प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी नमस्कार करतो. सनातन संस्था सनातन हिंदु धर्मासाठी अद्भुत कार्य करत आहे, असे प्रतिपादन वृंदावन-मथुरा येथील अखंड दयाधामचे महामंडलेश्वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळही उपस्थित होते.
महामंडलेश्वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज पुढे म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन पाहून वाटले की, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती खर्या अर्थाने राष्ट्र अन् सनातन धर्म यांच्यासाठी कार्य करत आहे. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मासाठी कार्य करतांना पहात होतो; पण आपल्या सनातन धर्मासाठी कार्य करतांना कोणाला पाहिले नव्हते. सध्या हिंदूंना नेमका सनातन धर्म कार्य आहे, हे ठाऊक नाही. धर्माचरण कसे करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याची हिंदूंना माहिती नाही. सनातन संस्था याविषयी जनजागृतीचे पुष्कळ चांगले कार्य करत आहे. संस्थेच्या कार्याला पुष्कळ आशीर्वाद आहेत.’’