अनुक्रमणिका
भाविकांना देवतेच्या तत्त्वाचा अधिक प्रमाणात लाभ होण्यासाठी मूर्ती शास्त्रानुसार बनवणे अधिक इष्ट ठरते. या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.
१. मूर्तीविज्ञान
प्रत्येक देवता हे एक तत्त्व आहे. हे तत्त्व युगानुयुगे असतेच. देवतेचे तत्त्व त्या त्या काळाला आवश्यक अशा सगुण रूपात प्रगट होते, उदा. भगवान श्रीविष्णूने कार्यानुमेय धारण केलेले नऊ अवतार. मानव कालपरत्वे देवतेला विविध रूपांत पुजायला लागतो.
शिवाच्या मूर्तीत काळानुसार पुढे दिल्याप्रमाणे पालट (बदल) होत गेला. हे लिखाण वाचतांना ‘शिव ही लयाची देवता असतांना शिवाच्या शिश्न, नंदी, लिंग-भग (योनी) रूपातील शिवलिंग इत्यादी उत्पत्तीच्या संदर्भातील मूर्ती कशा काय बनविल्या गेल्या’, असा प्रश्न एखाद्याला पडण्याची शक्यता आहे. त्याचे उत्तर असे की, शैव संप्रदायानुसार उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीची देवता शिव आहे. केवळ त्रिमूर्ती (दत्त) संकल्पनेत शिव ही लयाची देवता आहे. मानसशास्त्रदृष्ट्याही उत्पत्ती अन् स्थितीसंबंधी उपासना करणे बहुतेकांना सोपे जाते आणि लयासंबंधी उपासना करणे कठीण जाते; म्हणून शैव संप्रदायात शिव उत्पत्तीशीही संबंधित आहे.
१ अ. शिश्नरूप
शंकराला जगत्पिता म्हटले आहे; म्हणून पूर्वी मूर्ती शिश्नरूप असे. ही बहुधा पंचमुखी असते. त्यातील पूर्वेकडील मुखाला श्रीविष्णु, पश्चिमेकडील मुखाला ब्रह्मा, दक्षिणेकडील मुखाला रुद्र आणि उत्तरेकडील मुखाला शिव म्हणतात. पाचवे मुख वरच्या दिशेकडे, म्हणजे आध्यात्मिक उन्नतीकडे तोंड करून असते. या नावांसंदर्भात पाठभेद आहेत.
१ आ. प्राणीरूप
नंदी हे शिवाचे वेदकाळातील रूप होय.
१ इ. मानवीरूप
पुराणकाळात हे रूप झाले. यात पार्वती शिवाच्या मांडीवर बसलेली दाखवितात. शिव-पार्वती (शक्ती) विश्वाचे आई-वडील असल्याचे ते द्योतक आहे. ही मूर्ती नेहमी पांढरी, म्हणजे कर्पूरगौर अशी असते. शिव ही पावित्र्याची देवता असल्याने परिपूर्ण शुद्धतेचे प्रतीक अशा पांढर्या रंगाची ती असते.
शिवाच्या हातातील चार आभूषणे
मानवी रूपातील शिवाच्या हातात पुढील चार आभूषणे असून ती प्रतीकात्मक आहेत.
१. डमरू
हे शब्दब्रह्माचे प्रतीक आहे. यापासून ५२ अक्षरांचे मूळ ध्वनी आणि १४ माहेश्वर सूत्रांच्या रूपाने वर्णमाला निर्माण झाली. त्यातून पुढे विश्वाची उत्पत्ती झाली.
२. त्रिशूळ
हे पुढील गोष्टींचे प्रतीक आहे.
अ. त्रिगुण
आ. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे मूळ
इ. इच्छा, ज्ञान आणि क्रिया म्हणजे त्रिशूळाची तीन टोके
ई. यम, सूर्य आणि प्रजापति लहरी
२ अ. त्रिमूर्तीरूपात (दत्तावतारातील) शिवाच्या हातातील त्रिशूळ आणि शिव एकटा असतांना त्याच्या हातातील त्रिशूळ यांतील भेद
त्रिमूर्तीरूपातील शंकराच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही. त्रिशूळावरील वस्त्र हे ध्वजाचे प्रतीक आहे.
३. पाश किंवा मृग
पाश म्हणजे कालपाश. (श्री गणपतीच्या हातातील दोरीही कालपाश आहे.) मृग हे चार वेदांचे प्रतीक आहे.
४. परशु
हे अज्ञानविध्वंसाचे प्रतीक आहे.
