‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना साधकाला एकाच वेळी सर्वस्वाचा त्याग करणे शक्य नसते; पण साधक टप्प्याटप्प्याने तन, मन, धन अशा प्रकारे त्याग करत पुढे सर्वस्वाचा त्याग करू शकतो. सत्साठी त्याग केल्यावर साधकाला पुढच्या पुढच्या स्तराच्या अनुभूती येतात. तेव्हा साधकाची ईश्वरावरील श्रद्धा वाढत जाते आणि साधकाची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होत जाते. या संदर्भात अधिक विवरण पुढे देत आहोत.
१. त्याग म्हणजे काय ?
त्याग करणे म्हणजे वस्तूंचा त्याग करणे नव्हे, तर त्या सर्व वस्तूंसंबंधीची आसक्ती सुटणे होय. गुरु शिष्याला त्याच्याकडे असलेल्या वस्तूंचा त्याग करायला लावतात. शेवटी त्याची आसक्ती सुटली की, त्याला भरपूर देतात. शिवाजी महाराजांना आसक्ती नव्हती; म्हणूनच त्यांनी समर्थ रामदासस्वामींना अर्पण केलेले राज्य स्वामींनी शिवाजी महाराजांना परत देऊन टाकले.
१. स्वार्थ तीन प्रकारचे आहेत – कायिक, वाचिक आणि मानसिक. आपल्या देहाला दुसर्यासाठी कष्ट न होतील, ही काळजी घेणे हा कायिक स्वार्थ. ‘माझ्या बोलण्याला सर्वांनी मान द्यावा आणि मी कोणाला अल्प-अधिक बोललो, तरी त्याने ते निमूटपणे सहन करावे’, अशी मनोवृत्ती असणे म्हणजे वाचिक स्वार्थ. ‘माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे’, या इच्छेला ‘मानसिक स्वार्थ’ म्हणता येईल. अहं नष्ट होण्यासाठी स्वार्थत्याग आवश्यक आहे.
२. स्वतःला आवडणारी एखादी वस्तू दुसर्याला देणे म्हणजे स्वतःच्या आवडीला मुरड घालणे. असे केल्याने हळूहळू स्वतःविषयीचे विचार अल्प होऊ लागतात आणि त्यामुळे अहं अल्प होऊ लागतो.
३. आपले घर मनातून गुरूंना अर्पण करून ‘मी त्यांच्या घराचा विश्वस्त आहे’, या भावाने ते सांभाळावे. यामुळे घर, घरातील वस्तू इत्यादींविषयीचा अहं अल्प व्हायला लागतो.
४. दुसर्या साधकाची सेवा लवकर होण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे आपल्या वेळेचा त्याग करणे होय. ईश्वरासाठी सर्वस्व अर्पण करता यावे, या उद्देशाने टप्प्याटप्प्याने आपले तन, मन, धन अन् प्राण यांचा त्याग करता येणे आवश्यक आहे.
२. त्यागाचे महत्त्व
अ. आध्यात्मिक प्रगतीसाठी तन, मन आणि धन या सर्वांचा त्याग करावयाचा असतो. त्यातील धनाचा त्याग करणे पदार्थविज्ञानदृष्ट्या सर्वांत सोपे आहे. आपले सर्व धन आपण दुसर्याला देऊ शकतो.
आ. तन आणि मन हे तसे देता येत नाहीत. तरीही व्यक्ती प्रथम त्यांचा त्याग करू शकते, म्हणजे तनाने शारीरिक सेवा आणि मनाने नामजप करू शकते.
इ. मनुस्मृतीच्या दुसर्या अध्यायातील ९५ व्या श्लोकात सांगितले आहे, ‘प्रापणात् सर्वकामानां परित्यागो विशिष्यते ।’, म्हणजे ‘सर्व कामनांच्या प्राप्तीपेक्षा त्यांच्या त्यागात आनंद आहे.’
ई. पुढे स्वतःमध्ये संतवृत्ती निर्माण झाल्यानंतरच साधक धनाचाही त्याग पूर्णपणे करू शकतो.
३. त्याग केल्याने होणारे लाभ
त्यागाचा एक महत्त्वाचा लाभ असा की, त्यागामुळे मनात इतरांविषयी सद्भावना निर्माण होऊन त्यांच्याविषयी प्रेम वाटायला लागते. कैवल्योपनिषदामध्ये तिसर्या श्लोकात म्हटले आहे, ‘न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः ।’, म्हणजे ‘कर्म वा वंशवृद्धी किंवा धन यांनी नव्हे, तर एका त्यागाने अमृतत्वाची प्राप्ती होते.’
४. त्यागाविषयी सनातनच्या साधकांना मिळालेले अद्वितीय ज्ञान !
‘तन, मन आणि धन यांचा त्याग केलेला, अर्पित अवस्थेतील ‘निर्मळ’ जीव अन् अहं समर्पित केलेला अद्वैताकडे जाणारा ‘शुद्ध’ जीव असतो.
४ अ. अर्पित अवस्था
साधनेला प्रारंभ केल्यानंतर तन, मन आणि धन यांचा त्याग झाला, तरच जिवाने केलेल्या नामजपाला अर्थ प्राप्त होतो.
१. तनाचा त्याग
हा जिवाची देहबुद्धी न्यून करतो.
२. मनाचा त्याग
हा जिवाची मायेविषयी असलेली ओढ अल्प करतो.
३. धनाचा त्याग
हा जिवाला आसक्तीविरहित जीवन जगण्यास शिकवतो. तन, मन आणि धन यांच्या त्यागामुळे जिवाला साधनेतील खरा आनंद मिळतो. जिवाच्या या अवस्थेला ‘अर्पित अवस्था’ असे म्हणतात. अर्पित अवस्थेत जीव ‘निर्मळ’ बनतो. ‘निर्मळ’ म्हणजे संस्कार आणि विकार यांची मलीनता नसलेले.
४ आ. समर्पित अवस्था
तन, मन आणि धन यांच्या त्यागातून प्राप्त झालेली अर्पित अवस्था जिवाला त्याच्या ‘स्व’(अहं)पासून विलग करते. जिवाच्या या अवस्थेला ‘समर्पित अवस्था’ असे म्हणतात. अर्पित अवस्थेनंतर जिवाला गुरुकृपेमुळे ‘स्व’(अहं)चा त्याग करणे सोपे जाते; कारण तन, मन आणि धन यांच्या त्यागामुळे जिवाचे चित्तावरील बरेच संस्कार अल्प झालेले असतात. समर्पित अवस्थेत जीव ‘शुद्ध’ बनतो. ‘शुद्ध’ म्हणजे निर्मळतेची जाणीव नसलेले. अहं अल्प झाला की, स्वतःच्या निर्मळतेचीही जिवाला जाणीव रहात नाही.’
– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.७.२००४, सकाळी १०.५९)
नामजप, सत्संग, सत्सेवा करतांना प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार प्रथम एका मासातून (महिन्यातून) एक दिवस, पुढे आठवड्यातून एक अशा प्रकारे तन, मन आणि धन यांच्या स्तरावर सत्साठी अधिकाधिक त्याग करावा अन् अशा साधकांवर अधिकाधिक गुरुकृपा व्हावी, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !’