प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन धर्माचे स्वरूप विशाल आणि कल्याणकारी आहे. सनातन धर्मच सर्वांच्या हिताचा विचार करतो. संपूर्ण सृष्टीची चिंता सनातन धर्माला असते. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून आक्रमणे होत असून विविध प्रकारची षड्यंत्रे रचली गेली; मात्र शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व अजूनही कायम असून ते कायम राहील, असे आशीर्वचन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले. प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या अनुषंगाने माध्यमे आणि वृत्तवाहिन्या यांच्या पत्रकारांनी ३ दिवसांच्या कालावधीत शंकराचार्यांची भेट घेऊन त्यांना विविध प्रश्न विचारले. यांमध्ये राममंदिर उभारणी, हिंदूंचे धर्मांतर, मोदी सरकारचे अपयश इत्यादी विषयांचा अंतर्भाव होता.
पत्रकार : सनातन धर्म काय आहे ? त्यावरून लोकांचा विश्वास का उडत आहे ?
शंकराचार्य : सनातनचा अर्थ आहे ‘नेहमी कायम रहाणारा’. सनातनचे अस्तित्व कधीच संपत नाही. वेद आणि पुराण, हे त्याचा आधार आहेत. प्रत्येक व्यक्ती जन्मजात सनातनी आहे. पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर ती विविध जाती-वर्ग यांमध्ये विभागली जाते. सनातनवरून लोकांचा विश्वास उडालेला नाही. सनातनवरील विश्वास उडाला असता, तर कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी झालीच नसती. येथे भाविक सुख-सुविधा यांपासून मुक्त होऊन अनेक कष्ट सहन करून येतात. विदेशात सनातन धर्म स्वीकारणार्यांची संख्या वाढत आहे, तसेच कुंभमेळ्यातील अलौकिक दृश्य विश्वात कुठेही पहायला मिळणार नाही. (शंकराचार्यांसारख्या थोर संतांना काय विचारावे, हे ही न कळणारे पत्रकार ! तसेच अशा प्रश्नावरून पत्रकारांचा अभ्यास कितपत आहे, याची कल्पना येते. – संपादक)
पत्रकार : भारतात हिंदूंचे धर्मांतर चालूच आहे. यामागे कोणते कारण आहे ?
शंकराचार्य : भारतात बरीच वर्षे मुसलमानांचे राज्य होते. त्यानंतर दीडशे वर्षे इंग्रजांची सत्ता होती. या दोघांनी हिंदूंवर अत्याचार करून आणि प्रलोभने दाखवून त्यांना मुसलमान अन् ख्रिस्ती बनवले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात काँग्रेस आणि भाजप या पक्षांतील लोक सत्तेवर आले; मात्र त्यांनी सनातन धर्म वाढवण्यासाठी काहीच केले नाही. देशात आजही ख्रिस्ती मिशनर्यांची शिक्षणव्यवस्था आहे. आपण शाळांमध्ये आपल्या मुलांना गीता आणि रामायण शिकवू शकत नाही, ना त्या अनुरूप कोणी त्यांचे आचरण करू शकते. हे चालू असतांनाच सध्याच्या पिढीची मानसिकता दूषित होत आहे. त्यामुळे हिंदूंना आपल्या धर्माप्रती जिज्ञासा राहिलेली नाही, कारण ते हिंदु धर्माच्या ज्ञानापासून अनभिज्ञ आहेत. त्याचसमवेत गरिबी आणि अशिक्षण या देश पातळीवर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांतील लोक शिक्षण अन् आरोग्य या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यातच त्यांना आमिषे दाखवून दुसर्या पंथात सहभागी करून घेतले जात आहे.
पत्रकार : भारतात हिंदु धर्माचार्यांची संख्या लक्षणीय आहे. असे असतांनाही धर्मांतर होत असल्यामुळे धर्माचार्यांची मान्यता आणि सक्रीयता यांवर प्रश्नचिन्ह का उपस्थित होत नाही ?
शंकराचार्य : देशात केवळ ४ मुख्य धर्मगुरु आहेत. तेच चारही पीठांचे शंकराचार्य आहेत. त्यांच्याशिवाय इतरांना मान्यता नाही. धर्मांतर रोखण्यासाठी शंकराचार्य हे धर्माचा सतत प्रचार करत असतात. मी स्वतः भ्रमण करत आहे. आमचे मठ, मंदिर यांच्या माध्यमांतून समाजाला धर्माशी जोडण्याची मोहीम चालू आहे. धर्मांतराचे मुख्य कारण म्हणजे गरिबी, अशिक्षण, बेरोजगारी आणि भय. हे प्रश्न दूर करण्याचे काम धर्मगुरूंचे नसून ते सरकारचे आहे. गरिबांना सुविधा देऊन त्यांचा विकास करण्यामध्ये सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे गरीब लोक इतरांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करत आहेत, हे सत्य आहे. धर्मांतराला सरकारच उत्तरदायी आहे. धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने गंभीरपणे पाऊल उचलायला हवे. या कामात धर्मगुरु त्यांना पूर्ण सहकार्य करतील.
पत्रकार : धर्मगुरूंसंदर्भातील प्रश्न न्यायालयात पोहोचले आहेत. हे धर्म आणि धर्मगुरु यांच्या पीठाला शोभते का ?
शंकराचार्य : धर्मगुरूंचे प्रश्न न्यायालयात गेले, तरी त्याचा पक्षकार मीही नाही; मात्र न्यायालयात गेल्यानंतर त्या प्रश्नाचे खरे स्वरूप उजेडात येते. न्यायालय साक्षीदारांच्या आधारे निर्णय देते. ज्योतिष पीठाचे सूत्र न्यायालयात गेल्यानंतर ते संपुष्टात आले. विद्वानांनी शास्त्र आणि कायदा याला अनुसरून पुन्हा ज्योतिष पीठातील शंकराचार्य नियुक्त केला आहे. त्यामुळे पीठावर कोणतीही अयोग्य व्यक्ती ताबा घेऊ शकत नाही.
पत्रकार : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कामांकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पहाता ?
शंकराचार्य : मी तुम्हाला यापूर्वीच सांगितले आहे की, भारतातील सनातन धर्माच्या प्रश्नाला घेऊन सरकारने योग्य काम केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर लोकांना अपेक्षा होती की, ‘सनातन धर्म’ आणि ‘हिंदूंचा विकास’, यांसाठी ते काम करतील. त्यांनी तसे वचनही दिले होते; मात्र तसे झाले नाही. गंगा नदीची आजही दुर्दशाच आहे. गोमांसाचे निर्यात पहिल्यापेक्षा आज वाढलेले आहे. अयोध्या येथील राममंदिराचा प्रश्न अजूनही लटकत राहिला असून त्या दिशेने सरकारने काहीच काम केलेले नाही.
पत्रकार : सत्तेत भाजप आहे. राममंदिर होण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप करत आहेत. ते संतांच्या मार्गदर्शनानुसार मंदिर उभारणी करणार आहेत. त्यांच्या समवेत तुम्ही आहात का ?
शंकराचार्य : आम्ही रामाला ‘परब्रह्म’ म्हणजेच ‘परमात्मा’ मानतो, तर संघ आणि विहिंप रामाला ‘महापुरुष’ म्हणजे व्यक्ती मानतात. या सूत्रावरून माझे त्यांच्याशी मतभेद आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासमवेत जाऊ शकत नाही. त्यांना मंदिर व्हावे, असे वाटत नाही. त्यांच्या मनात मंदिर उभारण्याची इच्छा असती, तर त्यांच्या संघटनेचाच भाग असलेल्या भाजप पक्षाने राममंदिर उभारण्याच्या दिशेने काम केले असते; मात्र असे झाले नाही.
१. राममंदिर उभारण्यासाठी संत राजकीय पक्षांवर अवलंबून नाहीत !
रामजन्मभूमी अयोध्या येथे मंदिर उभारणीसाठी संत कोणत्याही राजकीय पक्षावर अवलंबून रहाणार नाहीत. जेथे रामलला विराजमान आहेत, तेथेच मंदिराची उभारणी होईल. ते संत करतील. प्रयागराज येथील कुंभमेळ्यानंतर मी संतांसमवेत अयोध्येत जाऊन वास्तुशास्त्रानुसार शिलान्यास करणार आहे. हा शिलान्यास शास्त्राला धरून आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केला जाईल. याचे नियोजन संत संमेलनात सिद्ध होईल.
२. धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने कायदा सिद्ध करावा !
देशात धर्मांतराची मोठी समस्या आहे. एकटे धर्मगुरु धर्मांतर रोखू शकत नाहीत. ते केवळ हिंदूंना धर्माशी जोडण्याची प्रेरणा देऊ शकतात. धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने कायदा सिद्ध केला पाहिजे. त्याचसमवेत गरीब आणि उपेक्षित लोकांच्या विकासाचे कामही केले पाहिजे. जेणेकरून आमिषाला बळी पडून हिंदू दुसरा पंथ स्वीकारणार नाहीत.