अयोध्या येथे राममंदिराची उभारणी होण्यासाठी प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर साधू-संत आणि सनातन संस्था यांचे उत्स्फूर्त अभियान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समयमर्यादेत
राममंदिराची उभारणी करावी ! – श्री श्री १००८ बाबा गोविंददास महाराज

राममंदिर उभारणीचे आंदोलन करतांना भाविक आणि सनातनचे साधक यांच्यासमवेत १. श्री श्री १००८ बाबा गोविंददास महाराज २. श्री. चेतन राजहंस आणि ३. श्री. अरविंद पानसरे

प्रयागराज, १७ जानेवारी (वार्ता.) – येथील शाही स्नान मार्ग, तसेच संगमाच्या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अयोध्या येथे राममंदिराची उभारणी होण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशाप्रकारे श्रीरामाच्या नामजपाचे अभियान १५ जानेवारीला राबविण्यात आले. या अभियानात साधू, संत आणि भाविक हे उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन त्यांनी रामनामाचा जप केला. या वेळी श्री मौनीबाबा माझा, बाज देवघाट, अयोध्या येथील मौनी बाबा आखाड्याचे साधू श्री श्री १००८ बाबा गोविंददास महाराज यांनी ‘उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी समयमर्यादेमध्ये अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी’, अशी मागणी दिली. या आंदोलनात ५० हून अधिक साधू-संत, सनातनचे साधक आणि भाविक सहभागी झाले होते.

१. या प्रसंगी श्री श्री १००८ बाबा गोविंददास महाराज म्हणाले की, आमचे गुरु मौनी बाबा यांनी राममंदिराच्या उभारणीचा संकल्प केला आहे. त्यांनी राममंदिर उभारण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला सांगितले आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी असे अभियान राबवल्याविषयी त्यांनी साधकांचे कौतुक केले.

२. या अभियानात साधकांनी ‘जय श्रीराम’ नावाचे फलक हाती घेतले होते. साधकांनी भाविकांना अभियानाचा विषय समजावून सांगितला. हा विषय समजल्यानंतर भाविकांनीही नामजप चालू केला.

३. या वेळी ‘योगी तुम अच्छा काम करो, मंदिर का निर्माण करो !’ आदी घोषणा देण्यात आल्या. ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे’ या घोषणेने शेवट करण्यात आला.

४. या अभियानामध्ये सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे हेही सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment