संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. भगवान जगन्नाथाला निद्रा यावी, यासाठी
सादर केली जाणारी ‘गोटी पुवा’ ही ओडिसी नृत्यकला !
१ अ. नर्तकींचा वेश परिधान करून नर्तक-मुले नृत्य सादर
करत असल्याने मनात आलेला प्रश्न आणि त्याचे मिळालेले उत्तर !
‘४.९.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात एका नृत्यसमूहाने ‘गोटी पुवा’ ही ओडिसी नृत्यकला सादर केली. भगवान जगन्नाथाला निद्रा येण्यासाठी कुमारी नृत्य करते. ‘मुलींना मासिक पाळी येत असल्याने नर्तकींचा वेश परिधान करून नर्तक-मुले नृत्य करतात’, असे त्यांच्या प्रमुखाने सांगितले. तेव्हा वाटले, ‘नर्तक-मुले नर्तकांच्याच वेशात नृत्य का करत नाहीत ?’ तेव्हा लक्षात आले, ‘अखिल ब्रह्मांड नायकापुढे सर्व जीव स्त्रीरूपी आहेत; कारण केवळ तोच एकमेव पुरुष आहे. परमात्मा पुरुष असून जीव स्त्री आहे.’
१ आ. ‘ओडिसी नृत्यकला’ ही हठयोग आणि भक्तीयोग यांचा संयोग !
या नृत्यकलेमध्ये जलद पदन्यास, लवचिक अंगविक्षेप, चपळ हस्तमुद्रा, तोंडवळ्यावर हावभाव करायचे असतात. ही नृत्यकला हठयोग आणि भक्तीयोग यांचा संयोग आहे. शरिराचा वरील भाग कंबरेतून पाठीमागच्या दिशेने वाकवून शरिराला चेंडूप्रमाणे गोलाकार देणे, तसेच वाकवलेल्या स्थितीत पोटावर अन्य नर्तकाचे वजन पेलणे, पाय ताठ आणि आडवे करून भूमीवर दोन्ही बाजूंनी अधिकाधिक दूर नेणे, हे हठयोगाचे प्रकार आहेत.
२. ‘कथकली’ या नृत्य प्रकारात
तोंडवळ्यावरील हावभावांना अधिक महत्त्व !
‘कथकली’ या नृत्यकलेत तोंडवळ्यावर लक्ष केंद्रित केलेले असते. विविध भाव दर्शवण्यासाठी तोंडवळ्याची प्रत्येक नस ताणली किंवा आकुंचित केली जाते. हावभावांच्या माध्यमातून भाव अधिक प्रमाणात व्यक्त होतो. भाव व्यक्त करण्यास शरिराच्या हालचालीही पूरक ठरतात. हे व्यक्त भावाचे उत्तम उदाहरण आहे.
३. मनाची एकाग्रता साधणारी ‘कुचिपुडी’ नृत्यकला !
यात तालबद्ध पदन्यास, हस्तमुद्रा आणि तोंडवळ्यावरील हावभाव यांसह नृत्यांगना डोक्यावर घट अन् पाय ताम्हणावर ठेवून स्वतःचा तोल सावरत भूमीवर रचना करते. या सगळ्यामुळे मनाची एकाग्रता साधली जाते.
४. ‘भरतनाट्यम्’ या नृत्यकलेमध्ये
तोंडवळ्यावर नवरसांची अभिव्यक्ती केली जाणे
यात विविध तालांवर जलद गतीचे पदन्यास, हातांच्या विविध मुद्रा करत संगीताच्या विषयानुरूप तोंडवळ्यावर नवरसांची अभिव्यक्ती केली जाते. यात व्यक्त भाव असल्यामुळे हा भक्तीयोगाचाच एक भाग ठरतो.
५. भक्तीयोगाच्या पुढच्या
टप्प्याकडे नेणारा ‘कथ्थक’ नृत्यप्रकार !
यामध्ये हातांच्या मुद्रा आणि पदन्यास नाजूक असतात, तसेच तोंडवळ्यावरील हावभावही सौम्य असतात. नृत्यांगना भक्तीयोगाच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजे अव्यक्त भावाकडे जाण्याचा आणि त्याही पुढे जाऊन ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते.’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (सप्टेंबर २०१७)
विविध वाद्यांच्या वादनाचा श्रोत्यांवर होणारा परिणाम
१. विविध वाद्ये, त्यांतील स्पंदने आणि श्रोत्यांवर होणारा परिणाम
१ अ. मृदंग, तबला : या वाद्यांतून प्रक्षेपित होणार्या शक्तीच्या स्पंदनांमुळे श्रोत्यांमध्ये आध्यात्मिक जागृती होते.
१ आ. सतार : सतारीच्या सुरेल तारा भावाची स्पंदने प्रक्षेपित करतात. ही भावस्पंदने श्रोत्यांच्या मनात शांती निर्माण करून त्यांची भावजागृती करतात.
१ इ. सरस्वतीदेवीची वीणा : वीणेतून निर्माण होणार्या नादामुळे श्रोता अंतर्मुख होतो. वीणेतून वातावरणात मोठ्या प्रमाणावर चैतन्याचे प्रक्षेपण होते.
१ ई. बासरी : पंचतत्त्वांपैकी एक असलेल्या वायूतत्त्वाच्या साहाय्याने ही वाजवली जाते. यातून वाजवले जाणारे मंजुळ संगीत ऐकून श्रोत्याचे मन आनंदाने भरून जाते.
१ उ. ‘ॐ’कार नाद : हे आकाशतत्त्वाचे लक्षण असून ‘ॐ’ हा प्रणव नाद श्रोत्याला शांती देऊन परमेश्वराशी एकरूप झाल्याची (अद्वैताची) अनुभूती देतो.
२. वादकाच्या भावानुसार वाद्यांमुळे होणार्या परिणामांत पालट होणे
वाद्यांचा वरील परिणाम दिसला, तरी वादकाच्या भावानुसार त्यात पालट होतो.
अ. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असणार्या भक्ताने मृदंग वा तबला वाजवला, तर त्यातून श्रोत्यांना आनंद आणि शांती यांसारख्या उच्च स्तरावरील अनुभूतीही येऊ शकतात.
आ. याउलट वीणेचा दुरुपयोग चित्रपटातील गाणी किंवा पाश्चात्य संगीत वाजवण्यासाठी केला, तर वादकातील रज-तम गुणांमुळे त्यातून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होऊ लागण्याची शक्यता असते.’