प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन धर्म, ग्रंथ आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कायम सतर्क रहावे. आदि शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठीच आखाडे बनवले होते. त्यामुळे आखाड्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे, असे आशीर्वचन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी येथे केले.
सनातन धर्मासमोर असलेली संकटे तथा धर्महित जपण्यासाठी आखाड्यांच्या वतीने केले जात असलेल्या कार्याविषयी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी २० जानेवारीला मनकामेश्वर मंदिर येथे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी शंकराचार्यांचे आशीर्वादही घेतले. त्या वेळी शंकराचार्यांनी हे मार्गदर्शन केले. या प्रसंगी ब्रह्मचारी श्रीधरानंद आणि ब्रह्मचारी रामानंद उपस्थित होते.
या वेळी शंकराचार्यांशी चर्चा करतांना महंत नरेंद्रगिरी महाराज म्हणाले की, आखाडा परिषद धर्माचार्यांना समाजासमोर येणार्या संकटांविषयी सतर्क करून त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचसमवेत १३ आखाडे संस्कृत, वेद, पुराण यांच्या संरक्षणासाठी कार्य करत आहेत. याचा समाजावर व्यापक परिणाम होईल. यावर शंकराचार्यांनी आखाडा परिषदेच्या कार्याचे कौतुक केले.