प्रयागराज कुंभमेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या प्रदर्शनाला विविध संत, महंत तसेच विदेशी भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
प्रयागराज (कुंभनगरी), ७ फेब्रुवारी (वार्ता.) – शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सन्मान केला.
या प्रसंगी आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज म्हणाले की, हे प्रदर्शन अत्यंत चांगले असून हिंदूंसाठी प्रेरणादायी आहे. सनातन हिंदु संस्कृती कशी प्रस्थापित करायची आणि हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता का आहे, याची माहिती या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. कुंभमेळ्यामध्ये सनातनचे प्रदर्शन हे वास्तवत: ‘सनातन’चे दर्शन घडवत आहे. सरकारने प्रदर्शनात मांडण्यात आलेले धर्मशिक्षण इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत दिले पाहिजे. यातून मुलांना भारतीय संस्कृतीची माहिती मिळेल. त्यातून सनातन धर्म सशक्त होऊन भारत बलशाली बनेल.