रामनाथी (गोवा) – मध्यप्रदेशातील राजगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी श्री. कर्मवीर शर्मा यांनी नुकतीच येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. शर्मा यांच्या पत्नी डॉ. (सौ.) अपूर्वा शर्मा, मित्र श्री. रवि तिवारी, मेहुणे श्री. भारद्वाज आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी सनातनच्या साधिका कु. निधी देशमुख यांनी सर्वांना आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. आश्रम पाहिल्यावर श्री. कर्मवीर शर्मा म्हणाले, ‘‘अत्यंत शांत आणि सात्त्विक वातावरणाची अनुभूती आश्रमात आली. सूक्ष्म जगताविषयीची माहिती आणि त्याचे विश्लेषण अद्भुत आहे.’’
आश्रमात चालणार्या आध्यात्मिक संशोधनाच्या कार्याविषयी श्री. शर्मा म्हणाले, ‘‘अध्यात्माच्या सर्व अंगांची तात्त्विक आणि वैज्ञानिक व्याख्या अजून स्पष्ट केली जाऊ शकते. मंत्रांमुळे होणार्या परिणामांवर अधिक अभ्यास केला गेला पाहिजे.’’
डॉ. (सौ.) अपूर्वा शर्मा – आश्रमात मला अत्यंत पावित्र्य, शांतता, सहजता जाणवली. तसेच येथील व्यवस्था कौतुक करण्यासारखी आहे. सूक्ष्म जगताचे ज्ञान वेगळे आणि बघण्यासारखे आहे. आश्रम अत्यंत चांगला वाटला. आश्रमाविषयी काही सूचना देऊ शकत नाही; कारण मी आत्मविभोरावस्थेत आहे.
श्री. रवि तिवारी (श्री. शर्मा यांचे मित्र), इंदूर, मध्यप्रदेश – आश्रमात चांगले वाटले. मन आनंदीत झाले. हिंदूंची एकजूट आणि हिंदु धर्माच्या प्रसारासाठी चाललेले कार्य कौतुकास्पद आहे. सूक्ष्म जगताचे क्षेत्र अद्भुत वाटले. हे कार्य चालू रहाण्यासाठी ईश्वराने सदैव कृपा करावी आणि आशीर्वाद द्यावेत.
श्री. कर्मवीर शर्मा हे उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री सप्तर्षी गुरुकुलचे संस्थापक-अध्यक्ष श्री. देवकरण शर्मा यांचे पुत्र आहेत. श्री. देवकरण शर्मा हे जून २०१८ मध्ये रामनाथी, गोवा येथे झालेल्या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभागी झाले होते, तसेच सनातनच्या आश्रमालाही भेट देऊन सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य जाणून घेतले होते.