कुंभमेळ्यातील काही प्रथा आणि त्यांचा इतिहास

जागतिक स्तरावर असलेल्या सर्वांत मोठ्या आध्यात्मिक यात्रेची म्हणजेच ‘कुंभमेळ्या’ची प्रातिनिधिक छायाचित्रे

१. आखाडा शब्दाची उत्पत्ती आणि संन्याशाचे प्रकार

‘कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या धार्मिक संमेलनात शस्त्र धारण करण्याविषयी निर्णय होऊन एकत्र येण्याचे ‘अखंड आवाहन’ करण्यात आले. ‘अखंड’ शब्द पुढे आखाडा या नावे रुढ झाला. हिंदु धर्मात चार आश्रमांपैकी संन्यासाश्रमाला प्राधान्य दिले गेले. आत्मज्ञान प्राप्तीकरीता संन्यास घेणे आवश्यक सांगितले आहे. संन्याशाचे १. कुटिचक, २. बहूदक, ३. हंस आणि ४. परमहंस, हे चार प्रकार सांगितले आहेत.

 

२. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संन्याशांनीसुद्धा शस्त्र धारण करणे

मुसलमान शासनकर्त्यांनी सनातन हिंदु धर्म बलपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला; म्हणून स्वसंरक्षण, तसेच हिंदु धर्म संरक्षणाकरता संन्याशांनीसुद्धा शस्त्र धारण करण्याचे ठरवले. शास्त्रधारी संन्याशी शस्त्रधारी बनले. कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या संमेलनात त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळून धर्मरक्षणाकरता सर्वस्वाचे बलीदान करण्यास सिद्ध असलेले नवयुवक संन्याशासमवेत एकत्र झाले होेते. त्या सर्वांची इच्छा बघून त्यांनाही संन्यास दीक्षा देण्यात आली. हे सर्व सज्ज होऊन वस्त्रादी सर्व साधनांचा त्याग करून नागा अवस्थेत राहू लागले.

 

३. नागा संन्याशांचे आखाडे

प्रथम आखाडा आवाहनाच्या स्थापनेनंतर नागा संन्याशांची संख्या वाढल्यामुळे आखाड्यांची नवनवीन निर्मिती होत गेली. त्याचा क्रम पुढीलप्रमाणे आहे.

१. श्री आवाहन आखाडा, २. श्री अटल आखाडा, ३. श्री आनंद आखाडा, ४. श्री निरंजनी आखाडा, ५. श्री जुना आखाडा, ६. श्री पंचअग्नि आखाडा,

७. श्री नाथपंथी, ८. श्री वैष्णवी बैरागी, ९. श्री उदासिनी पंचायती बडा आखाडा, १०. श्री उदासिनी नया आखाडा, ११. श्री निर्मल पंचायती आखाडा

 

४. राजयोगी (शाही) स्नान

४ अ. स्नान करण्याचा क्रम

कुंभमेळ्याच्या वेळी राजयोगी (शाही) स्नान करतांना प्रथम नागासंन्यासी पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करतात. त्यानंतर बैरागी साधू स्नान करतात, नंतर जुने उदासी आणि नवे उदासी स्नान करतात. सर्वात शेवटी निर्मळ आखाड्याचे साधू स्नान करतात. सर्व साधूंच्या स्नानानंतर दुपारी सर्व भाविकांस स्नानाची अनुमती असते. साधूंच्या या स्नानक्रमावरून नियम झालेला आहे.

४ आ. स्नानाची पर्वणी

राजयोगी स्नानाच्या दिवशी पहाटे चारपासून मिरवणुका प्रारंभ होतात; मात्र सामान्य जनतेला या मिरवणुका दुरूनच पहाता येतात. दुपारी बारानंतरच सर्वांना प्रवेश दिला जातो. साधूंच्या मिरवणुका पहाणे हासुद्धा एक सोहळा असतो. त्यात रेशमी अन् मखमली पडदे, गाद्या, उशा, तक्के, उंची गालीचे आणि अलंकारांनी मढवलेले मंडप (शामियाने) असतात. अनेक आखाड्यांचे हत्ती आणि घोडेही असतात. नाशिकमध्ये गोदावरी मातेचे मंदिर आणि कपालेश्‍वराचे मंदिर इथे त्यांचे महंत दर्शन घेतात. त्र्यंबकेश्‍वर येथे सर्व मंदिरांमध्ये दर्शन आणि कुशावर्तात स्नान होते. नाशिकमध्ये गंगेवर बारा वर्षे बंद असलेले गोदामातेचे मंदिर पहिल्या दिवशी उघडले जाते. त्यानंतर सर्व जण दर्शन घेतात आणि पूजाविधी करतात. मग सर्व साधू ठरवलेल्या क्रमानुसार स्नानासाठी येतात. त्र्यंबकेश्‍वरी पहाटे सुरू झालेली मिरवणूक पूर्वापार पद्धतीप्रमाणे चालते. आखाड्यात प्रत्येकाची देवता असते. साधू, संत, महंत, मंडलेश्‍वर हे रितीप्रमाणे हत्ती आणि घोडे यांवर आरुढ होऊन येतात. कुशावर्तावर पोहोचल्यावर देवतेसह पूजा करून मग शाही स्नान चालू होते. हा सोहळा कुणीच पाहू शकत नाही. सामान्यांनी साधूंच्या आखाड्यात घुसण्याचा प्रयत्न करू नये.

प्रत्येक आखाड्याचा ध्वज असतो. याला ‘धर्मध्वज’ म्हणतात. ध्वज लावणे ही सिंहस्थ चालू झाल्याची खूण असते.

जे साधू जीवनभर गुहेत राहून तपश्‍चर्या करतात, ते कुंभमेळ्यानिमित्त बाहेर पडतात आणि स्नानासाठी एकत्र येतात. त्यांचे दर्शन आणि सत्संग यांचा लाभ अशा शुभ वेळी अवश्य घ्यावा.

 

५. शैव पंथियांनी त्र्यंबकेश्‍वर येथे आणि वैष्णव पंथियांनी नाशिक
येथे स्नान करावे, अशा पेशव्यांनी घालून दिलेल्या निर्णयाप्रमाणे मिरवणुका चालणे

पेशव्यांनी शैव पंथियांनी त्र्यंबकेश्‍वर येथे आणि वैष्णव पंथियांनी नाशिक येथे स्नान करावे असा निवाडा दिल्यापासून मिरवणुका शांतपणे चालतात. अनेक प्रकारची वाद्ये पहाणे, हेसुद्धा आकर्षण असते. यात डंका हे निर्वाणी पंथाचे वाद्य घोड्यावर, तर निर्मोही पंथाचे वाद्य उंटावर असते. धार्मिक घोषणांनी वातावरण दुमदुमून जाते. नाशिक येथे प्रत्येक आखाडा स्वतःच्या ध्वजाला स्नान घालून, गंध लावून, फुलांचे हार घालत आणि नंतर साधू स्नानाच्या वेळी गोदावरीची पूजा करतात अन् गंगामंदिरात गंगामातेची पूजा केली जाते.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment