प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन धर्म लुप्त झाला, तर सर्व नष्ट होईल. सनातन धर्म जागृत झाला, तर दुष्टांचा विनाश होणार आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेेशच्या बागपत येथील श्री बालाजी धामचे महामंडलेश्वर भैयादास महाराज यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. प्रदीप खेमका अन् संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.
या वेळी महामंडलेश्वर भैयादास महाराज म्हणाले, ‘‘सनातनच्या साधकांच्या चेहर्यावर शांती आणि आनंद असतो. हिंदुजागृतीसाठी तरुण वयात साधक अथक प्रयत्न करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडून निश्चितच संस्कृतीचे रक्षण होणार आहे. मी श्री हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतो की, हे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो आणि जसे श्रीरामाच्या सैन्याचे हनुमंताने रक्षण केले, तसे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे रक्षणदेखील श्री हनुमान यांनी करावे. माझ्या क्षेत्रातही सनातनचे साधना केंद्र बनवू शकू, यासाठी देवाने मला बळ द्यावे.’’
या वेळी त्यांच्या शिष्या ‘भक्ती जागृती सेवा संस्थान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या बाल साध्वी राधादेवी म्हणाल्या, ‘‘या प्रदर्शनाद्वारे सनातन धर्माला सशक्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. सध्याची तरुण पिढी पाश्चात्त्य संस्कृतीला बळी पडू नये, यासाठी सनातन संस्थेचे प्रयत्न स्तुत्य आहेत.’’