
प्रयागराज (कुंभनगरी), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातनचे प्रदर्शन पहाण्याचे मला भाग्य लाभले. पुढील पिढीला देण्यासाठी या प्रदर्शनातून बरेच काही घेता येईल. भावी पिढीला पाठ्यपुस्तकांतून या प्रदर्शनातील विषय शिकवले पाहिजेत. सध्याच्या काळात सनातनने घेतलेले विषय ज्वलंत आहेत. विशेषकरून मी सरकारला असे सांगीन की, सनातनचे विषय घेऊन ते पाठ्यपुस्तकांत घालावेत. याचे कारण असे की, प्रदर्शन लावून आपण सर्वांना पालटू शकत नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तकांत हे विषय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन समाजसेवक आणि गंगा नदी प्रदूषण मुक्तीचे आंदोलक श्री. आर्य शेखर यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.
कुंभनगरीतील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेले प्रदर्शन पाहिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी चर्चा केली.
श्री. आर्य शेखर पुढे म्हणाले, ‘‘प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण या देवतांचे विषय अभ्यासक्रमात असते, तर आज राममंदिराचा प्रश्न निर्माण झाला नसता. आज गंगा अभ्यासक्रमाचा विषय असती, तर ती दूषित झाली नसती. आपल्या संस्कृतीचे ज्ञान लोक विसरत आहेत, त्याची जाणीव या प्रदर्शनातून होते. चांगल्या विचारांमुळे आपल्यात सत्कर्म करण्याची वृत्ती निर्माण होते. आपण स्वतःला पालटले, तर जग पालटेल. राष्ट्रासाठी सनातन संस्था जे काही कार्य करत आहे, त्याला माझ्या शुभेच्छा !’’