प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनातून धर्मशास्त्राची माहिती देऊन धर्मज्ञान दिले जात आहे. हे प्रदर्शन सर्वांनी पाहून मुलांवर त्याप्रमाणे संस्कार केले पाहिजेत, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील निरंजनी आखाड्याच्या श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी मंदाकिनी महाराज यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या.
या प्रसंगी ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुनिता खेमका यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी श्री श्री १००८ हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, तसेच समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवटही उपस्थित होते.
या प्रसंगी स्वामी मंदाकिनी महाराज म्हणाल्या, ‘‘हे प्रदर्शन पाहून पुष्कळ समाधान वाटले. अनेकजण पैसे, जेवण, कपडे, औषधे दान करत आहेत; पण येथे धर्मशास्त्राची माहिती देऊन धर्मज्ञान दिले जात आहे. जीन्स किंवा सलवार सूट हे स्त्रियांचे अलंकार नसून ‘साडी’ हाच खरा अलंकार आहे. जन्मदिनाच्या दिवशी मेणबत्ती लावून ती फुंकणे अशुभ असते. दिवा लावून ओवाळावे. संस्कार काय असतात, हे मुलांना कळले पाहिजे.’’