परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धन्वंतरि देवाला प्रार्थना करून औषधी वनस्पतींना केवळ एक मिनिट हस्तस्पर्श केल्यावर त्या वनस्पतींवर झालेला सकारात्मक परिणाम

‘औषधी वनस्पतींमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदात त्यांचा उपयोग विविध विकार बरे करण्यासाठी केला जातो. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या लागवड परिसरात नरक्या, शतावरी, गवती चहा, आवळा, वाळा, बेल, चंदन आदी औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले आहे. या औषधी वनस्पतींचे भूमीत रोपण करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धन्वंतरि देवतेला प्रार्थना करून साधारण १ मिनिट त्या वनस्पतींना हस्तस्पर्श केला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केल्यावर त्या औषधी वनस्पतींवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २७.५.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नरक्या, शतावरी, गवती चहा, आवळा, वाळा, बेल आणि चंदन या ७ औषधी वनस्पतींना हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि त्यांनी एक मिनिट त्या औषधी वनस्पतींना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वनस्पतींच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

२. औषधी वनस्पतींच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी औषधी वनस्पतींना हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि हस्तस्पर्श केल्यानंतरही त्या वनस्पतींमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी औषधी वनस्पतींना हस्तस्पर्श करण्यापूर्वीही त्या वनस्पतींमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे आणि त्यांनी वनस्पतींना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वनस्पतींच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सातही औषधी वनस्पतींना हस्तस्पर्श करण्यापूर्वी त्या वनस्पतींमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. त्यांच्या प्रभावळही अनुमाने १ मीटर ते १.५ मीटर होत्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या वनस्पतींना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वनस्पतींच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. त्यांपैकी चंदनाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत (०.२७ मीटर) सर्वांत अल्प प्रमाणात वाढ झाली, तर वाळ्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत (०.७५ मीटर) सर्वाधिक प्रमाणात वाढ झाली.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी औषधी वनस्पतींना
हस्तस्पर्श केल्यावर त्या वनस्पतींच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. औषधी वनस्पतींच्या एकूण प्रभावळी अनुमाने १.२ मीटर ते १.८ मीटर होत्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी औषधी वनस्पतींना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वनस्पतींच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली. शतावरीच्या एकूण प्रभावळीत (०.२६ मीटर) सर्वांत अल्प प्रमाणात वाढ झाली, तर चंदनाच्या एकूण प्रभावळीत (०.७३ मीटर) सर्वाधिक प्रमाणात वाढ झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी औषधी वनस्पतींना
एक मिनिट हस्तस्पर्श केल्यावर त्या वनस्पतींची सकारात्मक
ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ यांत वाढ होण्यामागील कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीमुळे त्यांचा देहसुद्धा अतिशय चैतन्यमय झाला आहे. त्यांनी औषधी वनस्पतींना हस्तस्पर्श करण्यापूर्वी आयुर्वेदाची देवता असणार्‍या ‘धन्वंतरी’ देवाला भावपूर्ण प्रार्थना केली होती. संतांच्या प्रार्थनेत पुष्कळ आर्त भाव असल्याने देवता लगेच प्रसन्न होतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावपूर्ण प्रार्थनेमुळे धन्वंतरी देवाचे तत्त्व तेथे कार्यरत झाले. धन्वंतरि देवाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि संतांमधील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील) चैतन्य यांचा एकत्रित परिणाम औषधी वनस्पतींवर झाला. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी औषधी वनस्पतींना केवळ एक मिनिट हस्तस्पर्श केल्यावर त्या वनस्पतींच्या सकारात्मक ऊर्जेत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झालेली दिसून आली.

३ आ. औषधी वनस्पतींची चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता आणि आवश्यकता
यांनुसार त्यांनी धन्वंतरि देवता अन् संत यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करणे

औषधी वनस्पती या मुळातच सात्त्विक असतात. त्यामुळे त्या सात्त्विक वातावरण, सात्त्विक संगीत, सात्त्विक व्यक्ती आदींना सकारात्मक प्रतिसाद देतात. या चाचणीतील औषधी वनस्पती सात्त्विक असल्याने त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. औषधी वनस्पतींनी त्यांची क्षमता आणि आवश्यकता यांनुसार धन्वंतरि देवता आणि संत यांच्याकडून प्रक्षेपित होणारे (सगुण अन् निर्गुण) चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे चाचणीतील सातही वनस्पतींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वेगवेगळी वाढ झालेली दिसून आली.

थोडक्यात सांगायचे, तर औषधी वनस्पती सात्त्विक असल्याने त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असते. त्यांच्यातील औषधी गुणधर्मामुळे त्यांचा उपयोग विविध विकारांवर होतो. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे वातावरणही सात्त्विक बनते. त्यामुळे समष्टीलाही लाभ होतो. तसेच भावी आपत्काळाच्या दृष्टीने औषधी वनस्पतींची लागवड करणे अत्यावश्यक आहे. या आपत्काळात तिसरे महायुद्ध आरंभ झाल्यावर डॉक्टर, औषधे, वाहतुकीच्या सोयी आदींचा तुटवडा निर्माण होणार आहे. तेव्हा आपल्याला औषधी वनस्पतींचाच आधार असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपली सदनिका, घराभोवतीची मोकळी जागा, शेत आदींमध्ये औषधी वनस्पतींची लागवड तत्परतेने करा आणि भावी आपत्काळास तोंड देण्याची सिद्धता करा !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२४.६.२०१८)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment