मध्यप्रदेशातील थोर संत सर्वसंग परित्यागी प.पू. भुरानंदबाबा

प.पू. भुरानंदबाबा

प.पू. श्री अनंतानंद साईश एक अद्वितीय गुरु होते. त्यांनी तीन निरनिराळ्या मार्गांतील तीन शिष्य सिद्ध केले.

१. सर्वसंग परित्यागी प.पू. भुरानंदबाबा

२. तांत्रिक श्रीराम पंडित

३. भक्तीमार्गातील संत भक्तराज महाराज (सनातन संस्थेचे श्रद्धास्थान)

यांतील मध्यप्रदेश येथील प.पू. भुरानंदबाबा हे सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू होत. प.पू. भुरानंदबाबा यांचे कौटुंबिक जीवन, बालपण, गृहत्याग, गुरुभेट, साधकांना त्यांच्याविषयी आलेली अनुभूती आणि देहत्याग यांविषयी आज असलेल्या त्यांच्या निर्वाणोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया.

१. कौटुंबिक जीवन

प.पू. भुरानंदबाबा मूळचे मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील. त्यांचे मूळ नाव शंकर होते. ते भिल्ल जातीतील होते. त्यांना १ भाऊ आणि १ बहीण होती. शंकर घरी असतांना त्याच्या बहिणीचे लग्न झाले. घरची गरिबी इतकी होती की, अर्धी गोधडी अंगावर आणि अर्धी खाली घालून शंकर झोपायचा.

 

२. बालपण

शंकर लहानपणी पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत लपायचा. तेथील नाग ‘फुसऽऽ’ करायचा. तेव्हा तोही त्याला ‘फुस ऽऽ’ करायचा, घाबरायचा नाही. वयाच्या ७-८ व्या वर्षी शंकरच्या अंगाला एवढी गळवे झाली की, त्यांतून पू यायचा; म्हणून आई दुरून अन्न वाढायची. एकदा तो पहाटे नाल्याच्या बाजूला संडासाला गेला असता एक साधू आला आणि म्हणाला, ‘‘आंघोळ कर. तुला बरे वाटेल’’; पण थंडी होती, म्हणून शंकर आंघोळ करू शकला नाही. तेव्हा साधू म्हणाला, ‘‘लाडू खा.’’ लाडू खायला गेल्यावर साधूने त्याला पाण्यात ढकलले. मग त्या साधूने त्याला अर्धा तास पाण्यातून वर येऊ दिले नाही. नंतर सूर्य वर यायला लागला, तसतसे पू येणे न्यून झाले आणि दुपारी १२ वाजता खपल्याही पडून गेल्या. नंतर डागही राहिले नाहीत.

 

३. गृहत्याग आणि प.पू. श्री अनंतानंद साईश यांच्याकडे (गुरूंकडे) जाणे

काही काळाने शंकरचे वडील वारले. तेव्हा एक जण म्हणाला, ‘‘ईश्‍वराने वडिलांना नेले.’’ तेव्हा शंकर ईश्‍वराचा शोध घ्यायला निघाला. तो चालत चालत तीन दिवसांनी प.पू. श्री अनंतानंद साईश यांच्याकडे पोहोचला. तेव्हाही तो लोकांना साधूच वाटायचा. कोणी खायला द्यायचे. कोणी विचारले, ‘‘कोठे जाता ?’’, तर म्हणायचा, ‘‘मी सूर्याला भेटायला जात आहे. यायचे आहे का ?’’ तेव्हा लोक म्हणायचे, ‘‘बघा, महाराज काय बोलत आहेत.’’ कोणी हसायचेही. तीन दिवसांनंतर शंकर प.पू. श्री अनंतानंद साईश यांच्या कुटीवर आला. ते बडवाहला गेले होते. आल्यावर पहातात तो एक मुलगा दाराबाहेर झोपला आहे. त्यांनी त्याला तिक्कड खायला दिले. २४ तासांनी उठल्यावर त्याची चौकशी केली. मग म्हणाले, ‘‘१-२ दिवस रहा.’’ नंतर त्याला बडवाहला नेले. तो परत प.पू. श्री अनंतानंद साईश यांच्याकडे आला. ते म्हणाले, ‘‘घरी जा.’’ शंकर म्हणाला, ‘‘मला घरच नाही मुळी. मला जेवण द्या. मी आपले पाय दाबीन.’’ मग त्याच्या सेवेला प्रारंभ झाला.

आई-बापावाचून असलेल्या या पोराला बाबांनी अनाथ असल्याची जराही जाणीव होऊ दिली नाही. त्या अशिक्षित पोरानेसुद्धा बाबांची सेवा करण्यात किंचितही कसर सोडली नाही. तो बाबांची रात्रंदिवस सेवा करी अन् त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागे.

 

४. गुरुमंत्र मिळणे आणि शंकरचा भुरानंदबाबा होणे

दोन-तीन मासांनंतर कोटावालेबाबांंनी प.पू. श्री अनंतानंद साईश यांना सांगितले, ‘‘हा लहान मुलगा चांगला आहे. तुझ्याजवळ ठेव. त्याची शेंडी कापून टाक.’’ प.पू. श्री अनंतानंद साईश यांनी मारुतीला अभिषेक करण्याचे सामान घेतले आणि मंगळवारी (उत्तरेत मंगळवार हाही मारुतीचा दिवस समजला जातो.) त्यांनी शंकरला आंघोळ घालून मारुतीला अभिषेक केला आणि त्याच्या कपाळाला अन् दोन्ही पायांच्या अंगठ्यांना शेंदूर लावला आणि त्याला नमस्कार केला. मग स्वतःला (प.पू. श्री अनंतानंद साईश यांना) तसेच करायला प.पू. श्री अनंतानंद साईश यांनी त्याला सांगितले. तसे केल्यावर त्यांनी शंकरची शेंडी कापली, मारुतीसमोर गुरुमंत्र दिला आणि सांगितले, ‘‘शंकर, आजपासून तुझा पुनर्जन्म झाला. तू शंकर राहिला नाहीस. तू ‘भोलानंद’ आहेस. माझ्यासाठी तू शंकरच आहेस.’’ बाबांचे हे संबोधन शंकरला खरोखरंच पूर्णतः लागू होते; कारण तो खरोखरंच भोळा होता आणि तसाच तो शेवटपर्यंत राहिला. पुढे त्याचे नाव पडले ‘भुरानंद’.

 

५. प.पू. भुरानंदबाबांच्या संदर्भात साधकांना आलेली अनुभूती

रात्री दोन वाजता नदी पार करण्यापूर्वी ‘आता माझी बॅटरी चार्ज
होईल’, असे प.पू. भुरानंदबाबा यांनी सांगणे आणि त्याच वेळी त्यांच्या समोर प्रकाश दिसणे

एकदा मोरटक्का येथे प.पू. भुरानंदबाबा आले होते. रात्री दोन वाजेपर्यंत भजनांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर प.पू. भुरानंदबाबा संत भक्तराज महाराजांना म्हणाले, ‘‘मैं अभी मेरे कुटीमें सोने के लिए जाता हूँ ।’’ तेव्हा बाबा मला म्हणाले, ‘‘भुरानंदबाबा नदी कसे पार करतात, ते जाऊन पहा.’’ मी आणि काही भक्त त्यांच्यासमवेत गेलो. तेव्हा सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते. आम्ही त्यांना विजेरीचा प्रकाश दाखवला. तो पाहून प.पू. भुरानंदबाबा आमच्यावर ओरडले आणि म्हणाले, ‘‘बॅटरी बंद करा. आता माझी बॅटरी चार्ज होईल.’’ त्याच वेळी त्यांच्यासमोर एक प्रकाश दिसत होता. गुरुमहाराज त्यांच्या शिष्याला मार्ग कसा दाखवतात, हे आम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळाले.’ – श्री. बापू जोशी, ठाणे

 

६. देहत्याग

प.पू. श्री अनंतानंद साईश यांनी भुरानंदबाबांना सांगितले होते, ‘‘अखेरपर्यंत तू ही कुटी आणि हा काठ सोडून जायचे नाही.’’ त्याप्रमाणे भुरानंदबाबा कुठेही न जाता आयुष्यभर तेथेच राहिले आणि त्यांनी त्याच ठिकाणी १५ डिसेंबर १९८९ या दिवशी देहत्याग केला.

६ अ. देहत्यागानंतरही स्थुलातील अनुभूती देऊन शिकवणे

प.पू. भुरानंदबाबा यांनी देहत्याग केल्यावर त्यांचा शिष्य परमानंद याला कळेना की, आता काय करायचे ? एकदा असाच विषण्ण अवस्थेत बसलेला असता त्याला भुरानंदबाबा दिसले. त्यांनी त्याच्याकडे विडी मागितली. परमानंदाने ती दिली. विडी अर्धी ओढून ती टाकून गुरु निघून गेले. परमानंद भानावर आला, तेव्हा त्याला तेथे अर्धी जळलेली विडी दिसली; म्हणजे ‘झालेले सर्व खरे होते आणि गुरु अजूनही आहेत’, याची त्याला निश्‍चिती पटली.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांचे बालपण ते शिष्यावस्था’

Leave a Comment