‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी !
‘गुरुपादुकाष्टकम्’ या स्तोत्रात आद्य शंकराचार्यांनी गुरुपादुकांचे साधकाच्या जीवनातील महत्त्व यथार्थपणे वर्णिलेे आहे, तसेच ‘प्रभु श्रीरामचंद्राच्या पादुका सिंहासनावर स्थापन करून भरताने ‘श्रीरामाचा प्रतिनिधी’ म्हणून १४ वर्षे रामराज्य चालवले’, हे रामायणातील उदाहरण सर्वश्रुत आहे. अध्यात्मशास्त्रानुसार उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांच्या (गुरूंच्या) देहाच्या विविध भागांपैकी त्यांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. गुरुचरणांच्या सतत सान्निध्यात असणारी वस्तू म्हणजे त्यांच्या पादुका. त्यामुळे पादुका गुरुचरणांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याने भारित होतात. काळानुसार अनेक संत लाकडी पादुकांपेक्षा चपला वापरतात. त्यांवर गुरुचरणांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा होणारा परिणाम अभ्यासण्याच्या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडील रबरी चपलांच्या ३ जोडांची ४ आणि १८ डिसेंबर २०१७ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीसाठी वापरलेल्या परात्पर गुरु
डॉ. आठवले यांच्या रबरी चपलांंविषयी माहिती
परात्पर गुरु डॉ. आठवले रबरी चपलांचा एक जोड वापरत होते आणि चपलांचे अन्य जोड त्यांच्या खोलीत एका खोक्यात गेल्या ४ वर्षांहूनही अधिक काळ ठेवलेले होते. त्यांच्याकडील रबरी चपलांविषयी माहिती पुढे दिली आहे.
अ. चपला १ : या त्यांनी कधीही वापरलेल्या नाहीत.
आ. चपला २ : या त्यांनी वर्ष २०१३ ते ४.१२.२०१७ पर्यंत अशी साधारण ५ वर्षे वापरल्या.
इ. चपला ३ : या त्यांनी वर्ष २०१० ते वर्ष २०१२ अशी साधारण ३ वर्षे वापरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गेली साधारण ५ वर्षे वापरात नसलेल्या या चपला ४.१२.२०१७ पासून वापरणे पुन्हा चालू केले.
या तीनही चपला रबरी आहेत; पण लिखाणातील पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुढे लेखात ‘रबरी चपला’ याऐवजी केवळ ‘चपला’ असा उल्लेख केला आहे.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत ४.१२.२०१७ या दिवशी उपरोल्लेखित तीनही चपलांची आणि १८.१२.२०१७ या दिवशी तीनपैकी ‘चपला २’ अन् ‘चपला ३’ यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या सर्व मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख, उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण, घटकाची प्रभावळ मोजणे, परीक्षणाची पद्धत आणि चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता, ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
३. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे
४ आणि १८ डिसेंबर २०१७ या दिवशी केलेल्या मोजणीच्या नोंदी
३ अ. मोजणीच्या नोंदींचे विवेचन
३ अ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील नोंदींचे विवेचन
चपलांच्या तीनही जोडांमध्ये ‘इन्फ्रारेड’, तसेच ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा नसणे
‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जांच्या केलेल्या मोजणीच्या वेळी त्या तीनही चपलांच्या संदर्भात ‘यू.टी.एस्.’ उपकरणाच्या भुजा उघडल्या नाहीत. याचा अर्थ त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती.
३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील नोंदींचे विवेचन
३ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या चपलांमध्येच सकारात्मक ऊर्जा असणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलांमधील सकारात्मक ऊर्जेच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी पुढीलप्रमाणे होत्या.
३ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी न वापरलेल्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा नसणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही न वापरलेल्या चपला (चपला १) आणि साधारण ५ वर्षे न वापरलेल्या चपला (चपला ३) यांच्या संदर्भात ‘यू.टी.एस्.’ उपकरणाच्या भुजा मुळीच उघडल्या नाहीत. याचा अर्थ त्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा नव्हती.
३ आ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधारणपणे ५ वर्षे सतत वापरलेल्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे
४.१२.२०१७ या दिवशी केलेल्या मोजणीच्या नोंदींमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले वर्ष २०१३ पासून वापरत असलेल्या चपलांच्या (‘चपला २’च्या) संदर्भात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या आणि त्या ऊर्जेची प्रभावळ चपलांपासून ०.४९ मीटर होती, तर १८.१२.२०१७ या दिवशी केलेल्या मोजणीच्या नोंदींतही ती ०.४९ मीटर होती. ४ ते १८ डिसेंबर हे १४ दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या चपला वापरल्या नव्हत्या. याचा अर्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या चपला १४ दिवस न वापरताही त्यांतील सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली होती, हे वैशिष्ट्यपूर्ण होते.
