पूजेत नैवेद्यादी समर्पणाचा उपचार पूर्ण झाल्यानंतर शेवटी आरती, प्रार्थना अन् मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. ‘आरात्रिक’ या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द सिद्ध झाला आहे. आरतीत देवतेचे माहात्म्यवर्णन आणि तिच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते. भक्तीमार्गात आरतीला महत्त्वाचे स्थान आहे. संतांची प्रासादिक काव्यरचना, भावभक्तीचे होणारे गायन, वाद्यांची साथ यांमुळे भावनिर्मिती होते. अर्थ आणि भावार्थ समजून घेऊन आरती म्हटल्यास भाववृद्धी होण्यास साहाय्य होते.