ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप म्हणजे प्रयागराज येथील लक्षावधी वर्षांपासून असलेला परमपवित्र ‘अक्षयवट’ !

‘अक्षयवटाचा पहिला उल्लेख वाल्मीकि रामायणात आढळतो. पुराणात अक्षयवटाला ‘तीर्थराज प्रयागचे छत्र’ म्हटले गेले आहे. अक्षयवटाला ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप मानले जाते. ज्याचे दर्शन घेतल्यानंतर साधकांना मोक्षप्राप्ती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशा अक्षयवटाची माहिती येथे देत आहोत…

प्रयाग येथील वटवृक्ष ‘अक्षयवट’ !

 

१. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी अक्षयवटाचे दर्शन घेतले होते !

पुराणात असे म्हटले आहे की, वनवासासाठी भगवान श्रीराम प्रयाग येथे भरद्वाज ऋषि यांच्याकडे आले, त्या वेळी भरद्वाज ऋषींनी त्यांना यमुना तटावर असलेल्या अक्षयवटाचे माहात्म्य सांगितले. त्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी अक्षयवटाचे दर्शन घेतले. सीतेने अक्षयवटाचे पूजन करून आशीर्वाद मागितला.

 

२. पृथ्वीवर प्रलय आल्यानंतरही केवळ अक्षयवटाचे अस्तित्व रहाणे !

पुराणातील कथांमध्ये असा उल्लेख आढळतो की, संत मार्कंडेय यांनी भगवान नारायण यांच्याकडे त्यांची ईश्‍वरीय शक्ती दाखविण्याचा आग्रह केला. त्या वेळी क्षणभरासाठी भगवान नारायणांनी पृथ्वीला जलमय केले. तेव्हा पृथ्वीवरील सर्व वस्तू प्रलयात वाहून गेल्या; मात्र प्रयाग येथील अक्षयवटाचा वरील भाग दिसत होता.

 

३. परमपिता ब्रह्मदेवाने प्रयाग येथे यज्ञ केला, तेव्हा अक्षयवट होता !

अक्षयवट स्वतःच पुष्पित-पल्लवित असतो. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही, हे त्याचे वैशिष्ट्य ! यज्ञांच्या दृष्टीने ‘प्रयाग’ हे पवित्र स्थळ आहे. असेही म्हटले जाते की, सृष्टीची निर्मिती करतांना परमपिता ब्रह्मदेवाने प्रथम प्रयाग येथे यज्ञ केला. अक्षयवट तेव्हाही होता. प्रयाग येथे ‘अक्षयवट’, मथुरा-वृंदावनात ‘वंशीवट’, गया येथे गयावट ज्यास ‘बौद्धवट’ असेही म्हटले जाते आणि उज्जैन येथे पवित्र ‘सिद्धवट’ आहे. हे सर्व वट अनेक वर्षांपासून श्रद्धा, समर्पण आणि आस्था यांची केंद्रे आहेत.

 

४. अक्षयवटाच्या भोवती श्रद्धेने ४ वेळा
प्रदक्षिणा घातल्यास साधकाला मोक्षप्राप्ती होते !

अक्षयवट अनादिकालापासून त्याग, तपस्या, आस्था आणि विश्‍वास यांचे प्रतीक आहे. अक्षयवटाच्या खाली केलेली तपस्या पूर्ण होते, तसेच श्रद्धा आणि भाव यांनी दर्शन केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. भागवत पुराणात असे म्हटले आहे की, अक्षयवटात भगवान विष्णु बालरूपात शयन करतात. अक्षयवट केवळ प्रयाग नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीचे प्रहरी मानले जाते. अक्षयवटाच्या भोवती कमीत कमी ४ वेळा प्रदक्षिणा घालून पुष्प आणि अक्षता अर्पण केल्यास साधकास मोक्षप्राप्ती होते.

 

५. मोगलांनी २३ वेळा जाळूनही अक्षयवट नष्ट झाला नाही !

मोगलांनी अक्षयवटाचे अस्तित्व समाप्त करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यांनी २३ वेळा अक्षयवटाला तोडून ते जाळून टाकले; मात्र त्याला पूर्ण काढून टाकण्यात त्यांना यश आले नाही. अक्षयवट पुन्हा उगवत होते. प्रयागराज येथे यमुनेच्या किनारी अकबराने किल्ला बनवण्यासाठी इ.स. १५७४ मध्ये प्रारंभ केला. हा किल्ला बांधायला ४२ वर्षे लागली. केवळ अक्षयवटाचे दर्शन न घेण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. किल्ला झाल्यानंतर अक्षयवटाचे दर्शन आणि पूजन बंद झाले. मोगलांनंतर ब्रिटिशांच्या काळातही अक्षयवटाचे दर्शन घ्यायला बंदी होती. इंग्रजांनी किल्ल्यावर ताबा घेऊन स्वतःची छावणी सिद्ध केली होती.