३ आ ४. साधारण ५ वर्षे वापरात नसलेल्या चपला वापरणे चालू केल्यानंतर त्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे
‘चपला ३’ या चपलांच्या संदर्भात ४.१२.२०१७ या दिवशी केलेल्या मोजणीमध्ये त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या मोजणीनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या चपला वापरणे चालू केले. त्यानंतर १८.१२.२०१७ या दिवशी त्या चपलांच्या संदर्भात केलेल्या मोजणीमध्ये स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे त्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती आणि तिची प्रभावळ चपलांपासून ०.५४ मीटर होती. याचा अर्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या चपला केवळ १४ दिवस वापरल्यानंतर त्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती.
३ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भातील नोंदींचे विवेचन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चपला वापरल्यानंतर त्या चपलांची एकूण प्रभावळ वाढणे, तर त्यांनी त्यांचा वापर थांबवल्यानंतर त्या चपलांच्या एकूण प्रभावळीत घट होणे :
सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते.
३ इ १. ४.१२.२०१७ या दिवशी चपलांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी
वरील सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. वरील चपलांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले सध्या वापरत असलेल्या चपलांची (‘चपला २’ची) एकूण प्रभावळ सर्वाधिक होती.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी ३ वर्षे वापरलेल्या; पण गेली ५ वर्षे ते वापरत नसलेल्या चपलांची (‘चपला ३’ची) एकूण प्रभावळ ‘चपला २’च्या एकूण प्रभावळीच्या खालोखाल होती.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही न वापरलेल्या चपलांची एकूण प्रभावळ वरील चपलांमध्ये सर्वांत अल्प होती.
याचा अर्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापर करण्यानुसार त्यांच्या चपलांमधील एकूण प्रभावळ अल्प आहे कि अधिक, हे ठरते.
३ इ २. १८.१२.२०१७ या दिवशी केलेल्या मोजणीच्या नोंदी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ४.१२.२०१७ या दिवसापासून ‘चपला २’ वापरणे थांबवले आणि ‘चपला ३’ वापरणे चालू केले. त्यानंतर १४ दिवसांनी, म्हणजे १८.१२.२०१७ या दिवशी त्या दोन्ही चपलांच्या जोडांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी पुढीलप्रमाणे आल्या.
वरील सारणीवरून लक्षात येते की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चपला २’ १४ दिवस न वापरल्याने त्या चपलांची एकूण प्रभावळ ०.१२ मीटर घटली आणि त्यांनी ‘चपला ३’ १४ दिवस वापरल्याने त्या चपलांची एकूण प्रभावळ ०.०५ मीटर वाढली.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.
४. निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र
‘सूत्र ३’ मध्ये दिलेल्या मोजणीच्या नोंदींमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांच्या) चैतन्याचा त्यांच्या संपर्कातील वस्तूवर (चपलांवर) झालेला परिणाम दिसून येतो. ‘सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत संतांमध्ये चैतन्य अधिक का असते ? ते देहाच्या विविध अवयवांतून किती प्रमाणात प्रक्षेपित होते ? आणि चैतन्याच्या प्रक्षेपणावर संतांच्या संकल्पाचा काय परिणाम होतो ?’ ते पुढे दिले आहे. त्याच्या आधारे संतांच्या संबंधित वस्तूंतील वैशिष्ट्यपूर्ण पालटांमागील आध्यात्मिक कारणे लक्षात येतील.
४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांच्या) संपर्कातील वस्तू त्यांच्यातील चैतन्याने भारित होत असल्याने तिच्यात नकारात्मक ऊर्जा नसणे आणि त्यांनी ती वस्तू वापरल्यानंतर तिच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे
४ अ १. संतांमधील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रमाण
‘सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सत्त्व : रज : तम या त्रिगुणांचे प्रमाण २० : ३० : ५० असे असते, तर ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांमध्ये हेच प्रमाण ५० : ३० : २० असे असते. याचा अर्थ सर्वसाधारण व्यक्तीमध्ये तमोगुण सर्वाधिक असतो, तर संतांमध्ये सत्त्वगुण सर्वाधिक असतो.
४ अ २. सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत संतांमधील एकूण संख्यात्मक त्रिगुणांचे प्रमाण
सर्वसाधारण व्यक्तीमध्ये एकूण संख्यात्मक त्रिगुणांचे प्रमाण १०० टक्के असते, तर ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांमध्ये ते प्रमाण १० टक्के किंवा त्याहूनही अल्प असते. हे प्रमाण पुढे आणखी घटत जाऊन ९० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांमध्ये (परात्पर गुरूंमध्ये) ते १/१,००० एवढे अल्प होते.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’)
४ अ ३. एकूण देहाच्या तुलनेत चरणांमधून चैतन्य सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असणे
पुढील सारणीत आध्यात्मिक उन्नतांच्या देहाच्या विविध भागांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाण टक्क्यांमध्ये दिले आहे.
