प्रयागराज (कुंभनगरी), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातनचे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर हिंदूंना आध्यात्मिक माहितीसमवेत त्यांच्यावर कशा प्रकारे आणि का अत्याचार होत आहेत, याची माहिती मिळेल. हे प्रदर्शन पाहून ‘आपल्यावर कशाप्रकारे अन्याय होत आहे’, याची हिंदूंना जाणीव होऊन त्यांच्यात जागृती होईल. सनातनच्या कार्यासाठी आमच्याकडून जेवढे करता येईल, तेवढे सहकार्य आम्ही करू. तुम्ही आमच्या गावात येऊन हे प्रदर्शन लावू शकता. त्याचा सर्व खर्च आम्ही करू, असे प्रतिपादन वैष्णव संप्रदायाचे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असलेल्या नाया गावचे महंत श्री सुंदरदासजी महाराज यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला त्यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत श्री. उखमासिंहजी पटेलही होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी महंत श्री सुंदरदासजी महाराज यांना ‘देवनदी गंगाकी रक्षा करें !’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ भेट दिला.