केवळ दर्शनानेच मनुष्याची पापे नाहीशी करणारी नर्मदामाता !

डोंगरदर्याकतून वहाणारी नर्मदा नदी

 

१. नर्मदामाहात्म्य

त्रिभिः सारस्वतं पुण्यं सप्ताहेन तु यामुनम् ।
सद्यः पुनाति गाङ्गेयं दर्शनादेव नार्मदम् ॥

– पद्मपुराण

अर्थ : सरस्वती नदीमध्ये ३ दिवस स्नान केल्याने, यमुना नदीत ७ दिवस स्नान केल्याने आणि गंगा नदीत १ दिवस स्नान केल्याने मनुष्याचे पाप नाहीसे होते; परंतु नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच त्याचे सर्व पाप नाहीसे होते.

 

२. नर्मदा नदीची उत्पत्ती आणि भगवान शंकराने तिला दिलेला आशीर्वाद !

भगवान शंकराने एकदा तांडव नृत्य केले असता त्यांना घाम आला. त्या ‘घामापासून नर्मदा नदीची उत्पत्ती झाली’, असे मानले जाते. त्यामुळे ‘नर्मदा ही भगवान शंकराची कन्या आहे’, असे म्हटले जाते. या कन्येने स्त्रीरूप धारण करून शंकराची तपश्‍चर्या केली. भगवान शंकराने प्रसन्न होऊन तिला वर दिला, ‘‘हे नर्मदे, तू सर्व पापांचे हरण करणारी होशील ! तुझ्या पाण्यात असलेले दगड शिवतुल्य होतील !’’

 

३. नर्मदा जयंती

अशी ही नर्मदा कुमारिका असूनही सर्वांची माता आहे. नर्मदेचा उगम मध्यप्रदेशातील अनुप्पुर जिल्ह्यातील अमरकंटक येथे झाला. नर्मदा, माघ शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी अश्‍विनी नक्षत्रावर दुपारी १२ वाजता प्रकट झाली; म्हणून या दिवशी ‘नर्मदा जयंती’ साजरी करतात.

 

४. पश्‍चिमवाहिनी असलेली एकमेव नर्मदा नदी !

हिचा उगम मैकल पर्वतावर असल्याने हिला ‘मैकलकन्या’ असेही म्हणतात. भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी म्हणून नर्मदेचा उल्लेख होतो. नर्मदा ही अशी एकमेव नदी आहे की, ती पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वहाते. तिची लांबी १ सहस्र ३१२ कि.मी. असून गुजरातमधील भडोच येथे ती अरबी समुद्राला मिळते. अशी ही पवित्र नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून वहाते.

 

५. भारतातील पवित्र नद्यांतील केवळ नर्मदेचीच परिक्रमा
केली जात असणे आणि सर्वांत प्रथम परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केलेली असणे

भारतात ज्या पवित्र नद्या आहेत, त्यांतील केवळ नर्मदेचीच परिक्रमा (प्रदक्षिणा) करतात. अनेक साधू-संतांनी सांगितले, ‘‘सर्व देवादिकांनी आणि साधूसंतांनी नर्मदेची परिक्रमा केलेली आहे. त्यांत सर्वांत प्रथम परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली असून त्यांना २७ वर्षे इतका कालावधी लागला होता.’’

 

६. महापुरुषांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला नर्मदेचा परिसर !

अशा या महापुरुषांच्या पदस्पर्शाने नर्मदेचा परिसर अत्यंत पवित्र झाला आहे. नर्मदेचा किनारा ही तपोभूमी आहे. आजही नर्मदेच्या दोन्ही तटांवर अनेक साधूसंत आणि ऋषिमुनी यांचे आश्रम आहेत अन् तेथे परिक्रमा करणार्‍यांच्या वास्तव्याची आणि जेवणाची सोय केली जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

७. जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त करून शाश्‍वत आनंदाची प्राप्ती करून देणारी नर्मदा !

‘नर्मदा’ या नावातच एक गूढ अर्थ दडलेला आहे. ‘नर्म’ म्हणजे आनंद आणि ‘दा’ म्हणजे देणारी, म्हणजे ‘सर्वांना जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून, बंधनांतून मुक्त करून शाश्‍वत आनंदाची प्राप्ती करून देणारी नर्मदा होय.’

 

८. नर्मदेला ‘रेवा’ असेही संबोधन असणे

सातपुडा, विंध्याचल या विशाल पर्वतांना, तसेच अनेक छोट्या-मोठ्या पर्वतांना तोडत-फोडत, खळखळ धावत, नाचत-बागडत, ‘रव-रव’ आवाज करत जाते; म्हणून तिला ‘रेवा’ हे नाव मिळाले आहे.

 

९. नर्मदा म्हणजे जगज्जननी माता !

तसे पाहिले, तर ती जगज्जननी माताच आहे. ती आपल्या सर्वच लेकरांना आपल्या दिव्य मायेच्या पदराखाली घेऊन तान्हुल्यांना, बालकांना ज्ञानामृताचे स्तनपान करवते.

 

१०. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला (रथसप्तमीला) नर्मदादेवी प्रगट
झाल्याने हा दिवस नर्मदाकिनारी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणे

नर्मदेला जन्म देणारा माता आणि पिता साक्षात् देवांचा देव महादेवच असल्याने श्री नर्मदादेवीचे वर्णन ब्रह्मदेवसुद्धा करू शकणार नाही, तर इतरांची काय कथा ? अशी ही नर्मदामैय्या माघ शुक्ल पक्ष सप्तमीला (रथसप्तमीला) प्रगट झाली आहे; म्हणून हा दिवस नर्मदाकिनारी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

(संदर्भ : परम पूज्य श्रीराम महाराज यांनी नर्मदापुराणात लिहिलेल्या आशीर्वचनातून संकलित)

 

११. नर्मदेच्या परिक्रमेचे प्रकार

नर्मदेची परिक्रमा ३ प्रकारे केली जाते – १. रुद्र परिक्रमा २. जल हरि परिक्रमा आणि ३. हनुमान परिक्रमा. जल हरि परिक्रमा आणि हनुमान परिक्रमा या अत्यंत कठीण असल्याने फारच थोडे भाविक या परिक्रमा करतात. अधिकाधिक भाविक रुद्र परिक्रमा करतात.