आध्यात्मिक उन्नतांच्या देहाच्या विविध भागांपैकी त्यांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते, हे या सारणीतून स्पष्ट होते.
वरील सूत्रांवरून ‘उच्च आध्यात्मिक स्तर असणार्या संतांमध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत चैतन्य सर्वाधिक असते आणि त्यामुळे ते सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असतात, तसेच त्यांच्यातील चैतन्य त्यांच्या देहाच्या विविध अवयवांच्या तुलनेत चरणांतून सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असते’, हे स्पष्ट होते. संतांच्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या संपर्कातील वस्तूंवरही होत असतो. नेमके हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलांच्या संदर्भात झाले. त्यामुळे त्यांच्या खोलीत ठेवलेल्या आणि त्यांच्या वापरातील चपलांमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही, तसेच त्यांनी वापरलेल्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली.
४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले वापरत असलेल्या चपलांमध्ये निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यामुळेच असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याचा आणि त्यांच्या अध्यात्मप्रसाराच्या समष्टी कार्याचा परिणाम त्यांच्या खोलीवरही होतो. त्यामुळे त्यांच्या खोलीतही चैतन्य निर्माण झाले आहे. चाचणीच्या ४.१२.२०१७ या दिनांकापर्यंत ‘चपला १’ आणि ‘चपला ३’ परात्पर गुरु डॉ. आठवले वापरत नसल्याने त्या त्यांच्या खोलीत ठेवल्या होत्या. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले संपूर्ण दिवसातील साधारण १४ – १५ घंटे खोलीत असतात. त्यामुळे ते वापरत असलेल्या ‘चपला २’ तेवढा वेळ खोलीत असतात. याचा अर्थ चपलांच्या सर्व जोड्यांवर खोलीतील चैतन्याचाही परिणाम झाला होता. ‘चपला १’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरल्या नव्हत्या. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नव्हती आणि त्यांची एकूण प्रभावळ ०.४० मीटर होती. ‘चपला २’ परात्पर गुरु डॉ. आठवले गेली साधारण ५ वर्षे वापरत होते. त्या चपलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तिची प्रभावळ ०.४९ मीटर होती, तसेच त्यांची एकूण प्रभावळ ०.६४ मीटर होती. याचा अर्थ परात्पर गुरु डॉ. आठवले वापरत असलेल्या ‘चपला २’ यांमध्ये निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमुळे नव्हे, तर केवळ त्यांच्यामुळेच निर्माण झाली होती; कारण ‘चपला १’ मध्ये सकारात्मक ऊर्जा नव्हती. तसेच ‘चपला १’च्या एकूण प्रभावळीपेक्षा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या ‘चपला २’ची एकूण प्रभावळ ०.२४ मीटर अधिक होती. हाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच त्या चपलांवर झालेला परिणाम होता. ‘चपला ३’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी ३ वर्षे वापरल्या होत्या; पण गेली ५ वर्षे ते त्या वापरत नव्हते. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नव्हती; पण त्यांची एकूण प्रभावळ ‘चपला १’च्या एकूण प्रभावळीपेक्षा ०.१ मीटर अधिक होती. हाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी त्या चपला वापरण्याचा परिणाम होता.
४ इ. संतांचा संकल्प असल्यासच वस्तूमध्ये आलेले त्यांचे चैतन्य दीर्घ काळ टिकू शकणे
‘एखाद्या वस्तूत चैतन्य यावे आणि ते पुष्कळ काळ टिकून रहावे’, असा उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांचा संकल्प असल्यास त्या वस्तूत चैतन्य दीर्घकाळपर्यंत टिकून राहू शकते. स्थळ-काळानुसार समष्टीच्या हितासाठी आवश्यक असल्यासच संत असा संकल्प करतात. तसा संकल्प नसल्यास ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ या सृष्टीतील नियमानुसार त्या वस्तूतील चैतन्य काही काळाने नष्ट होते. ‘स्वतःच्या चपलांत चैतन्य टिकून रहावे’, असा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प नव्हता. त्यामुळे त्यांनी ३ वर्षे वापरलेल्या रबरी चपला, नंतर साधारण ५ वर्षे न वापरता ठेवून दिल्यावर त्यांत सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
४ ई. असात्त्विक घटकांपासून बनवलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य अधिक काळ टिकून राहू न शकणे
दगड, धातू, लाकूड आदी नैसर्गिक घटक आणि रबर, प्लास्टिक, कागद आदी कृत्रिम घटक या प्रत्येकाची चैतन्य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. नैसर्गिक घटक हे कृत्रिम घटकांपेक्षा अधिक सात्त्विक असतात. त्यामुळे त्यांच्यात चैतन्य टिकून रहाण्याचे प्रमाणही अधिक असते. यानुसार लाकडी पादुकांमध्ये चैतन्य जेवढा अधिक काळ टिकून राहील, तेवढा काळ ते रबरी चपलांमध्ये टिकून राहू शकणार नाही.
