सनातनचे ग्रंथ आणि फ्लेक्स यांचे प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या धर्मप्रेमीने टप्प्याटप्प्याने १०० महिलांना प्रदर्शन दाखवण्याचा केला निर्धार !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रयागराज, १८ जानेवारी (वार्ता.) – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले असून या प्रदर्शनाला गुजरातमधील धर्मप्रेमी श्री. खेंगाडभाई डोडीया यांनी १६ जानेवारी या दिवशी भेट दिली. प्रदर्शन पाहून ते इतके भारावून गेले की, त्यांनी आपल्या समवेत कुंभमेळ्यासाठी आलेल्या १०० महिलांना टप्प्याटप्प्याने हे प्रदर्शन दाखवण्याचा निर्धार केला. त्यांनी आतापर्यंत दोन टप्प्यांत ३० महिलांना स्वतः आणून प्रदर्शन दाखवले.

१. धर्मप्रेमी श्री. खेंगाडभाई डोडीया हे गुजरातच्या कर्णावती जिल्ह्यातील साणंद तालुक्यातील आहेत.

२. श्री. डोडीया हे कुंभमेळ्यासाठी आपल्या समवेत श्री. हसरतभाई दोदर यांसह १०० गुजराती महिलांना घेऊन आले आहेत.

३. प्रदर्शन पाहून श्री. डोडीया यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी श्री. हसरतभाई दोदर यांनाही प्रदर्शन दाखवले. त्यानंतर त्या दोघांनी २ टप्प्यांत एकूण ३० महिलांना प्रदर्शनाच्या ठिकाणी आणून प्रदर्शन दाखवले.

४. या वेळी उपस्थित सनातनच्या साधकांनी गुजराती महिलांना माहिती देण्याऐवजी श्री. हसरतभाई दोदर यांनीच स्वयंस्फूर्तीने गुजराती भाषेत महिलांना प्रदर्शनाची सर्व माहिती सांगितली.

५. विशेष म्हणजे या वेळी श्री. दोदर यांना प्रदर्शनातील काही फ्लेक्सवरील माहिती न समजल्यास ते श्री. डोडीया आणि प्रदर्शनाची माहिती सांगणारे साधक यांना माहिती विचारून ते गुजराती महिलांना सांगत होते.

महिलांना धर्मशिक्षणाची माहिती मिळण्यासाठी
प्रदर्शन दाखवण्याची धर्मप्रेमी खेंगाडभाई डोडीया यांची तळमळ !

श्री. खेंगाडभाई डोडीया म्हणाले, ‘‘आमच्या सर्व गुजराती महिला या नेहमी घरीच असतात. त्या सहसा कुठे बाहेर पडत नाहीत. काल मी हे प्रदर्शन पाहिल्यानंतर मला धर्माविषयीच्या या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाची माहिती महिलांना दिली पाहिजे, याची जाणीव झाली. त्यानुसार मी ग्रंथप्रदर्शन पहाण्यासाठी महिलांना घेऊन आलो आहे.’’

आम्ही गुजरातमध्ये धर्मशिक्षणवर्गासाठी अवश्य पुढाकार घेऊ ! – हसरतभाई दोदर

श्री. हसरतभाई दोदर म्हणाले, ‘‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्य मोठे आहे. समाजात असे कार्य कुठेही होत नाही. तुमचे अद्वितीय कार्य गुजरात राज्यात नक्कीच आणा. गुजरात राज्याला असे ज्ञान मिळण्यासाठी आमच्या गावापासून प्रारंभ करा ! आज महिलांना असे धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. आम्ही गुजरातमध्ये धर्मशिक्षणवर्गासाठी अवश्य पुढाकार घेऊन तुम्हाला सर्व सहकार्य करू. धर्माविषयी एवढी महत्त्वपूर्ण माहिती देणार्‍या सनातनचा आश्रम गुजरातमध्ये का नाही ?’’, असेही त्यांनी जिज्ञासेपोटी विचारले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment