बेळगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातन संस्थेचा सहभाग
बेळगाव, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते. श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेला जलप्रलय हा कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे झाला, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या ‘पोस्टर्स’वर ‘लव्ह इज अ पिलग्रिमेज’ अर्थात ‘प्रेम ही तीर्थयात्रा आहे’, अशी ‘टॅगलाईन’ देत हिंदूंच्या तीर्थयात्रांच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये आणि चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर या दिवशी बेळगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकारी श्री. बुद्धेप्पा यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य अंजेश कणगलेकर, योग वेदांत सेवा समितीचे श्री. विनोदानंद महाराज, गोरक्षण समितीचे श्री. भरमाणी पाटील, इस्कॉनचे श्री. श्रीधर भूते यांनी मनोगत व्यक्त केले. धर्मप्रेमी सर्वश्री सदानंद मासेकर, दशरथ पालेकर, श्रीपाद देशपांडे, सुरेश माळी, शुभम आपटेकर, सौ. मीलन पवार, योग वेदांत सेवा समितीचे श्री. गणेशभाई यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
विशेष – इस्कॉनचे श्री. श्रीधर भूते आंदोलन पाहून त्यात सहभागी झाले आणि ‘मला नेहमीच बोलवा’, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
१. जनभावनांचा उद्रेक होण्यापूर्वी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘केदारनाथ’ चित्रपटावर बंदी घालावी.
२. जोवर चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळून चित्रपट हिंदु संघटना किंवा धर्माचार्य यांच्या शिष्टमंडळाला दाखवला जात नाही, तोवर चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
३. चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंची मंदिरे, श्रद्धास्थाने, धर्मग्रंथ आणि देवता यांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ नये, यासाठी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) नियमावली बनवावी.
४. चित्रपटाची ‘लव्ह इज अ पिलग्रिमेज’ ही ‘टॅगलाईन’ पालटावी.