श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील प्रसिद्ध श्री हालसिद्धनाथ यात्रा आणि भाकणूक यांचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैज्ञानिक संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘बेळगाव जिल्ह्यात कोल्हापूरपासून जवळच श्री हालसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्ली. दिसायला ही गावे दोन असली, तरी त्या दोन्ही गावांना श्री हालसिद्धनाथांवरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे. श्री क्षेत्र आप्पाची वाडी आणि कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘भाकणूक’ ! भाकणूक म्हणजे आगामी घडणार्‍या गोष्टी किंवा घटना गेय स्वरूपात पू. भगवान डोणे (वाघापुरे) यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ देव सांगतात.
२५ ते २९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्ली येथे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने श्री हालसिद्धनाथ यात्रा, भाकणूक आणि श्री हालसिद्धनाथ देवस्थान यांसंदर्भात विज्ञानाद्वारे संशोधन करण्यात आले. या संशोधनांतर्गत चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
पू. भगवान डोणे महाराज

१. श्री हालसिद्धनाथांचा इतिहास

१ अ. निपाणकर आणि नाथ

‘श्री हालसिद्धनाथ यांना नवनाथांपैकी गहिणीनाथ किंवा रेवणनाथ यांचा अवतार समजले जाते. नाथ समाधीकरिता जागा शोधत-शोधत फिरत निपाणी येथे आले. तेव्हा निपाणीच्या गादीवर आप्पासाहेब निपाणकर-देसाई होते. त्यांची कुलदेवी श्री भवानीदेवीवर निस्सीम भक्ती होती. त्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन नाथांनी निपाणकरांच्या घरी गायी राखण्याची चाकरी पत्करली. तेव्हा नाथांना कुणीही ओळखले नव्हते. अन्य चाकरांप्रमाणे नाथांनाही शिळे अन्न दिले जात असे. नाथ ते अन्नही गायीला देऊन स्वतः उपाशी रहात. त्यामुळे एक वांझ गाय नाथांना पिण्यासाठी दूध देऊ लागली. प्रत्येक दिवशी असाच चमत्कार होऊ लागला; मात्र एका व्यक्तीने चहाडी केली. ‘निपाणकरांचा एक चाकर गायीचे दूध चोरून पितो’, असे समजताच निपाणकरांनी कोणतीही चौकशी केली नाही. शिक्षा म्हणून नाथांना रूईचा चिक पिण्यासाठी दिला. तो चिक नाथ प्यायले आणि त्याचेही दूध झाले. त्यानंतर मात्र त्यांनी ‘तुमच्या ७ पिढ्या निर्वंश होतील’, असा शाप निपाणकरांना दिला. निपाणकर नाथांना शरण गेले आणि त्यांनी उरलेले आयुष्य नाथसेवेत घालवले. तेव्हा नाथ तेथून निघाले.

१ आ. श्री हालसिद्धनाथ आणि चमत्कार

रूईचा चिक दूध म्हणून पिऊन ते दूध असल्याचे सिद्ध केल्याने (कानडीमध्ये ‘हाल’ म्हणजे दूध) नाथांचे ‘हालसिद्धनाथ’ असे नाव पडले आहे. त्यानंतर नाथांनी वेदगंगा पार करण्यासाठी नावाड्याला ‘नाव पाण्यात घाल’, असे सांगितले; मात्र त्याने ते ऐकले नाही. त्याच्या उद्धटपणाविषयी त्याला शाप दिला. त्यानंतर नाथांनी पाण्यावरच एक घोंगडे अंथरले. त्यावर भंडारा टाकला आणि घोंगड्यावरून त्यांनी वेदगंगा पार करून कुर्ली गावात प्रवेश केला.

१ इ. ‘आप्पाचीवाडी’ हे नाव कसे पडले ?

गिरी, पुरी, भारती आणि गोसावी या चार संप्रदायांपैकी कुर्लीमध्ये गिरी संप्रदायाचा एक मठ आहे. त्या ठिकाणी श्री राजगिरी महाराज नावाचे एक अत्यंत ज्ञानसंपन्न महात्मे होते. त्यांनी नुकतीच तेथेच संजीवनसमाधी घेतली होती. त्या समाधीचे दर्शन घेताच ती भूमी आपल्याही समाधीसाठी अतिशय योग्य असल्याचे नाथांच्या लक्षात आले. त्यांनी ध्यान लावून श्री राजगिरी महाराजांशी चर्चा करून स्वतःच्या समाधीची वेळ, स्थळ आदी ठरवले असावे. त्यानंतर काही दिवस कुर्ली येथे नाथांनी वास्तव्य केले. गावातील ५ ठाणी (ठिकाणे) नाथांच्या वास्तव्याने पवित्र झाली आहेत. नाथांनी गावातील टवाळखोर युवकांना शाप देऊन हद्दपार केले. त्यांनी अनेक लीला केल्या. त्यानंतर कुर्ली येथील ओढ्याच्या काठाला असणार्‍या वस्तीवर नाथ आले. तेथे निपाणकरांना ‘श्री जोतिबाची मूर्ती तुझ्याच हस्ते पुन्हा मूळ जागेवर बसेल’, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर चैत्र पौर्णिमेला ओढ्यावरील चिंचेच्या वनात नाथ समाधीस्थ झाले. त्यामुळे त्या वस्तीला श्री हालसिद्ध आप्पाचीवाडी, म्हणजेच ‘आप्पाचीवाडी’ असे नामकरण झाले.’