४ उ. वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे वस्तूतील चैतन्य न्यून होऊ शकणे
एखाद्या चैतन्यमय वस्तूच्या माध्यमातून वातावरणात होणारे चांगल्या शक्तीचे प्रक्षेपण थांबवण्यासाठी वाईट शक्ती त्या वस्तूवर आक्रमण करतात. त्या वस्तूवरील वाईट शक्तींच्या आक्रमणाची तीव्रता त्या वस्तूतील चैतन्यापेक्षा अधिक असल्यास त्या वस्तूतील चैतन्य न्यून होऊ लागते.
५. ‘गुरुचरणांचे महत्त्व’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्या चपला’ यांविषयी साधकांना मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान
५ अ. संपूर्ण देहातील इंद्रियांच्या तुलनेत चरणांतून सर्वाधिक शक्ती प्रक्षेपित होणे आणि चरणांतून प्रक्षेपित होणार्या पृथ्वी-आपतत्त्वयुक्त चांगल्या शक्तीचा सर्वसामान्य जिवाला लगेच स्वीकार करणे शक्य होणे
‘संपूर्ण देहातील इंद्रियांच्या तुलनेत उन्नतांच्या चरणांतून सर्वांत अधिक प्रमाणात, म्हणजेच जवळजवळ ४० टक्के एवढ्या प्रमाणात चांगली शक्ती प्रक्षेपित होत असते. सर्वसामान्य माणसाच्या पृथ्वी-आपतत्त्वयुक्त देहास त्याला लगेच स्वीकार करता येण्यासारखी पृथ्वी-आपतत्त्वयुक्त चांगली शक्ती उन्नतांच्या चरणांतून प्रक्षेपित होत असल्याने आचारधर्मात प्रथम चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. या पृथ्वी-आपतत्त्वयुक्त शक्तीचा जिवाला लगेचच स्वीकार करता यावा आणि तिचा जीवनात अधिकाधिक लाभ करून घेता यावा, म्हणूनच ही पद्धत अधिक अवलंबली जाते.’ – एक विद्वान (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान त्या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिहितात. (८.५.२०१४, सकाळी १०.१८))
५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या चपला सामान्य नसून साक्षात गुरुपादुकाच असणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या रबरी चपला बाह्यतः दिसतांना सामान्य वाटत असल्या, तरी त्यांचे कार्य मात्र असामान्य आहे. ‘रबरी चपला ठेवलेली लादी गुळगुळीत होणे’, यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या चपलांमध्ये किती प्रमाणात चैतन्य साठलेले आहे, हेच सुस्पष्ट होते. यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या चपला सामान्य नसून साक्षात गुरुपादुकाच आहेत’, हेच सिद्ध होते.
५ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रबरी चपला ‘गुरुपादुका’च असणे, याचे ज्ञानयोगाद्वारे केलेले विश्लेषण
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्यलहरी त्यांनी वापरलेल्या रबरी चपलांमध्ये साठतात. चपलांचा स्पर्श ज्या लादीला दीर्घकाळ होतो, त्या लादीमध्ये चपलांत कार्यरत असणार्या चैतन्यलहरी झिरपतात. लादीमध्ये झिरपलेल्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्यलहरींचे रूपांतर जेव्हा वायूतत्त्वाच्या स्तरावरील निर्गुण-सगुण चैतन्यलहरींमध्ये होऊ लागते, तेव्हा स्थुलातून लादी गुळगुळीत होते. यावरून आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या चपलांमध्ये कार्यरत असणार्या चैतन्यलहरी किती उच्च स्तराच्या असतील, याचा अनुमान लावू शकतो. गुरुचरणांतून प्रक्षेपित होणार्या ४० टक्के चैतन्यलहरी गुरुपादुकांमध्ये साठल्या जातात. त्यामुळे गुरुपादुका चैतन्यदायी असतात.’
कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०१६, रात्री ९.३०)
थोडक्यात सांगायचे, तर आध्यात्मिक उन्नतांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याने त्यांच्या संपर्कातील वस्तूही भारित होतात. पादुका गुरुचरणांशी असल्याने त्यांत पुष्कळ चैतन्य असते. ते मिळावे, यासाठी भाविक गुरुपादुकांचे पूजन करतात.’
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा १३.१.२०१८)
ई-मेल : [email protected]
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख, उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण, घटकाची प्रभावळ मोजणे, परीक्षणाची पद्धत आणि चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता, ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.