कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते. मनुष्याची धडपड जास्तीतजास्त सुख कसे मिळेल, यासाठी असते. याकरता प्रत्येक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे विषयसुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो; परंतु विषयसुख हे तात्कालिक आणि निकृष्ट प्रतीचे असते, तर आत्मसुख, अर्थात आनंद हा चिरंतन अन् सर्वोच्च प्रतीचा असतो. ते आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे ‘अध्यात्म’.
अध्यात्माचे इतके महत्त्व असतांना खेदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च आनंद आणि सर्वज्ञता देणार्या या विषयाकडे फारच थोडे जण वळतात. विषयसुखाच्या अनंतपटीने आनंद असतो, हे कळले तर विषयसुखापेक्षा आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करील. असे प्रयत्न व्हावेत, हाच उद्देश मनात ठेवून हा लेख लिहिला आहे !
अध्यात्माचे मानवी जीवनातील महत्त्व कळण्यासाठी सर्वप्रथम मानवाचे ध्येय, तसेच मानवी जीवनासंबंधी अन्य काही गोष्टी यांविषयी थोडे जाणून घेऊ.
१. मानवाचे ध्येय – चिरंतन आणि सर्वोच्च आनंदाची प्राप्ती
किडामुंगीपासून प्रगत मानवप्राण्यापर्यंत प्रत्येक प्राणी, सर्वोच्च सुख सातत्याने कसे मिळेल, यासाठीच धडपडत असतो; पण सुख कसे मिळवायचे, हे शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये शिकवले जात नाही. सर्वोच्च आणि सातत्याने टिकणार्या सुखास ‘आनंद’ असे म्हणतात. हा आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र’.
पाश्चात्त्य विज्ञान जीवन अधिकाधिक सुखी करत आहे; पण त्यामुळे मानव ईश्वरापासून, म्हणजे सच्चिदानंदापासून दूर दूर जात आहे. – प.पू. डॉ. आठवले
२. सुख- दुःखाची कारणे
सुख-दुःखाची कारणे शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असतात. अशा प्रकारच्या दुःखाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. शारीरिक
रोगग्रस्त असतांना शरिराला दुःख जाणवणे
आ. मानसिक
कोणीतरी फसवल्यास मनाला दुःख होणे
इ. आध्यात्मिक
अनेकदा प्रयत्न करूनही परीक्षेत उत्तीर्ण न होणे, लग्न न जमणे इत्यादींमुळे दुःख होणे
सुखाची कारणेही शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असतात; पण त्यांचा सहसा कोणी विचार करत नाही; कारण त्यांचा विचार करण्याची आवश्यकताच वाटत नाही !
३. दुःखाचे कारण बुद्धीअगम्य म्हणजे आध्यात्मिक आहे, हे बुद्धीने कसे ओळखायचे ?
पुढील दोन सूत्रांपैकी एखादे सूत्र लागू पडत असल्यास दुःख बहुधा आध्यात्मिक कारणामुळे झालेले असते.
अ. पुष्कळ प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे यश न मिळणे
आ. एखाद्या कुटुंबात बर्याच जणांना आध्यात्मिक त्रास असणे, उदा. एका कुटुंबात एक मुलगा मनोरुग्ण होता, दुसर्याच्या लग्नानंतर दहाव्या दिवशीच पती-पत्नी विभक्त झाले, तिसर्याने शिक्षण अर्धवट सोडले, तर दिसायला सुंदर, पदव्युत्तर शिक्षण झालेल्या आणि चांगले वेतन असलेल्या मुलीचे लग्नच जमत नव्हते. या सर्व गोष्टींचा ताण आई-वडिलांच्या मनावर आला होता. थोडक्यात, घरातील प्रत्येक जण दुःखी होता. अशा वेळी बहुधा पूर्वजांच्या अतृप्त लिंगदेहांमुळे त्रास होत असतो.
४. अध्यात्माचे महत्त्व
वरील सर्व विवेचनावरून लक्षात आले असेल की, ऐहिक आणि / किंवा पारमार्थिक अशा दोन्ही विषयांच्या संदर्भात प्रत्येकासाठी अध्यात्म हा विषय उपयुक्त आहे. ही उपयुक्तता पुढीलप्रमाणे आहे.
४ अ. चिरंतन आणि सर्वोच्च आनंद देणारा विषय
आपल्याला सदोदित सर्वोच्च सुख मिळावे, असे सूक्ष्मातीसूक्ष्म प्राण्यापासून सर्वांत प्रगत अशा मनुष्यप्राण्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी त्याची क्षणोक्षणी धडपड चालू असते. चिरंतन सर्वोच्च सुख (यालाच आनंद म्हणतात.) कसे प्राप्त करून घ्यायचे, हे शिकवणारे शास्त्र, म्हणजे अध्यात्मशास्त्र.