 

१२. नर्मदा परिक्रमेचा कालावधी

नर्मदा परिक्रमेचा कालावधी ‘कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी ते आषाढ शुक्ल पक्ष दशमी’ असा असतो. पुढे चातुर्मासात आषाढ शुक्ल पक्ष एकादशी (आषाढी एकादशी) ते कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (कार्तिकी एकादशी) या कालावधीत परिक्रमा बंद असते; कारण पावसाच्या पाण्याने नर्मदेला अनेक ठिकाणी पूर येतो आणि परिक्रमेचे मार्ग बंद होतात. त्यामुळे या कालावधीत, म्हणजे चातुर्मासात अनेक परिक्रमावासी नर्मदेच्या काठावरील संतांच्या आश्रमात मुक्काम करून कार्तिकी एकादशीनंतर पुन्हा वाटचाल करतात. ज्या भाविकांना चालत परिक्रमा शक्य नसते, ते गाडीनेही परिक्रमा करतात.

 

१३. नर्मदेची विविध विलोभनीय रूपे

नर्मदा परिक्रमा पायी करतांना नर्मदामातेची अनेक रूपे पहावयास मिळतात. कधी विशाल पात्र, कधी शांत वहाणारी नर्मदामाता, कधी धुवाधार (जोराने पडणारा प्रवाह) वहाणारे आक्रमक रूप, तर कधी सात खडकांमधून सप्त धारांच्या रूपात खळखळत वहाणारी नर्मदामाता बघायला मिळते.

 

१४. नर्मदेची परिक्रमा करतांना येणार्‍या विविध अनुभूती

नर्मदेची परिक्रमा म्हणजे अनेक अनुभवांचे कोठार आहे. श्रद्धेने आणि निष्ठेने परिक्रमा करणार्‍याला त्याच्या पात्रतेप्रमाणे अनुभव येतात.

अ. ती खरोखरच आईसारखी लेकरांचा सांभाळ करत असल्याची अनुभूती येते.

आ. ती कधी कधी रागावते आणि शिक्षाही करते; पण थोड्याच वेळात योग्य मार्ग दाखवते.

इ. एखाद्या ठिकाणी वाट चुकल्याचे लक्षात आल्यावर लगेच ‘नर्मदे हर’ हा मंत्र श्रद्धेने आणि मोठ्याने म्हटल्यावर कोणीतरी योग्य मार्ग दाखवणारा भेटतोच, हे निश्‍चित आहे.

 

१५. नर्मदा परिक्रमा म्हणजे जीवन
जगण्याची कला शिकण्याचे एक पारमार्थिक विद्यापीठ !

या परिक्रमेत अनेक विचारांची माणसे भेटतात, तसेच अनेक भाषा, वेगवेगळे स्वभाव, लहान-थोर, वयस्कर, साधूसंत या सर्वांकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे असते. अनेकांकडून निरपेक्ष प्रेम मिळते, तर काही जणांकडून अपमानही होतो. ‘घरच्या सर्व सवयींना फाटा देऊन वेगळ्या वातावरणात रहाणे, येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला संयमाने सामोरे जाणे आणि मन अधिकाधिक नाम-चिंतनात रममाण करणे’, हे सर्व या परिक्रमेत मला शिकायला मिळाले. त्याचा उपयोग परिक्रमा पूर्ण करून झाल्यावर पुढील जीवनाच्या वाटचालीत निश्‍चित होत असतो.

 

१६. नर्मदा परिक्रमा करण्यासाठी ‘सात्त्विक विचार, मन आणि बुद्धी यांचा
निश्‍चय अन् त्याग’ आवश्यक असून गुरुकृपा असल्यावरच नर्मदा परिक्रमा पूर्ण होऊ शकणे

नर्मदा परिक्रमेला कुठूनही आरंभ करता येतो; पण परिक्रमेची सांगता ओंकारेश्‍वर येथेच होते. अशा या परिक्रमेविषयी अनेक विचारवंतांनी स्वतः परिक्रमा करून त्यांचे अनुभव पुस्तक रूपाने लिहिले आहेत. त्यांचाही उपयोग होतो. या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नर्मदामातेची इच्छा आणि सद्गुरूंचे आशीर्वाद ! आपली पूर्वपुण्याई आणि थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद यांचे पाठबळ असल्यावरच नर्मदा परिक्रमा करणे शक्य होते. त्यासमवेत ‘सात्त्विक विचार, मन आणि बुद्धी यांचा निश्‍चय अन् त्याग’ हे सर्व आचरणात आणण्यासाठी गुरुकृपा असली पाहिजे, तरच ही १ सहस्र २०० कि.मी. ची नर्मदा परिक्रमा पूर्ण होते. हर नर्मदे, हर नर्मदे, हर नर्मदे !’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “केवळ दर्शनानेच मनुष्याची पापे नाहीशी करणारी नर्मदामाता !”

  1. नर्मदे हर
    नर्मदा माता परिक्रमा विषयाचे अत्यंत उपयुक्त व सुंदर लेख वाचून आनंद झाला

    Reply

Leave a Comment