‘ईश्वरप्राप्तीसाठी (आनंदप्राप्तीसाठी) साधना करणार्या साधकाच्या दृष्टीने नामजपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. २४ घंटे (तास) नामजप होणे साधनेसाठी अत्यंत आवश्यक असते. नामजपाच्या पुढचा टप्पा म्हणजे सत्संग. सत्संगामुळे नामजपात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होते, तसेच सत्संगामध्ये साधकाला साधनेविषयी दिशादर्शन केले जाते.
या लेखामध्ये आपण सत्संगाची व्याख्या, महत्त्व, लाभ इत्यादींविषयी जाणून घेऊया !
१. सत्संग म्हणजे काय ?
सत्संग म्हणजे सत् चा संग. सत् म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्मतत्त्व. सत्संग म्हणजे ईश्वराच्या किंवा ब्रह्मतत्त्वाच्या अनुभूतीच्या दृष्टीने, म्हणजेच अध्यात्माला पोषक असे वातावरण. कीर्तनाला किंवा प्रवचनाला जाणे, देवळात जाणे, तीर्थक्षेत्री रहाणे, संतलिखित आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, इतर साधकांच्या सान्निध्यात येणे, संत किंवा गुरूंकडे जाणे इत्यादी गोष्टींमुळे अधिकाधिक उच्च स्तराचा सत्संग प्राप्त होतो.
२. सत्संगाचे महत्त्व काय ?
एकदा वसिष्ठ आणि विश्वामित्र ऋषींत वाद झाला की, सत्संग श्रेष्ठ कि तपश्चर्या ? वसिष्ठऋषि म्हणाले, ‘‘सत्संग’’; तर विश्वामित्रऋषि म्हणाले, ‘‘तपश्चर्या’’. वादाचा निकाल लावण्यासाठी ते देवांकडे गेले. देव म्हणाले, ‘‘शेषच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल !’’ तेव्हा दोघेही शेषनागाकडे गेले. त्यांनी प्रश्न विचारल्यावर शेष म्हणाला, ‘‘माझ्या डोक्यावरचा पृथ्वीचा भार थोडा तुम्ही हलका करा. मग मी विचार करून उत्तर देईन.’’ यावर विश्वामित्रांनी संकल्प केला, ‘माझ्या सहस्र (हजार) वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मी अर्पण करतो. पृथ्वीने शेषाच्या डोक्यावरून थोडे वर जावे.’ तरी पृथ्वी थोडीही हालली नाही. मग वसिष्ठऋषींनी संकल्प केला, ‘अर्ध घटकाभराच्या (बारा मिनिटांच्या) सत्संगाचे फळ मी अर्पण करतो. पृथ्वीने भार हलका करावा.’ पृथ्वी लगेच वर उचलली गेली.
साधनेत प्रयत्नपूर्वक केलेल्या नामजपाचे एकूण महत्त्व ५ टक्के आहे. सत्संग आणि संतसहवास ३० टक्के, तर सत् (संत)सेवा १०० टक्के महत्त्वाची आहे.
३. सत्संगाचे लाभ कोणते ?
अ. दैनंदिन जीवनात आपल्या संपर्कात येणार्या बर्याच व्यक्तींचा अध्यात्म, साधना इत्यादी गोष्टींवर विश्वास नसतो. त्यामुळे ते अध्यात्माविरुद्ध बोलतात किंवा साधनेची टिंगल करतात. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतील साधकाचे मन साधनेविषयी डळमळीत होण्याचा संभव असतो. साधकाच्या मनात साधनेविषयी विकल्प निर्माण झाला असेल, तर सत्संगात गेल्यामुळे तो नाहीसा व्हायला साहाय्य होते.
आ. काही रुग्णांवर एकत्रित उपचार करण्याच्या पद्धतीचा (ग्रुप थेरपीचा) एक लाभ म्हणजे, रुग्णांत इतरांपेक्षा लवकर बरे होण्याची एकप्रकारची चढाओढ आपोआप निर्माण होते. त्यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. अशाच प्रकारचा लाभ सत्संगाला जाणार्या साधकांनाही होतो.
इ. सत्संगात एकमेकांशी चर्चा केल्यामुळे ‘इतर साधकांना साधनेत काय काय अडचणी येतात आणि त्यांचे निवारण ते किंवा गुरु कसे करतात’, हे साधकाच्या लक्षात येते.
ई. सत्संगाला येणार्या साधकांतील सत्त्वगुणाचे प्रमाण समाजातील इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते. त्यांच्या एकत्रित सत्त्वगुणामुळे सात्त्विक वातावरण निर्माण होते. त्यामुळे साधकातील सत्त्वगुणाचे प्रमाण वाढायला साहाय्य होते.
उ. सात्त्विक वातावरणात साधकाची ध्यान इत्यादी साधना जास्त चांगली होते.
ऊ. सात्त्विक व्यक्तींच्या सान्निध्यात काही चांगल्या शक्तीही असतात. त्यांचाही साधकाला लाभ होतो.
ए. सत्संगाला येणारे इतर साधक आपलेच आहेत, हा भाव निर्माण होतो. त्यामुळे तीन-तीन पिढ्यांपासून चालत आलेले भांडण विसरून तरुण मुले एकमेकांशी कुटुंबाप्रमाणे वागायला लागतात. त्यातूनच पुढे ‘अवघे विश्वचि माझे घर’ असा भाव निर्माण होतो. कुसंगाचा परिणाम सत्संगाच्या अगदी उलट होतो; म्हणून तो टाळावा.