४ आ. सर्वज्ञता देणारा विषय
विश्वात अनंत विषय असल्याने सर्वांचा अभ्यास करून सर्व विषयांत नैपुण्य मिळवणे जन्मोजन्मी अभ्यास केला, तरी शक्य नाही. सर्वज्ञ अशा ईश्वराशी एकरूप व्हावयाचे असेल, तर सर्वज्ञता असायलाच हवी. त्यासाठी परमेश्वराने अध्यात्म या विषयाची सोय केली आहे. अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, त्यात सर्वज्ञता आली की, सर्व विषयांत सर्वज्ञता येते. याचे कारण म्हणजे अध्यात्मापासूनच सर्व विषयांची निर्मिती आहे.
४ इ. जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची संधी
मनुष्याचा जन्म दोन कारणांसाठी पुनःपुन्हा होतो. पहिले ६५ प्रतिशत (टक्के) कारण म्हणजे प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि दुसरे ३५ प्रतिशत कारण म्हणजे आनंदाची प्राप्ती होण्यासाठी आध्यात्मिक उन्नती करून घेणे. ही दोन्ही कारणे अध्यात्माशी संबंधित आहेत.
४ ई. सकाम आणि निष्काम साधनेसाठी उपयुक्त
संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।’ याचा अनुभव बहुतेकांना असतो. सर्वसाधारणपणे मानवी जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आनंद कसा मिळवायचा, हे ठाऊक नसल्याने प्रत्येक जण पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे थोडा वेळ तरी सुख मिळावे, यासाठी प्रयत्न करतो, उदा. आवडती वस्तू खाणे; तसेच दुःख टाळण्याचाही प्रयत्न करतो, उदा. रुग्णाईत झाल्यास औषध घेणे, दूरचित्रवाणी संच बिघडला, तर व्यवस्थित करून घेणे इत्यादी. थोडक्यात सांगायचे, तर पुढील दोन प्रकारच्या रोगांत आध्यात्मिक स्तरावरील उपाय (उदा. नामजप) महत्त्वाचे असतात.
१. वृद्धापकाळ, असाध्य रोग आणि मरण यांविषयी मानव काहीही करू शकत नाही. अशा प्रसंगी एखाद्याला निराशा आलेली असल्यास तिच्यावर उपचार म्हणून तत्त्वज्ञाची भूमिका निर्माण करण्यासाठी.
२. निरर्थक विचारध्यास (ऑब्सेशन) या मनोविकारात रुग्णाचे मन गुंतलेले रहावे यासाठी.
४ उ. जीवनातील ८० टक्के समस्या सोडवण्यासाठी सहाय्य
सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात २० टक्के समस्या शारीरिक आणि / किंवा मानसिक कारणांमुळे निर्माण होतात, ३० टक्के समस्या शारीरिक आणि / किंवा मानसिक, तसेच आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात आणि उरलेल्या ५० टक्के समस्या निवळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. म्हणजेच जीवनातील ८० टक्के समस्या साधनेमुळे सुटतात किंवा त्या सहन करण्याची (प्रारब्ध भोगण्याची) शक्ती साधनेमुळे मिळते.
४ ऊ. ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी लाभदायक
संसारात निश्चिती नाही, पदोपदी संकटे आहेत. याउलट परमार्थात आनंद मिळण्याची निश्चिती आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘तुझा सगळा परमार्थ जर देहासाठी असेल, देह सुखी असावा, देहाला रोग नसावा इत्यादींसाठी असेल, तर ते आपली स्वतःची कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखे आहे.’ ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी, म्हणजे प्रत्येकासाठी अध्यात्म हा विषय उपयुक्त आहे.
१. ऐहिक सुख इच्छिणारे
सकाम साधनेने यांना सुख मिळते, तसेच यांचे दुःखही न्यून (कमी) होते.
२. पारमार्थिक आनंद इच्छिणारे
यांना निष्काम साधनेने आनंदावस्था अनुभवता येते, तसेच त्यांच्या ऐहिक दुःखातही घट होते.
अध्यात्म हा केवळ बौद्धिक स्तरावर समजून घेण्याचा विषय नाही, तर प्रत्यक्षात स्वतः कृती केल्यावर त्याची अनुभूती घेण्याचा विषय आहे. हा लेख वाचून काही जणांनी तरी साधनेला आरंभ करावा आणि साधनेने त्यांच्या अंतर्यामी आनंदाचा झरा लवकर निर्माण व्हावा, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !
अप्रतिम माहिती. अध्यात्माचे महत्त्व पटले.
“संसारात निश्चिती नाही, पदोपदी संकटे आहेत. याउलट परमार्थात आनंद मिळण्याची निश्चिती आहे” हे अगदी मनापासून पटले.