बोईसर येथे ३७ वा वार्षिक अय्यप्पा
स्वामी पूजा समारंभ भावपूर्ण वातावरणात संपन्न !
बोईसर (पालघर), २६ नोव्हेंबर (वार्ता.) – सरकार शबरीमला मंदिरात परंपरेच्या विरोधात जाऊन महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करत आहे, जे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार चुकीचे आहे. त्यासाठी सरकारचा विरोध पत्करत शबरीमला येथील महिलांनी जो लढा चालू केला आहे, तो खरोखरच प्रशंसनीय आहे. शबरीमला मंदिराचा विषय हा केरळी लोकांचा प्रश्न नाही, तर हा संपूर्ण हिंदु समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही सर्व हिंदूंनी एकत्रित लढून हा निर्णय निकालात काढून आपली संस्कृती जपली पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. येथे प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही श्री अय्यप्पा स्वामी पूजेचे आयोजन बोईसर अय्यप्पा पूजा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यात श्री. वर्तक बोलत होते. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. पूजा समारंभ अनुभवण्यासाठी विविध ठिकाणांहून भक्तगण आले होते.
श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले की,…
१. आज काळानुसार धर्माचे रक्षण करणे म्हणजेच आजचे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ आहे. भगवद्गीतेत जे सांगितलेले आहे, त्याचे आचरण करण्याची आवश्यकता आहे. सरकार कशा प्रकारे हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन भाविकांच्या भावनांशी खेळत आहे आणि त्यांनी भक्तीभावाने अर्पण केलेल्या धनाचा कसा दुरुपयोग करत आहे. जे सरकार एक रेशन दुकान व्यवस्थित चालवू शकत नाही, ते मंदिर व्यवस्थापन काय पहाणार ?
२. मंदिर चालवणे सरकारचे काम नाही. सरकारने मंदिरांना काही दिले पाहिजे, असे न करता सरकार मंदिराचाच पैसा लुबाडत आहे. या सर्व गोष्टींना विरोध केला नाही, तर आमचे ऊर्जास्रोत, पर्यायी आमची हिंदु संस्कृती नष्ट होईल. शबरीमलाची लढाई लढत आहोत, ती खरोखरची भक्ती आहे. आमची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्व धर्मद्रोही एकत्र येऊन लढा देत आहेत. मग आम्ही हिंदूंनी याला विरोध करण्यासाठी एकत्र यायला नको का ?
या वेळी कमिटी सदस्य श्री. प्रसाद नायर यांच्या हस्ते श्री. अभय वर्तक यांचे, तर कमिटी सदस्य श्री. मनु मोहन यांच्या हस्ते श्री. पी.पी.एम्. नायर यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपिठावर बोईसर येथील गणेश मंदिर अय्यप्पा पूजा मंडळाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. एस्.के. नायर, कमिटी सदस्य श्री. गोपीनाथन, सेक्रेटरी श्री. विनोद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमिटी सदस्य श्री. गोपीनाथन यांनी, तर सेक्रेटरी श्री. विनोद यांनी आभार प्रदर्शन केले. १०० भाविकांनी याचा लाभ घेतला.
हिंदु संस्कृती टिकवायची असेल, तर युवा पिढीवर योग्य संस्कार करणे,
ही काळाची आवश्यकता ! – पी.पी.एम्.नायर, संयोजक, श्री रामदास आश्रम, बदलापूर
आज शबरीमला मंदिरात जो संघर्ष चालू आहे आणि त्यासाठी ज्या महिला लढत आहेत, त्यांच्या पाठीशी समस्त हिंदूंनी खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक आहे. युवा पिढीला शिक्षित करण्यासाठी स्वतःपासून प्रारंभ करावा लागेल. शबरीमला मंदिराचे प्रकरण पहाता युवा पिढीवर संस्कार करणे काळाची आवश्यकता कशी आहे, हे लक्षात येते. यासाठी वडीलधार्या मंडळींवर पुष्कळ मोठे दायित्व आहे. आज कुणीही हिंदु संस्कृती आणि सनातन धर्म यांची टिंगल करतो; पण आपण काही करू शकत नाही, त्याला कारणही आपणच आहोत. आपण आपल्या मुलांना धर्मशिक्षण दिलेच नाही. टिळा का लावायचा, मंदिरात का जायचे, पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचे महत्त्व कधी विशद करून सांगितले नाही. त्यामुळेच आज हिंदु सनातन संस्कृती नष्ट होण्याची वेळ आली आहे. सनातन धर्म आम्हाला आमच्या अंतरात्म्याची ओळख करून देतो, जगायचे कसे ते शिकवतो. कोणी आमच्या परंपरेविषयी प्रश्न उपस्थित केल्यास त्याला आपल्याला शास्त्रीय परिभाषेत ठामपणे उत्तर देता आले पाहिजे. म्हणजे आपल्या संस्कृतीचे रक्षण होईल आणि समोरचा पुन्हा कधी प्रश्न विचारणार नाही.