प्रयागराज (कुंभनगरी), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – मी गुरु आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा छोटासा सेवक आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर असे वाटते की, या कार्याला केवळ प्रदर्शनापर्यंत सिमीत ठेवू नये. धर्म एक आहे; मात्र सनातन धर्मातील जेवढे पंथ (संप्रदाय) आहेत, तेथे आपण भेदभाव सोडून प्रवेश करतो. आपल्या गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे कार्य पूर्ण होण्यासाठी अधिक कालावधी लागणार नाही. यश निश्चित मिळते. परमात्मा आपल्याला शक्ती देईल. आपण सर्व कार्य करत असतांना सर्वजण बरोबरीचे अधिकारी आहोत. येथे कोणी लहान-मोठा असत नाही, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्रीकृष्ण निवास तथा पूर्णानंद आश्रमाचे महामंडलेश्वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज (छोटे महाराज) यांनी ३१ जानेवारी या दिवशी येथे केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला महामंडलेश्वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज, महामंडलेश्वर श्री स्वामी श्याम चैतन्यपुरी महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) आणि महंत स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी तिन्ही महाराजांचा पुष्पहार घालून सन्मान केला, तसेच या तिघांना ‘देवनदी गंगाकी रक्षा करे !’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ भेट दिला.