 

६. सरस्वती कुप या समवेत ४३ देवतांच्या मूर्ती !

अक्षयवटाप्रमाणे किल्ल्यात सरस्वती कुपाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. सरस्वती कुप हे पृथ्वीवरील सर्वांत पवित्र कुप (कुआं) मानले जाते. संगम येथे अदृश्य सरस्वती देवी आहे. तिचा वास या कुपात आहे, असे म्हटले जाते. मत्स्यपुराणात सरस्वती कुपाची कथा सांगितली आहे. ज्या प्रकारे गंगा ही गंगोत्री आणि यमुना ही यमनोत्रीतून निघाली, त्याप्रमाणे यमुनेच्या तिरावर बनवण्यात आलेल्या कुपात सरस्वती आहे. सरस्वती कुपाचे दर्शन घेतल्यानंतर मनोकामना पूर्ण होते, अशी सर्वत्र ख्याती आहे. अक्षयवटाव्यतिरिक्त किल्ल्यात ४३ देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. पाताळपुरी मंदिराच्या आत अक्षयवटाव्यतिरिक्त धर्मराज, अन्नपूर्णा, विष्णु, लक्ष्मी, श्री गणेश गौरी, शंकर महादेव, दुर्वास ऋषि, महर्षि वाल्मीकि, प्रयागराज, वैद्यनाथ, कार्तिकस्वामी, सती अनुसूया, वरुण देव, दंड, महादेव, काल भैरव, ललिता देवी, गंगा, यमुना, सरस्वती देवी, भगवान नरसिंह, सूर्यनारायण, जामवंत, गुरु दत्तात्रेय, बाणगंगा, सत्यनारायण, शनिदेव, मार्कंडेय ऋषि, गुप्त दान, शूल टंकेश्‍वर महादेव, देवी पार्वती, वेणी माधव, कुबेर भंडारी, आरसनाथ-पारसनाथ, संकटमोचन हनुमान, सूर्यदेव आदी मूर्ती आहेत.

 

७. सर्वपक्षीय सरकारांच्या इच्छाशक्तीअभावी अक्षयवटाचे दर्शन बंदच !

मोघल आणि इंग्रज यांच्या काळात अक्षयवटाचे दर्शन ४५० वर्षे बंद होते. इंग्रजांचे राज्य गेल्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून अक्षयवटाचे दर्शन पुन्हा चालू होईल, अशी भाविकांना साहजिक अपेक्षा होती. प्रत्यक्षात काँग्रेस आणि उत्तरप्रदेश येथे आतापर्यंत सत्तेवर आलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अन् माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांनी अक्षयवट खुले करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे इंग्रज देशातून गेल्यानंतरही केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी अक्षयवटाचे दर्शन घेण्यासाठी तो खुला झाला नाही. केवळ मुसलमानांना खूश ठेवण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी अक्षयवटाचे दर्शन खुले केले नाही, अशा प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.

 

८. संपूर्ण विश्‍वाला अभिमान वाटावा, असा भारतातील अक्षयवट !

अमेरिका अथवा इतर देशात एखादी पुरातन वस्तू सापडल्यास त्याचा जगभर डांगोरा पिटवला जातो; मात्र अतीप्राचीन असलेल्या अक्षयवटाचे माहात्म्य संपूर्ण विश्‍वाला अभिमान वाटावे, असे असूनही भारतातील तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने भाविकांच्या दर्शनासाठी तो खुला केला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाजप शासनाने अक्षयवटाचे दर्शन भाविकांसाठी खुले केल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! खरेतर देशातील तत्कालीन सर्वपक्षीय सरकारांनी या अक्षयवटाचे माहात्म्य सर्व विश्‍वात प्रसारित केले असते, तर संपूर्ण विश्‍वाला याची माहिती होऊन भारत देशाची मान विश्‍वात अभिमानाने उभी राहिली असती; मात्र निधर्मी, धर्मद्रोही तत्कालीन सरकारांना याची जाणीव नाही, हेच येथे अधोरेखित करण्यासारखे सूत्र !

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment