‘नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेल्फेअर
असोसिएशन’च्या वतीने सनातन संस्थेच्या प्रवचनाचे आयोजन

प्रयागराज (कुंभनगरी), ५ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्माने सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘मोक्ष’ या पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. ‘नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष सोपान मेहेर यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील भाविकांकरिता काशी-प्रयाग यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा ३ फेब्रुवारी या दिवशी कुंभनगरी येथे आली असता सनातन संस्थेच्या वतीने या यात्रेकरूंसाठी आयोजित प्रवचनाच्या कार्यक्रमात श्री. राजहंस बोलत होते. या वेळी २५० हून अधिक भाविक उपस्थित होते.

श्री. राजहंस पुढे म्हणाले की, परिश्रमपूर्वक प्राप्त केला जातो, तो पुरुषार्थ आहे. ज्याप्रमाणे आपण प्रपंच परिश्रमपूर्वक करतो, त्याचप्रमाणे प्रपंचात राहून परमार्थ करणे आवश्यक आहे. यासाठी अनेकजण विविध ठिकाणी तीर्थयात्रांना जात असतात. या तीर्थयात्रा सहलीला आल्यासारख्या करू नका. आपण सर्व पुण्यवान आहोत म्हणून येथपर्यंत आलो आहोत. धर्मात कर्मफल आणि पुनर्जन्म सिद्धांत सांगितला आहे. त्यामुळे सर्वांनी तन, मन, धन आणि बुद्धी अर्पण करून चांगली साधना करावी, असे सांगून श्री. राजहंस यांनी नामसाधनेची विस्तृतरित्या माहिती दिली.
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, शालेय शिक्षणातून भारतीय संस्कृतीचे नि धर्माचे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या धर्माची माहिती योग्य पद्धतीने मिळत नाही. यासमवेतच धर्मावर होणारे आघात कळू दिले जात नाहीत. परिणामी भावी पिढी धर्माचरणापासून दूर जाऊ लागली आहे.
या वेळी श्री. वर्तक यांनी ‘वाढदिवस कसा साजरा करावा’, ‘देवदर्शन कसे घ्यावे’ आदी धर्माचरणाची माहिती दिल्यावर सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या माहितीप्रमाणेच आचरण करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे आपल्या गावात बालसंस्कारवर्ग आणि धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी संस्थेला संपर्क करण्याचे उपस्थित भाविकांना आवाहन केले.
याप्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी अनिल सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सनातनच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. प्रवचनाच्या शेवटी भाविकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.