सर्व देवतांचे पूजन करण्याची पद्धत सारखीच असते. याविषयीचे विस्तृत विवरण (माहिती) सनातनच्या ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’ या ग्रंथात सविस्तररित्या दिले आहे. प्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, उदबत्तीने कसे ओवाळावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे.
१. देवीपूजन करण्यापूर्वी देवीतत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या काढणे
विशेषतः मंगळवारी आणि शुक्रवारी देवीपूजनापूर्वी, तसेच नवरात्रीच्या काळात घरी किंवा देवळात देवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. श्री दुर्गादेवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या दोन रांगोळ्यापुढे दिल्या आहेत. सर्व देवी या आदिशक्ति श्री दुर्गादेवीचीच रूपे असल्यामुळे त्या त्या देवीची उपासना करतांना श्री दुर्गादेवीतत्त्वाशी संबंधित रांगोळ्या काढता येतात. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण देवीतत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ होतो. या रांगोळ्यांमध्ये पिवळा, निळा, गुलाबी यांसारखे सात्त्विक रंग भरावेत.
चैतन्याची अनुभूती देणारी रांगोळी
या रांगोळीत मध्यबिंदूपासून आठ दिशांना ५ ठिपके आहेत. ठिपक्यांच्या प्रत्येक रेषेतील क्र. १ चा ठिपका आणि त्यापुढील रेषांतील अनुक्रमे ३, ५, २, ४ अन् १ हे ठिपके एका मागोमाग एक असे, सर्वांत पहिला ठिपका क्र. १ येईपर्यंत जोडत जावे.
भक्तीभाव वाढवण्यासाठी उपयुक्त रांगोळी
१४ ठिपके १४ ओळी
देवघर, पाट आदींभोवती काढावयाच्या रांगोळ्या
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या सात्त्विक रांगोळ्या’
१ अ. देवीतत्त्व आकर्षित आणि प्रक्षेपित करणारा आकृतीबंध काही आकृतीबंधांमुळेही देवीतत्त्व आकर्षित आणि प्रक्षेपित होण्यास साहाय्य होते. असा एक आकृतीबंध येथे दाखवला आहे.
हा आकृतीबंध रांगोळी काढतांना, तसेच देवीभोवतीची आरास, तोरण इत्यादींमध्ये वापरल्यास देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहाय्य होते.