 

२. चाचणीचे स्वरूप

‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

या संशोधनांतर्गत पुढील सर्व घटकांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

२ अ. श्री हालसिद्धनाथ देवस्थान आणि श्री हालसिद्धनाथ यात्रा यांच्याशी संबंधित घटक

१. श्री क्षेत्र कुर्ली येथील मंदिरातील श्री हालसिद्धनाथांच्या प्रतिमेला वाहिलेला भंडारा (हळद) आणि तुलनेसाठी सर्वसाधारण हळद

२. श्री हालसिद्धनाथांची पालखी, कारी वृक्ष (श्री हालसिद्धनाथांचे विश्रांतीस्थान), श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आणि श्री हालसिद्धनाथांची संजीवन समाधी

३. श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेत पालखीसमवेत असणारा अश्‍व (घोडा) – उत्सवापूर्वी आणि उत्सवानंतर

२ आ. पू. भगवान डोणे (वाघापुरे) महाराज आणि त्यांच्याशी संबंधित घटक

१. पू. भगवान डोणे (वाघापुरे) महाराज – भाकणुकीपूर्वी

(पू. भगवान डोणे महाराज श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे जाण्यापूर्वी) आणि भाकणुकीनंतर (पू. भगवान डोणे महाराज श्री क्षेत्र कुर्ली येथे आल्यानंतर)

२. पू. भगवान डोणे महाराजांच्या खांद्यावरील घोंगडी आणि तुलनेसाठी सर्वसाधारण घोंगडी

३. पू. भगवान डोणे महाराज यांची भंडार्‍याची पिशवी, काठी आणि त्यांच्याकडील शाळीग्रामसारखा दिसणारा पाषाण (तो त्यांच्या पूजेतील असून यात्रेमध्ये त्यांच्यासमवेत असतो.)

 

३. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, तसेच
एकूण प्रभावळ यांच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

३ अ. श्री हालसिद्धनाथांशी संबंधित सर्वच
घटकांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

सर्वच व्यक्ती किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

१. सर्वसाधारण हळदीपेक्षा श्री हालसिद्धनाथांच्या प्रतिमेला वाहिलेल्या भंडार्‍यामधील (हळदीमधील) सकारात्मक ऊर्जा दुपटीहून अधिक होती.

२. श्री हालसिद्धनाथांची पालखी, कारी वृक्ष (त्यांचे विश्रांतीस्थान) आणि त्यांची प्रतिमा यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

३. श्री हालसिद्धनाथांच्या संजीवन समाधीमध्ये सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

४. श्री हालसिद्धनाथांच्या पालखीसह असणार्‍या अश्‍वाच्या सकारात्मक ऊर्जेत उत्सवानंतर वाढ झाली.

३ आ. भाकणुकीनंतर पू. भगवान डोणे महाराज यांच्या सकारात्मक ऊर्जेत दीडपटीहून अधिक वाढ झाली, तसेच त्यांच्याकडील घोंगडी, भंडार्‍याची पिशवी, काठी आणि पाषाण या वस्तूंमध्येही सकारात्मक ऊर्जा होती.
३ इ. श्री हालसिद्धनाथांच्या संदर्भातील चाचणीतील कोणत्याही घटकामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही, तसेच भाकणूक सांगणारे पू. भगवान डोणे महाराज यांच्यामध्ये आणि त्यांच्याकडील वस्तूंमध्येही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
३ ई. श्री हालसिद्धनाथांशी संबंधित घटकांची एकूण प्रभावळ सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिच्या एकूण प्रभावळीपेक्षा पुष्कळ अधिक असणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

१. सर्वसाधारण हळदीच्या एकूण प्रभावळीपेक्षा (२ मीटर) श्री हालसिद्धनाथांच्या प्रतिमेला वाहिलेल्या भंडार्‍याची (हळदीची) एकूण प्रभावळ (३.८५ मीटर) अधिक होती.

२. श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आणि श्री हालसिद्धनाथांची संजीवन समाधी यांची एकूण प्रभावळ अनुक्रमे २१ मीटर आणि २५ मीटर यांच्यापेक्षा अधिक आहे. (जागा अपुरी असल्याने त्यापेक्षा अधिक असलेली एकूण प्रभावळ मोजता आली नाही.)

३. श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेत पालखीसह असणार्‍या अश्‍वाच्या एकूण प्रभावळीत उत्सवानंतर थोडी वाढ झाली.

३ उ. पू. भगवान डोणे महाराज आणि त्यांच्याकडील वस्तू यांची एकूण प्रभावळ

१. भाकणुकीनंतर पू. भगवान डोणे महाराज यांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ झाली.

२. सर्वसाधारण घोंगडीपेक्षा पू. भगवान डोणे यांच्या खांद्यावरील घोंगडीची एकूण प्रभावळ थोडी अधिक होती.

 

४. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. श्री हालसिद्धनाथ देवस्थान आणि श्री हालसिद्धनाथ यात्रा यांच्याशी
संबंधित सर्वच घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असण्यामागील कारण

४ अ १. श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आणि त्यांची संजीवन समाधी

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जेथे देवतेची प्रतिमा किंवा चित्र (रूप) असते, तेथे त्याच्याशी संबंधित स्पंदने (शक्ती) असतात. श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आणि त्यांची संजीवन समाधी यांच्यामध्ये श्री हालसिद्धनाथांची चैतन्यमय स्पंदने आहेत.

श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आणि त्यांची संजीवन समाधी यांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे वातावरण चैतन्यमय बनते, तसेच त्यांचे दर्शन घेणार्‍या भक्तांनाही चैतन्याचा लाभ होतो.

४ अ २. श्री हालसिद्धनाथांच्या प्रतिमेला वाहिलेला भंडारा (हळद)

श्री हालसिद्धनाथांच्या प्रतिमेतून प्रक्षेपित होणारे चैतन्य त्यांच्या प्रतिमेला वाहिलेल्या भंडार्‍यात (हळदीमध्ये) आकृष्ट झाले. त्यामुळे मुळातच सात्त्विक असलेल्या हळदीच्या सात्त्विकतेत वाढ झाली.

४ अ ३. श्री हालसिद्धनाथांची पालखी आणि त्यांचे विश्रांतीस्थान असलेला ‘कारी वृक्ष’

श्री हालसिद्धनाथांच्या पालखीमध्ये त्यांची प्रतिमा असते. त्यामुळे ती पालखी श्री हालसिद्धनाथांमधील चैतन्याने भारित झाली होती. ‘कारी वृक्ष’ हा श्री हालसिद्धनाथांचे विश्रांतीस्थान होते. त्यामुळे तो वृक्ष श्री हालसिद्धनाथांच्या अस्तित्वाने पावन झाला आहे. संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांचे निवासस्थान आदींवर होतो. तसेच हे आहे.

४ अ ४. श्री हालसिद्धनाथांच्या पालखीसमवेत असणारा अश्‍व (घोडा)

चाचणीतील अश्‍वामध्ये उत्सवात सहभागी होण्यापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेत पालखीसमवेत असणार्‍या अश्‍वावर तेथील चैतन्यमय वातावरणाचा चांगला परिणाम झाला.

४ आ. पू. भगवान डोणे महाराज

पू. भगवान डोणे महाराज यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ भाकणूक सांगतात. यासाठी माध्यम बनणारी व्यक्तीही पुष्कळ सात्त्विक असावी लागते.

पू. भगवान डोणे महाराजांमध्ये सात्त्विकता असल्याने भाकणुकीसाठी प्रयाण करण्यापूर्वीही त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. भाकणुकीनंतर पू. भगवान डोणे महाराज यांच्यामधील सात्त्विकतेत आणखी वाढ झाली.

४ इ. पू. भगवान डोणे महाराज यांच्याकडील वस्तू

सात्त्विक व्यक्तीमध्ये सत्त्वगुणाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तिच्यातील सात्त्विकतेचा परिणाम ती वापरत असलेल्या वस्तूंवरही होतो. याचाच प्रत्यय पू. भगवान डोणे महाराज यांच्या वस्तूंच्या संदर्भात आला. पू. भगवान डोणे महाराज यांच्यातील सात्त्विकतेचा परिणाम त्यांच्या खांद्यावरील घोंगडी, त्यांच्याकडील भंडार्‍याची पिशवी, काठी आणि शाळीग्रामसम पाषाण या सर्वच वस्तूंवर झाल्याने त्या सर्व वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली.

थोडक्यात सांगायचे तर, श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील प्रसिद्ध श्री हालसिद्धनाथ यात्रेचे आध्यात्मिक महत्त्व या वैज्ञानिक संशोधनातूनही स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.११.२०१८)

ई-मेल : mav.research2014gmail.com

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment