सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा उपक्रम
प्रदर्शनस्थळावरून ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे अरविंद पानसरे यांनी मांडलेल्या विषयाला १० सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिले !
प्रयागराज (कुंभनगरी), २८ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता ‘अक्षयवट आणि बडे हनुमान’ या मार्गावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष’ यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, कृष्णदेवराय, क्रांतीकारक भगतसिंह, चंद्रशेखर आजाद, मंगल पांडे, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी राष्ट्रपुरुष आणि क्रांतिकारक यांचे जीवनपट दर्शवणारे फलक लावण्यात आले होते. त्याची माहिती प्रेक्षकांना देण्यात आली. या प्रदर्शनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी प्रदर्शनस्थळावरून ‘फेसबूक’च्या माध्यमातून विषय मांडला. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ते म्हणाले,
१. अलिगड मुस्लिम विद्यापिठाने तिरंगा यात्रा करणार्या विद्यार्थ्यांना नुकतीच नोटीस बजावली आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. राष्ट्रध्वजाचा सन्मान केला म्हणून नोटीस बजावणारे अलिगड मुस्लिम विद्यापीठ भारतात आहे की पाकिस्तानात ?
२. अलिगड मुस्लिम विद्यापिठाला केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. शासकीय संस्था राष्ट्रीय अस्मिता असणार्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात अशी कृती करत असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
३. अलिगड मुस्लिम विद्यापिठाने ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणण्यावर बंदी आणली आहे. याचाही समिती तीव्र शब्दांत निषेध करते, तसेच भारतामध्ये ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’चा नारा दिला जातो. जर हिंदू-मुसलमान भाई असतील, तर आपल्या सर्वांची माता ‘भारतमाता’ आहे. तिला जर ‘माता’ म्हणायला मुसलमान विरोध करत असतील, तर आम्ही मुसलमानांना ‘भाऊ’ कसे म्हणावे ? असे लोक देशविरोधी वातावरण सिद्ध करत आहेत. अशा लोकांवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.
४. त्याचा निषेध म्हणून, तसेच भारतियांमध्ये राष्ट्रप्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्ही राष्ट्रध्वजाची मोहीम चालवली आहे.
५. फेसबूकद्वारे थेट प्रेक्षपण चालू झाल्यावर १० मिनिटांतच अनुमाने २ सहस्र लोकांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले, तर अर्ध्या घंट्यात ४ सहस्र ५०० हून अधिक प्रेक्षकांनी हे प्रक्षेपण पाहिले. २७ जानेवारीपर्यंत हा व्हिडिओ १० सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिला.