‘मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे तीन स्तर असतात. त्यांतील शारीरिक आणि मानसिक स्तरांवर शुद्धी झाली की, आध्यात्मिक प्रगती करणे सुलभ होते’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार स्थूलदेह आजारी असला, तर साधना करणे कठीण जाते. स्वभावदोष खूप तीव्र असले, तर साधना करणे कठीण जाते. हे मी साधनेत आल्यापासून गेली ४० वर्षे अनेक ग्रंथांत वाचले आहे आणि अनुभवले आहे.
‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. त्यामुळे त्यात प्रतिदिन नवीन शिकता येते’, हाही अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. याची अनुभूती मला २०.१२.२०१८ या दिवशी आली. एका साधिकेत मानसिक स्तरावरील खूप राग येऊन दुसर्यांना ओरडणे इत्यादी अनेक स्वभावदोष तीव्र असूनही तिने २०.१२.२०१८ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. तेव्हा मला आश्चर्य वाटले. नंतर लक्षात आले की, ज्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या अपंगही साधनेत प्रगती करू शकतो, त्याचप्रमाणे अनेक स्वभावदोष असूनही साधकात भाव, प्रीती, ईश्वरप्राप्तीची तळमळ इत्यादी आध्यात्मिक गुण असले, तर मानसिक स्तरावरील अनेक स्वभावदोष त्याच्यात असूनही त्याची साधनेत प्रगती होते. त्रेता आणि द्वापर युगांत रागामुळे शाप देणार्या ऋषींची काही उदाहरणे आहेत. त्यांनी तपश्चर्या करून साधनेत प्रगती केली, तरी स्वभावदोष अल्प न झाल्यामुळे ते शाप देत.
वर उल्लेखिल्याप्रमाणे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणारे असे साधक साधनेत पुढे गेल्यावर त्यांच्यातील मानसिक स्तरावरील अनेक स्वभावदोष आपोआप अल्प होऊन नाहीसे होतात आणि ते संतही होऊ शकतात. ‘काही ऋषिमुनी शेकडो वर्षे तप करूनही त्यांचे राग आदी स्वभावदोष मात्र कसे काय उफाळून येत असत’, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. याचे उत्तर म्हणजे, अशा ऋषिमुनींचे बहुतांशी तपोबल हे सृष्टीवर ओढवणार्या संकटांपासून सृष्टीचे रक्षण करणे, अखिल मानवजातीचे कल्याण साधणे यांसारख्या समष्टी कार्यांसाठी वापरले जात असे. अशा ऋषिमुनींनी नंतर दयेपोटी उःशाप दिल्याचेही अनेक दाखले पुराणांमध्ये आहेत.
‘साधकात अनेक तीव्र स्वभावदोष असूनही त्याच्यात भाव, प्रीती, ईश्वरप्राप्तीची तळमळ इत्यादी आध्यात्मिक गुण असले, तर त्याची साधनेत प्रगती होते’, याचा अर्थ ‘साधकाने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता नाही’, असा मुळीच घेऊ नये. याउलट ही प्रक्रिया न राबवल्यास साधनेत घसरण होण्याची शक्यता अधिक असते आणि राबवल्यास आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने होते.’