श्री हालसिद्धनाथ आणि श्री बिरदेव यांचे सनातनच्या आश्रमी झाले आगमन ।
हिंदु राष्ट्र स्थापण्याचा आशीर्वाद दिधला कृतज्ञ झाले संत अन् साधकजन ॥
सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – येणार्या भीषण आपत्काळात साधकांचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधकांना आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री बिरदेव यांचे २५ जानेवारी या दिवशी सकाळी १०.३० वाजता मंगलमय वातावरणात शुभागमन झाले.
ढोलांचे गजर (वालंग), नामघोष, गजी नृत्य, तलवार नाचवणे (बनगर नृत्य) यांमुळे आश्रमातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सायंकाळी पू. भगवान डोणे महाराज यांचा भाकणुकीचा विशेष कार्यक्रम होता. श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री बिरदेव यांच्यासमवेत पू. डोणे महाराज, मुरारी पुजारी यांसह देवाचे १७५ भक्तगण उपस्थित होते. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, एस्.एस्.आर्.एफ्. आणि सनातन यांच्या संतांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
प्रारंभी ढोल वाजवण्याचा कार्यक्रम झाला. सनातनचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांच्या हस्ते श्री हालसिद्धनाथ, श्री बिरदेव, पू. भगवान डोणे महाराज, मुरारी पुजारी यांची प्रवेशद्वारावर पाद्यपूजा करून त्यांना हार घालण्यात आला. देवतांच्या मूर्तींचे ढोलांच्या गजरात आगमन झाले. सकाळी १०.३० वाजता पू. डोणे महाराज यांनी मूर्तीची पूजा केली. श्री विठ्ठल बिरदेव आणि श्री हालसिद्धनाथदेव यांची आरती म्हणण्यात आली. अत्यंक शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री हालसिद्धनाथ आणि श्री बिरदेव यांचे दर्शन घेतले.
सोहळ्यातील सहभागी मानकरी
कुर्ली येथील पाटील घराण्यातील श्री. कृष्णात दिनकर पाटील, श्री. कृष्णात चव्हाण वस्ताद, पू. डोणे महाराजांचे सहकारी, श्री. वसंत पाटील, श्री. संजय पाटील, वालंगांमध्ये सर्वश्री राघू निकाडे, पी.आर्. पाटील, राजाराम ढगे, बाळासाहेब आबणे, नेताजी पाटील, शंकर वास्कर आणि त्यांचे सहकारी, श्री. वीरभद्र विभूते, निपाणी येथील श्री. पोतदार, श्री. संदीप पिष्टे, सौ. रंजना विभूते, सौ. सगूताई वास्कर, देवस्थान समिती, छत्री, पालखीधारी मंडळी (सोहळ्यात ११ ढोल जोशात आणि देहभान विसरून वाजवण्यात येत होते.)
देवाला आळवण्यासाठी धनगरी गाणी, गजी नृत्य,
भजने यांसह ढोलांच्या गजरातील बनगर नृत्याचा आविष्कार !
पूजा-आरतीनंतर ढोलांच्या गजरात बनगर नृत्य करून भंडारा उधळण्यात आला. धनगरी गाणी, गजी नृत्य, भजने हे कार्यक्रम झाले. देवाला आळवण्यासाठी भक्तांनी देहभान विसरून केलेल्या या कार्यक्रमामुळे वातावरणात वेगळेच चैतन्य पसरले होते.