महर्षि भृगु यांच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना सोहळा संपन्न !

सनातनच्या इतिहासातील सुवर्णक्षण !

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – ‘सर्वही तीर्थे घडली देवा । सद्गुरुचरणासी ।’ असे संत भक्तराज महाराज यांचे वचन आहे. खरेच, विश्‍वातील सर्व नद्या आणि तीर्थे यांचे चैतन्य ज्यात सामावले आहे, त्या गुरुचरणांच्या प्राप्तीसाठीच शिष्य तळमळत असतो. शिष्याच्या जीवनात गुरूंना जेवढे महत्त्व आहे, तसेच त्यांच्या पादुकांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुपादुकांहून श्रेष्ठ या भूतलावर अन्य काहीही नाही. त्रेतायुगात भरताने प्रभु श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून १४ वर्षे अयोध्येचे राज्य केले. श्रीरामाच्या पादुकांनीच भरताला ते कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान केली. रामराज्यासम असलेले हिंदु राष्ट्र चालवण्यासाठीही महर्षि भृगु यांनी चेन्नई (तमिळनाडू) येथील भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्वम् गुरुजी यांच्या माध्यमातून केलेल्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना यांचा दैवी सोहळा साक्षात वैकुंठलोक असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संपन्न झाला अन् सनातनच्या सुवर्णमयी इतिहासात आणखी एक मुकुटमणी रोवला गेला.

पादुका धारण केलेले परात्पर गुरु डॉ. आठवले

चराचरीं व्यापकता जयाची ।
अखंड भेटी मजला तयाची ।
परं पदीं संगम पूर्ण झाला ।
विसरूं कसा मी गुरुपादुकांना ॥

पादुकांचे पूजन करतांना डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, तर पूजा सांगतांना पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी

१० फेब्रुवारी या वसंतपंचमीच्या शुभदिनी झालेल्या पादुका धारण सोहळ्याला अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले उपस्थित राहिले. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना परात्पर गुरु डॉक्टरांना पादुका अर्पण करण्याचे सौभाग्य लाभले. या सोहळ्यात सर्वत्रच्या साधकांना लाभ होण्यासाठी विविध ठिकाणी स्थापन करण्यात येणार्‍या १६ पादुकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केला. रथसप्तमी (१२ फेब्रुवारी) या शुभदिनी गुरुचरणांचा स्पर्श झालेल्या पादुकांचे सद्गुरुद्वयींच्या मंगलहस्ते षोडशोपचार पूजन, पंचारती आणि आश्रमातील ध्यानमंदिरात प्रतिष्ठापना हे विधी करण्यात आले.

सर्वत्रच्या साधकांनी संगणकीय प्रणालीद्वारे या सोहळ्याचा लाभ घेतला.

सोहळ्याला उपस्थित संत आणि मान्यवर

या सोहळ्याला बेळगाव (कर्नाटक) येथील संत प.पू. वासुदेव गिंडे महाराज, पानवळ-बांदा (सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, पू. भगवंतकुमार मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी, पू. (श्रीमती) सुमन नाईक, पू. सदानंद नाईक, पू. संदीप आळशी, पू. पृथ्वीराज हजारे, पू. (कु.) रेखा काणकोणकर, पू. पद्माकर होनप, एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वालेे आदी संत आणि साधक उपस्थित होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू ती. अनंत आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले हेही या वेळी उपस्थित होते.

 

साधकांनी गुरुपादुकांसमोर शरणागतीने नतमस्तक व्हावे !

परात्पर गुरु डॉक्टरांनी धारण केलेल्या पादुकांचे महत्त्व सांगतांना भृगु महर्षि यांनी म्हटले आहे, ‘‘सनातनच्या साधकांना सर्व तीर्थक्षेत्री जाण्याने जे फळ मिळेल, त्याही पेक्षा अधिक फळ गुरुपादुकांसमोर शरणागतीने नतमस्तक झाल्यावर मिळेल. साधकांनी गुरूंची पाद्यपूजा करण्याऐवजी आता त्यांच्या पादुकांची पूजा करावी. परात्पर गुरु डॉ. आठवले जीवनमुक्त आहेत, तरीही साधकांसाठी ते शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत रहाणार आहेत. १२ फेब्रुवारी म्हणजेच रथसप्तमीनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले आत्म्याशी अधिकाधिक एकरूप होऊन म्हणजे अधिकाधिक निर्गुण स्थितीत कार्य करणार आहेत.’’

क्षणचित्रे

१. ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग यांचे भावपूर्ण निवेदन आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी उच्चारलेल्या आर्त मंत्रघोषांमुळे या सोहळ्यात भावक्षण अन् गुरुभक्ती यांचे शिंपण झाले.

२. गुरुपादुका पूजन सोहळ्याच्या वेळी अर्पण करण्यात आलेले जल, अक्षता यांद्वारे ‘ॐ’ ची आकृती निर्माण झाली. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनाही पादुकापूजन करतांना सूक्ष्मातून ‘ॐ’ चा नाद ऐकू आला. गुरुपादुका-पूजनाच्या वेळी आप आणि आकाश या तत्त्वांच्या माध्यमातून ईश्‍वराने दैवी संकेतच दिले.

३. सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्म कुंडलीतील उच्च आध्यात्मिक ग्रहयोग, दैवी घटकांची कारक असणारी महादशा आणि अंतर्दशा यांचे विवेचन करण्यात आले. ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरु डॉक्टरांनंतर त्यांच्या साधकांना साधनेत मार्गदर्शन करण्यासंदर्भातील कार्यभार का सांभाळणार आहेत’, याविषयीच्या ग्रहस्थितीचेही विवेचन करण्यात आले. सनातनचे साधक ज्योतिष विषारद श्री. राज कर्वे यांनी हे विश्‍लेषण केले.

४. रामनाथी आश्रमी उत्सवाला आरंभ !

गुरुपादुका धारण सोहळा आणि प्रतिष्ठापना सोहळा या दोन्ही दिवशी रामनाथी आश्रम भाव अन् चैतन्य यांनी भरून गेला होता. रथसप्तमीच्या सायंकाळी आश्रमात दीपावलीप्रमाणे पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आश्रमातील साधक, साधिका यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. वसंतपंचमीपासून आरंभ झालेला हा सोहळा महर्षींच्या आज्ञेने माघ पौर्णिमेपर्यंत साजरा होणार आहे.

 

भृगु महर्षींच्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या
श्री महालक्ष्मीदेवीचा ‘श्रीं’ हा बीजमंत्र असलेल्या पदकांचे पूजन !

भृगु महर्षींनी या वेळी श्री महालक्ष्मीदेवीचा ‘श्रीं’ हा बीजमंत्र सनातनच्या साधकांना आशीर्वाद स्वरूपात दिला आहे. हा बीजमंत्र लिहिलेल्या सुवर्ण पदकांनाही महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १० फेब्रुवारी या दिवशी हस्तस्पर्श केला. पादुकापूजनानंतर ‘श्रीं’ बीजमंत्ररूपी सुवर्णपदकांचेही षोडशोपचार पूजन करण्यात आले. ‘श्रीं’ बीजमंत्र लिहिलेले पदक स्थापन करण्याविषयी भृगु महर्षींनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णुस्वरूप आहेत, तर ‘श्रीं’ बीजमंत्ररूपी पदक श्री महालक्ष्मीस्वरूप आहे. श्रीविष्णु आणि श्री महालक्ष्मी दोन्ही सदैव समवेत असतात. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका जेथे असतील, त्यासमवेत ‘श्रीं’ बीजमंत्ररूपी पदक असावे.’’

पृथ्वीवर रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन होण्यासाठी
आवश्यक ऊर्जा आणि चैतन्य देण्यासाठी गुरुपादुकांची स्थापना ! – महर्षि भृगु

नाडीवाचनाद्वारे भृगु महर्षि म्हणाले, ‘‘पृथ्वीवर रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन होण्यासाठी आवश्यक ऊर्जा आणि चैतन्य या गुरुपादुकांच्या माध्यमातून सर्व साधकांना मिळणार आहे. ‘अनेक भावी पिढ्यांना सनातनचे कार्य करण्यासाठी शक्ती मिळावी’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरुद्वयींना त्यांच्या पादुका दिल्या आहेत. ‘श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले या पादुकांच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांडाला चैतन्यस्रोत देत आहेत’, असा भाव साधकांनी ठेवावा.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment