१. विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले आध्यात्मिक संशोधन !
सनातन संस्थेने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग मशिन’ (DDFAO), ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इन्टरफिअरन्स फोटोग्राफी’ (PIP), ‘इलेक्ट्रोस्कॅनिंग मेथड’ (ESM) आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन’ (GDV) या वैज्ञानिक उपकरणांद्वारे अध्यात्मातील अनेक विषयांवर विविध प्रकारचे सहस्रो प्रयोग केले आहेत. यातील काही प्रयोग त्या त्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीही करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मायेतील आणि अध्यात्मविषयक बोलणे, मांसाहारसेवन आणि शाकाहारसेवन, पाश्चात्त्य आणि भारतीय संगीत ऐकणे इत्यादी गोष्टींमुळे व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रांवर (कुंडलिनीतील चक्रांवर) काय परिणाम होतो, यासंदर्भात आहेत. या सर्व प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध होत आहे.
२. ‘लोलका’च्या साहाय्याने केलेले आध्यात्मिक संशोधन !
साधना न करणारी व्यक्ती, साधना करणारी व्यक्ती, तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी अन् साधना करणारी व्यक्ती, साधना चांगली चालू असणारी व्यक्ती, संत आदींच्या संदर्भात; तसेच तामसिक आणि सात्त्विक उत्पादने यांच्या संदर्भात ‘लोलका’द्वारे शेकडो अध्यात्मशास्त्रीय प्रयोग करण्यात आले. या सर्व प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे आणि सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सिद्ध होत आहे.
३. वाईट शक्ती अन् त्यांचे कार्य यांविषयीचे संशोधन
मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक यांसारख्यासमस्यांचे मूळ अदृश्य स्वरूपात कार्य करणार्या वाईट शक्तींच्या माध्यमातून होऊ शकत असलेल्या त्रासांत असू शकते. वाईट शक्ती देत असलेले विविध स्वरूपाचे त्रास अन् त्यांवरील उपाय यांसंदर्भात सनातन संशोधन करत आहे. सनातनने पुढील संशोधनाद्वारे अदृश्य स्वरूपातील वार्इट शक्तींचे स्वरुप जाणण्याचा प्रयत्न केला आहे.
अ. नामजप, सत्संग, संतांची भजने, सात्त्विक वस्तू आदींमुळे साधना करणार्यांना होऊ शकणारे वाईट शक्तींचे त्रास.
आ. पाश्चात्त्य संगीत, वेशभूषा, भाषा आदींमुळे वाईट शक्ती सुखावणे, तर भारतीय संगीत, वेशभूषा, भाषा आदींचा वाईट शक्तींना त्रास होऊ शकणे, यासंदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग !
४. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे आणि परीक्षणे
शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी नामजप योग्य उच्चारांसह कसा करावा; धार्मिक विधी, सण, उत्सव, यज्ञयाग इत्यादींतून देवतांची तत्त्वे आणि चैतन्य मिळण्याची प्रक्रिया कशी असते; चित्रकला, मूर्तीकला, संगीत यांसारख्या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करता येऊ शकते; दिनचर्या, आहार, कपडे, अलंकार, अक्षरे यांसारख्या प्रत्येक गोष्टीतूनच सात्त्विकता कशी मिळवता येऊ शकते या संबंधातील कृतींचा सूक्ष्म-परिणाम दर्शवणारी ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे’ रेखाटणे आणि ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणे’ लिहिणे हे कार्यही अव्याहतपणे चालू आहे.
वर उल्लेखलेले विविध प्रकारचे आध्यात्मिक संशोधन हे ग्रंथांची सहस्रो पाने भरतील इतके आहे. ते सर्वांसाठी प्रकाशित करण्यास न्यूनतम ३० वर्षे तरी लागतील. या संशोधनातून मिळणार्या ज्ञानाचा आणि साधकांना मिळणार्या अनुभवाचा लाभ सनातनच्या संकल्पित ‘अध्यात्म विश्वविद्यालया’त शिकणार्या विद्यार्थ्यांना, तसेच अखिल मानवजातीला पुढील काही सहस्रो वर्षे होत राहील.