प्रयागराज (कुंभनगरी), ४ फेब्रुवारी (वार्ता.) : कुंभनगरीत लावलेले धर्मशिक्षण प्रदर्शन दिव्य असून ते पाहिल्याने मनुष्याच्या जीवनात सत्य आणि सात्त्विकता यांची वृद्धी होत आहे, असे प्रतिपादन शास्त्र धर्म प्रचार सभेचे महासचिव ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. शिवनारायण सेन यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.
मूळचे कोलकाता येथील असलेले डॉ. सेन पुढे म्हणाले की, सत्य सनातन धर्माची प्रतिष्ठा आणि जागृती यांसाठी हिंदु जनजागृती समिती वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत आहे. या प्रदर्शनामुळे हिंदूंमध्ये जागृती होऊन ते भक्ती आणि शक्ती या मार्गाने पुढे जावोत. मी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि श्री. चेतन राजहंस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळे मी येथे संत आणि साधक यांच्या सान्निध्यात येऊन परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा आशीर्वाद अनुभवत आहे. सर्व हिंदूंनी हे प्रदर्शन पहाण्यासाठी येऊन ते आपल्या हृदयात साठवून ठेवले पाहिजे, कारण ही एक प्रकारे मानसपूजा असून पूजेत मानसपूजेला मोठे महत्त्व असते.