प्रयागराज (कुंभनगरी), ९ जानेवारी (वार्ता.) – सूर्य, चंद्र, ग्रह आणि नक्षत्र अन् त्यांचा प्राणीमात्रांवर तिथीनुसार होणारा परिणाम आदींचा परिपूर्ण अभ्यास केवळ ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. सनातन संस्था सनातन पंचांगाच्या माध्यमातून ही माहिती, तसेच साधना आणि अन्य धर्मज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. हे अत्यंत प्रशंसनीय कार्य आहे. या कार्यात सर्वांनी तन, मन आणि धन समर्पित करून सनातन संस्थेला अग्रेसर केले पाहिजे. सनातन संस्थेमध्ये पवित्र भाव आणि वातावरण पहायला मिळत आहे, असे गौरवोद्गार अखिल भारत वर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांनी काढले.
प्रयाग कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या शिबीर परिसरात इंग्रजी भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’च्या iOS या Apple प्रणालीतील अॅपचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. या वेळी उत्तरप्रदेशच्या बिहारघाट (बुलंदशहर) येथील पू. सुदेशजी महाराज, शिवकुटी (प्रयागराज) येथील श्री. विष्णु पंतजी, आचार्य श्री निशांतजी भारद्वाज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, समितीचे उत्तर आणि पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, समितीचे उत्तर प्रदेश अन् बिहार या राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी, समितीचे राजस्थान अन् मध्यप्रदेश या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् विविध राज्यांतून आलेले सनातनचे साधक उपस्थित होते.
कुंभमेळ्यातील सनातनच्या शिबिरात प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांचे आगमन झाल्यावर पू. नीलेश सिंगबाळ यांनी पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी महाराजांनी प्रदर्शनाच्या बांधकामाची पाहणी केली.
या वेळी समितीचे उत्तर आणि पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी बिहारघाट (बुलंदशहर) येथून आलेले पू. सुदेशजी महाराज यांचा पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
सनातन संस्था, सनातन आश्रम आणि साधक यांच्याविषयी गौरवोद्गार
प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज या प्रसंगी म्हणाले, ‘‘मी अनेक ठिकाणच्या आश्रमात जात असतो; पण सनातन संस्थेच्या गोवा राज्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात जे आध्यात्मिक वातावरण अनुभवले, ते मी अन्यत्र कोठेही अनुभवले नाही. आश्रमात एकही ‘पेड वर्कर’ (पैसे देऊन काम करणारा कामगार) नाही. आश्रमात कुठे कचरा (तिनका) पडलेला पाहिला नाही. आश्रमात पुष्कळ स्वच्छता आहे. प्रत्येक जण आपल्या कर्तव्याप्रती समर्पित आणि तत्त्वनिष्ठ भाव ठेवून कार्य करत आहे. सनातन संस्थेच्या आश्रमातील साधकांनी भगवी वस्त्रे घातलेली नसली, तरी प्रत्येक जण आतून महात्मेच आहेत. तुमच्यात आणि माझ्यात काही भेद नाही. आपण एकच आहोत. आमची संस्थाही तुमचीच आहे. काही आवश्यकता लागल्यास सांगावे.’’