१ इ १. दक्षिणामूर्ती : ‘दक्षिणा हा शब्द बुद्धीवाचक आहे. बुद्धीच्या साहाय्याने ज्या परमेश्वराचे ज्ञान होते, त्याला ‘दक्षिणामूर्ती’ असे म्हणतात. भक्तांना अद्वैत तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी शिवाने हे रूप धारण केले, अशी कथा आहे.
दक्षिणामूर्तीचे चार प्रकार
अ. वीणाधरमूर्ती
ही उभी आणि चतुर्भूज असते. ती भक्तांना वीणा, म्हणजे नादानुसंधान शिकविते.
आ. योगमूर्ती
ही ध्यानस्थ बसल्याप्रमाणे असते. तिच्या कृपेने योगविद्या प्राप्त होते.
इ. ज्ञानमूर्ती
ही तत्त्वज्ञान शिकविणारी आहे.
ई. व्याख्यानमूर्ती
ही अन्य शास्त्रांचे ज्ञान देते. ही वीरासनावर बसलेली असते आणि पुढील मुद्रा दर्शविते – ज्ञान, संदर्भ आणि व्याख्यान.’ ‘या रूपात शिव उभा किंवा बसलेला असतो. त्याची मुखमुद्रा सौम्य आणि सुंदर असते. तो प्रायः चतुर्भूज असतो. अशा मूर्तीच्या सभोवती कित्येकदा पशू, सर्प आणि यती-मुनी असतात. कधी कधी पार्वतीही जवळ असते. आद्य शंकराचार्यांनी दक्षिणामूर्तीची दोन स्तोत्रे रचली आहेत.
१ इ २. कल्याणसुंदरमूर्ती
या मूर्तीकरणात शिव-पार्वतीचा विवाह सोहळा साकार केलेला असतो.’
१ ई. पिंडीरूप
भगाचे प्रतीक असलेली ‘शाळुंका’ आणि लिंगाचे प्रतीक असलेले ‘लिंग’ हे दोन्ही मिळून ‘पिंडी’ निर्माण झाली. भूमी म्हणजे सृजन आणि शिव म्हणजे पावित्र्य. अशा प्रकारे शाळुंकेत सृजन आणि पावित्र्य एकत्र असले, तरी रेतापासून विश्वाची उत्पत्ती झाली नाही, तर ती शिवाच्या संकल्पापासून झाली आहे. अशा प्रकारे शिव आणि पार्वती जगाचे आई-वडील झाले आहेत. कनिष्काचा मुलगा हुइष्क याने दुसर्या शतकापासून शिवलिंगपूजा चालू केली. शक्तीविना शिव काही करू शकत नाही; म्हणून शिवासह शक्तीची पूजा करणे चालू झाले. पिंडीरूप शिवलिंग हे ऊर्जाशक्तीचे प्रतीक आहे. आताच्या अणूभट्ट्यांचा आकारही शिवलिंगाप्रमाणे असतो.
१ ई १. पिंडीचे प्रकार
१ ई १ अ. चल आणि अचल
१. चल लिंग हे एखाद्या विशिष्ट पूजेपुरते केले जाते. श्री गणेश चतुर्थीला श्री गणेशाची मूर्ती बनवितात, तसे हे बनवितात आणि नंतर विसर्जित करतात. अचल लिंगाची एका ठिकाणी स्थापना केलेली असते.
२. लिंगायत लोक गळ्यात घालतात, त्याला ‘चल लिंग’, असे म्हणतात.
१ ई १ आ. भूमीच्या संदर्भात
१. भूमीच्या पातळीच्या खाली असलेली (स्वयंभू)
अ. हिच्यात फार शक्ती असते; म्हणून ही भूमीच्या पातळीच्या खाली असते. वर असल्यास बाहेर पडणारी शक्ती भक्तांना सहन करता येणार नाही. (डोळ्यांतून बाहेर पडणार्या तेजामुळे दर्शनाला येणार्या लोकांना त्रास होऊ नये, म्हणून श्री तिरुपतीच्या बालाजीचे डोळे अर्धोन्मीलित आहेत.) पूजक भूमीवर आडवे पडून आत हात घालून हिची पूजा करतो. ज्योतिर्लिंगाच्या खालोखाल यांच्यात शिवतत्त्व असते. ही शिवेच्छेने निर्माण होतात. नंतर एखाद्या भक्ताला साक्षात्कार होऊन त्यांचा शोध लागून पूजा चालू होते.
आ. स्वयंभू शिवपिंड निर्माण होण्यामागील शास्त्र
१. ‘सृष्टीरचनेतील सूक्ष्म अडथळे दूर होऊन ही रचना सहजतेने कार्यरत रहावी.
२. ज्या ठिकाणी शिवशक्तीची आवश्यकता आहे.
३. ज्या ठिकाणी भक्ताला साधनेसाठी काळ प्रतिकूल आहे, तो ईश्वरी अस्तित्वाने अनुकूल व्हावा.ज्या ठिकाणी स्वयंभू शिवपिंडीची आवश्यकता आहे; परंतु ती प्रकट होत नाही, तेव्हा ते कालमाहात्म्य समजावे. तसेच असे होणे ही आपत्कालाचे सूचक समजले जाते. जेथे पूर्ण अंधार असतो, तेथे प्रकाशाचे महत्त्व लक्षात येते आणि तेव्हाच प्रकाशाचे कार्य चालू होते, तसेच भगवंताच्या कार्याविषयी म्हणता येईल.’
– (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून, अधिक वैशाख शु.१३, कलियुग वर्ष ५११२,२६.४.२०१०, दुपारी १२.३०)
२. भूमीच्या पातळीत असलेले
ही ऋषी किंवा राजा यांनी प्रस्थापित केलेली असते. हिच्यात अल्प शक्ती असते. भक्तांना ती सहन करता येते. पूजक पिंडीच्या लगत (बाजूला) असलेल्या खोलगट भागात बसून पूजा करतो.
३. भूमीच्या पातळीच्या वर असलेली
ही भक्तांनी संघटितपणे प्रस्थापित केलेली असते. हिच्यात सर्वांत अल्प, सर्वांना सहन करता येईल एवढीच शक्ती असते. पिंडीच्या लगत बांधलेल्या ओट्यावर बसून पूजक हिची पूजा करतो.
२ आणि ३ या प्रकारच्या लिंगांना ‘मानुष लिंगे’ म्हणतात. ‘ही लिंगे माणसांनी घडविलेली असतात, म्हणून यांना मानुष लिंगे हे नाव मिळाले असावे. यांची स्थिर लिंगांत गणना होते. ब्रह्मभाग, विष्णुभाग आणि रुद्रभाग असे यांचे तीन भाग असतात. सर्वांत खालच्या भागाला ‘ब्रह्मभाग’ असे म्हणतात. हा भाग चौकोनी असतो. मधल्या अष्टकोनी भागाला ‘विष्णुभाग’ असे नाव आहे. हे दोन्ही भाग भूमीत पुरलेले असतात. सर्वांत वरच्या गोलाकार उभट भागाला रुद्रभाग हे नाव आहे. याला पूजाभागही म्हणतात, कारण पूजासाहित्य यावरच वाहिले जाते.
रुद्रभागावर काही रेषा असाव्या, असे मूर्तीशास्त्रावरील ग्रंथांत म्हटले आहे. या रेषांना ‘ब्रह्मसूत्रे’ म्हणतात. दैविक आणि आर्षक लिंगांवर अशा रेषा नसतात.’
४. अधांतरी असलेली
पार्याने बनविलेली सोमनाथाची पिंडी भूमीपासून पाच मीटर उंचीवर हवेत तरंगती होती. दर्शनार्थी तिच्या खालून जात. तीच पिंडीची प्रदक्षिणा होत असे.
१ ई २. श्री क्षेत्र कुणकेश्वर (जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथील शिवपिंडीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र
खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !
अ. ‘स्पंदनांचे प्रमाण
स्पंदने |
स्वयंभू शिवपिंडीतील स्पंदने |
मानवनिर्मित शिवपिंडीतील स्पंदने |
शांती | २.२५ | – |
चैतन्य (निर्गुण-सगुण) | २ | २ |
शिवतत्त्व | ३ | २ |
शक्ती | ३ | २ |
आ. इतर सूत्रे
१. स्वयंभू शिवपिंडीमध्ये शिवाचे निर्गुण तत्त्व सामावलेले असते.
२. शिवतत्त्वाच्या इच्छाशक्तीचे सगुण रूप म्हणजे स्वयंभू शिवपिंडी. त्यामुळे शिवाची प्रकट (मारक) शक्ती पिंडीमध्ये सामावलेली असते.
३. स्वयंभू शिवपिंडीमध्ये मानवनिर्मित शिवलिंगाच्या तुलनेत अधिक सात्त्विकता असते. मानवनिर्मित शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्यात मंत्रांच्या साहाय्याने देवतेची तत्त्वे आणण्यात येतात. ही तत्त्वे मुळातच स्वयंभू शिवपिंडीमध्ये अस्तित्वात असतात. (श्री कुणकेश्वर येथील शिवपिंडी स्वयंभू आहे.)’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (अधिक वैशाख शु. १२ (२५.४.२०१०))