ऐ. सत्संगामुळे अनुभूती येतात. अनुभूतींमुळे साधनेवरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. अनुभूतीचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
ऐ १. सत्संग आणि कुलदेवी अन् दत्त यांचा नामजप यांमुळे डोळे मिचकावणे आणि त्वचारोग अन् दाह बरा होणे
‘कल्पनाकुमारी नावाची एक लहान मुलगी हिरापूर सत्संगात येते. ती त्वचारोगाने त्रस्त असल्यामुळे तिच्या सर्वांगाची लाही-लाही व्हायची. तसेच तिला सतत डोळे मिचकावण्याचीही सवय होती. दोन ते तीन मास सतत सत्संगाला उपस्थित राहिल्यावर तिची डोळे मिचकावण्याची सवय सुटली, तसेच ती पूर्वीपेक्षा उत्साही दिसू लागली. तिचा त्वचारोग पूर्णपणे बरा झाला असून, तिच्या अंगाची होणारी जळजळही पूर्णपणे थांबली आहे. सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि ‘श्री कुलदेवतायै नमः’ हे दोन्ही नामजप ती करते. सत्संगात घेतले जाणारे विषय तिला क्वचितच समजतात; पण ‘त्या वातावरणात तिला आनंद मिळतो’, असे तिने सांगितले.’ – कु. तनुजा, बिहार.
ओ. सत्संगात वाईट शक्तीचा त्रास न्यून होणे
सत्संगात एकूणच सात्त्विकता वाढलेली असल्याने एखाद्याला वाईट शक्तीचा त्रास असल्यास तो दूर व्हायला साहाय्य होते. काही वेळा चांगली आध्यात्मिक पातळी असलेला साधक किंवा संत सत्संगात शिकवतात. त्या वेळी त्यांच्या वाणीतून चैतन्य प्रक्षेपित होत असते. यामुळेही वाईट शक्तीचा त्रास दूर व्हायला साहाय्य होते. या संदर्भातील एक अनुभूती पुढे दिली आहे.
ओ १. वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असलेली आणि सामूहिक नामजप केल्यानंतरही न थांबणारी डोकेदुखी साधिकेच्या बोलण्यातील चैतन्यामुळे थांबणे
‘१८.७.२००३ या दिवशी सकाळी उठल्यापासूनच माझे डोके दुखत होते. त्या आधी ४-५ दिवसांपासूनच वाईट शक्तींच्या त्रासामुळे जवळजवळ दिवसभर डोके दुखत असायचे. त्या दिवशी सकाळी सामूहिक नामजप केल्यानंतरसुद्धा डोके दुखायचे थांबले नाही. सामूहिक नामजपानंतर साधिका सौ. अंजली गाडगीळ यांनी काही साधकांचा सत्संग घेतला. मी त्या सत्संगाला बसलो होतो. तेव्हा सौ. गाडगीळ यांच्या बोलण्यात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्यांचे बोलणे चालू असतांना माझी डोकेदुखी थांबली होती आणि डोके अतिशय हलके वाटत होते. सत्संग संपल्यानंतर काही वेळाने डोके पुन्हा दुखायला लागले.’
– श्री. संदीप, गोवा.
४. संतसंग, संतसेवा महत्त्वाची असली, तरी एखादे संत हे खरे आहेत कि खोटे, हे कसे ओळखायचे ?
कलियुगातील ९८ टक्के तथाकथित संत आणि गुरु खोटे असल्याने त्यांच्या दर्शनाला जाऊ नये; मात्र एखाद्याची थोडी-फार आध्यात्मिक प्रगती झाली आहे, असा विश्वास असल्यास आणि त्याने ‘अमुक एका संतांच्या दर्शनाला जा’, असे सांगितल्यास ते शब्दप्रमाण मानून त्यांचे दर्शन आणि सेवा यांसाठी अवश्य जावे.
५. सत्संगाचे स्वरूप कसे असते ?
सत्संग साधारणतः दीड घंट्याचा (तासाचा) असतो. स्थानिक परिस्थितीनुसार आणि प्रांतानुसारही सत्संगाच्या विषयांमध्ये थोडा-फार पालट केला जातो, उदा. ग्रामीण भागात तात्त्विक विवेचनापेक्षा गोष्टींच्या स्वरूपात अध्यात्म शिकवले जाते.
या लेखात दिलेले सत्संगाचे माहात्म्य लक्षात घेऊन अधिकाधिक जिज्ञासू, मुमुक्षू आणि साधकजन यांना पुढच्या पुढच्या टप्प्याचे सत्संग मिळो आणि त्यांची साधनेच्या पथावर शीघ्र गतीने वाटचाल होवो, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !’
करोनाच्या कालखंडात ऑनलाईन सत्संगाचे स्वरूप कसे असते ?
नमस्कार श्री. श्रीकांत कालकरजी,
ऑनलाईन सत्संगांच्या प्रक्षेपणाची लिंक – https://www.youtube.com/SanatanSanstha
विषय –
१. नामजप सत्संग : सकाळी १०:३०, दु. ४ (पुनर्प्रक्षेपण)
२. भावसत्संग : दु. २:३०
३. धर्मसंवाद : सायं. ७, दु. १ (पुनर्प्रक्षेपण)
तसेच साधनेला आरंभ करण्यासाठी साप्ताहिक साधना सत्संगात सहभागी होऊ शकता. यासाठी विनामूल्य नोंदणी येथे करा – https://events.sanatan.org/