कुंभमेळा प्रयागराज २०१९
आश्वासनांची पूर्तता न करणार्या शासनकर्त्यांना
जनतेने हाकलून लावावे ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती
प्रयागराज (कुंभनगरी) – सध्या विद्वान ब्राह्मणांचा अवमान, गोहत्या आणि हिंदूंवर होणारे आघात यांना सध्याची पिढी नाही, तर शासनकर्ते उत्तरदायी आहेत. लोकप्रतिनिधींना जनताच निवडून देऊन संसदेत पाठवते. हे लोकप्रतिनिधी नंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करता जनतेचा विश्वासघात करतात. त्यामुळे जनतेने आश्वासन पूर्ण न करणार्या शासनकर्त्यांना निवडून न देता त्यांना हाकलून लावावे, असे मार्गदर्शन गोवर्धन पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी २७ जानेवारीला येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात सेक्टर १५ येथे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा सन्मान समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. या प्रसंगी ६० साधू आणि भाविक उपस्थित होते.
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले,
१. हिंदू पुष्कळ हुशार आहेत. एखादी घटना घडल्यानंतर हिंदू ‘ती परमात्म्याची इच्छा आणि प्रारब्ध यांनुसार घडली’, असे सांगून मोकळे होतात; मात्र वास्तव वेगळे असते.
२. ‘गोहत्या होणार नाही’, असे शासनकर्ते आश्वासन देतात; मात्र ते आश्वासन पाळत नाहीत. याविषयी जनताही त्यांना जाब विचारत नसल्याने गोहत्यांचे प्रमाण वाढत जाते.
३. शासनकर्त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास जनतेने त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाब विचारायला हवा. त्या वेळी त्या लोकप्रतिनिधींना सत्य माहिती जनतेला द्यावीच लागते; मात्र हे लोकप्रतिनिधी मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी खोटे बोलून स्वतःचा बचाव करतात.