प्रयागराज (कुंभनगरी) – शंकराचार्यांनी चालू केलेल्या या कुंभमेळ्याच्या माध्यमातून धार्मिक कार्यासमवेत हिंदूंचे सामाजिक संघटनही व्हायला हवे. आपल्या धर्मध्वजाने सहस्त्रो वर्षे सर्वांना संघटित ठेवले आहे. आताही याच धर्मध्वजाखाली सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनी धर्मशास्त्र जाणून धर्माचरण केल्यास आपली संस्कृती टिकून राहील आणि कोणत्याही प्रकारची प्रलोभने-संकटे आपल्या संस्कृतीवर घाला घालू शकणार नाहीत. नव्या पिढीला येथील प्रदर्शनात दाखवल्याप्रमाणे धार्मिक विधी आणि त्यांचे महत्त्व वैज्ञानिक परिभाषेेत समजावून सांगितले, तर ते सहजपणे स्वीकारतील. सनातन संस्थेच्या शिबिरातून अशा प्रकारचे कार्य युवा साधक करत असल्याचे पाहून आनंद झाला. या माध्यमातून समाजाला दिशा मिळेल. समष्टीच्या कल्याणाचा विचार करून चालू असलेले सनातन संस्थेचे हे कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन काशी येथील महंत मुक्तानंद ब्रह्मचारी यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि सनातनचे संत पू. प्रदीप खेमका उपस्थित होते.