींना शिवपूजा करता यावी’, यासाठी शिवाने गंगेला येथे आणले. या नदीत ‘ताम्र’ या धातूचे प्रमाण पुष्कळ असल्याने या नदीला ‘ताम्रभरणी’ असे नाव पडले.

 

४. सर्व सिद्ध प्रत्येक अमावास्या आणि
पौर्णिमा  या दिवशी शिवाच्या पूजेसाठी अगस्ति
कल्याण  तीर्थावर येत असणे अन् त्या वेळी तिथे चंदनाचा पाऊस पडणे

प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी सर्व सिद्ध भगवान शिवाच्या पूजेसाठी अगस्ति कल्याण तीर्थावर येतात. ‘त्या वेळी येथेे चंदनाचा पाऊस पडतो’, असे म्हटले जाते. त्याची खूण म्हणजे अगस्ति कल्याण तीर्थाच्या चारही बाजूंना असलेल्या दगडांवर आणि दगडांमध्ये साठलेल्या पाण्यात चंदनाच्या पावसाचे थेंब पडलेले आढळतात.

 

५. अगस्ति कल्याण तीर्थाच्या ठिकाणी असलेल्या
अगस्ति ऋषि आणि लोपामुद्रा यांच्या मूर्तींचे दर्शन घेतांना
तिथे एक आजोबा येणे, त्यांनी तेथील सर्व माहिती सांगणे अन् अगस्ति
पर्वतावरील ‘सोल्लिमुत्तू अय्यनार’ या कार्तिकस्वामींच्या मंदिरात घेऊन जाणे

अगस्ति पर्वतावरील ‘सोल्लिमुत्तू अय्यनार’ या मंदिरात जातांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्री. दिवाकर आगावणे

पापनासम् येथील अगस्ति कल्याण तीर्थाच्या ठिकाणी अगस्ति ऋषि आणि लोपामुद्रा यांच्या मूर्ती आहेत. अगस्ति-लोपामुद्रा यांच्या मूर्तीमधील लोपामुद्रा यांच्या मूर्तीचे धड ६ मासांपूर्वी कुणीतरी तोडल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही अगस्ति ऋषि आणि लोपामुद्रा यांचे दर्शन घेत असतांना तिथे एक आजोबा आले. त्यांचे नाव ‘कृष्णा’ होते. त्यांनी आम्हाला तेथील सर्व माहिती सांगितली. ‘जणूकाही ते आम्हा साधकांसाठीच तिथे आले होते’, अशा प्रकारे ते आम्हाला साहाय्य करत होते. ते आजोबा नंतर आम्हाला अगस्ति पर्वतावर असलेल्या ‘सोल्लिमुत्तू अय्यनार’ या कार्तिकस्वामींच्या मंदिरात घेऊन गेले.

 

६. आजोबांनी ‘सक्करे कोल्लि’ आणि
‘ब्रह्म संजीवनी’ या औषधी वनस्पतींविषयी माहिती सांगणे

त्यानंतर त्या आजोबांनी आम्हाला ‘सक्करे कोल्लि’ आणि ‘ब्रह्म संजीवनी’ या दोन औषधी वनस्पतींची ओळख करून दिली. ‘सक्करे कोल्लि’ ही वनस्पती रक्तातील साखरेचे प्रमाण न्यून करण्यासाठी उपयुक्त आहे, तर ‘ब्रह्म संजीवनी’ ही वनस्पती हृदयविकारावर रामबाण औषध आहे.

 

७. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना
पादुकांचे दर्शन होणे, त्यांनी आजोबांना ‘जवळपास
अगस्ति ऋषींच्या पादुका आहेत का ?’, असे विचारल्यावर
आजोबांनी अगस्ति कल्याण तीर्थाच्या पलीकडे जंगलात पादुका असल्याचे
सांगणे आणि आजोबांनी तिकडे नेल्याने गुरुकृपेने अगस्ति ऋषींच्या पादुकांचे दर्शन होणे

अगस्ति कल्याण तीर्थाच्या पलीकडील जंगलात असलेल्या अगस्ति ऋषींच्या पादुका

अगस्ति पर्वतावर जाऊन खाली येत असतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांना पादुकांचे दर्शन झाले. त्या वेळी सद्गुरु काकूंनी समवेत असलेल्या आजोबांना विचारले, ‘‘या ठिकाणी कुठेतरी जवळपास अगस्ति ऋषींच्या पादुका आहेत का ?’’ त्या वेळी ते आजोबा आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, ‘‘हो. अगस्ति कल्याण तीर्थाच्या पलीकडे जंगलात पादुका आहेत.’’ सद्गुरु गाडगीळकाकूंच्या आज्ञेने आजोबा दौर्‍यातील साधकांना अगस्ति ऋषींच्या पादुकांच्या ठिकाणी घेऊन गेले. गुरुकृपेने आणि अगस्ति ऋषींच्या आशीर्वादाने आम्हा साधकांना एका गुहेत असलेल्या अगस्ति ऋषींच्या पादुकांचे दर्शन झाले.

– श्री. विनायक शानभाग, मदुराई, तमिळनाडू. (२२.१.२०१९)

Leave a Comment